पार्टनर

Spread the word

पार्टनर

सुरेखा काकू अमेरिकेतून आलेल्या आपल्या नातवाला रोज बागेत फिरायला घेऊन जायच्या…तो लहान असल्या पासूनचा त्यांचा तो इथे आल्यावरच दिनक्रम …सुरेखा काकूंना एकच मुलगी…विभावरी तीच नाव…विभावरी लहानपणापासून खूप हुशार…विनायक काकांना आपल्या लेकीचा खूप अभिमान होता…त्यानां नेहमी वाटायचे तिने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जावे…पण सुरेखा काकू अगदी त्याच्या विरुद्ध…त्या म्हणायच्या आपली एकुलती एक मुलगी…तीही अमेरिकेत गेली… आणि तिकडेच स्थाईक झाली तर आपण अगदी एकटे पडू…त्यापेशा त्या म्हणायच्या…

विभा ! तुला जे काय करायचे ते इथेच कर बाई…! नको ती अमेरिका…!
तिची सुद्धा विदेशात जाऊन शिकायची अजिबात इच्छा नव्हती…ती सुद्धा म्हणायची
आई… बाबा.. मला सुद्धा जे काय करायचे ते इथेच करायचे आहे…तुम्हाला सोडून मलाही कुठे जाण्याची इच्छा नाही…
आणि तिने इथेच IT क्षेत्रात इंजिनीअरिंग करून …बंगलोर ला नोकरीला सुरवात केली…काकांनी पण वशिला लावून आपली बदली तिथेच करून घेतली… काका, काकू व विभावरी मस्त मजेत राहू लागले…
बघता बघता विभावरी लग्नाच्या बोहल्यावर चढायला सज्ज झाली…विनायक काकांनी विभाला विचारले …
विभा..! तू कोणाच्या प्रेमात वैगरे पडली नाही ना…! असेल तर तसं सांग…? नाहीतर आम्ही वर संशोधन सुरू करतो…विभाने स्पष्ट सांगितले मी कुणाच्याही प्रेमात वगैरे पडली नाही…तुम्ही लागा तुमच्या कामाला…!
वर संशोधनाच्या…!

मग काका काकूंनी इकडून तिकडून मुलांची माहिती काढायला सुरवात केली…आणि एक दिवस अचानक काकूंची बालपणीची मैत्रीण आपल्या मुलांकरिता एक स्थळ बघायला म्हणून बंगलोर ला आली…
दोघींची भेट एका मॉल मध्ये झाली…सोबत विभावरी आणि तिचे बाबा होते…आणि काकूंची मैत्रीण त्याचे मिस्टर आणि त्याचा मुलगा मंदार हेही होते…

काकूने आपली बाल मैत्रीण ममता हिची प्रथम ओळख करून दिली…खरतर पाच सहा वर्षांपूर्वी त्या दोघींची त्याच्या माहेरी म्हणजे नागपूरला भेट झाली होती…तेव्हा त्यानीं एकमेकींचे मोबाईल नंबर घेतले होते…
सुरवातीला चार पाच महिने अधेमधे बोलायच्या त्या…. नंतर रोजच्या रहाटगाड्यात बोलणं हळूहळू कमी झालं…आणि आज दोघी अचानक समोरासमोर…! अचंबित होऊन पाहतच राहिल्या..! तेही सहकुटूंब..!

दोघीच्याही परिवाराची आपसात ओळख झाली…चहा नास्ता घेऊन…उद्या घरी येण्याचे ममताला आग्रहाचे आमंत्रण देऊन दोन्ही कुटूंब आपापल्या इच्छित स्थळी पोहचले…मंदारचा मेंदू आता त्याचा राहिला नव्हता…
त्याचा ताबा आता विभावरीने घेतला होता…सारखे तिचेच विचार आणि तिचीच प्रतिमा डोळ्यात दिसत होती…आपण इथे मुलगी बघायला आलो हेही तो विसरून गेला…आता फक्त आणि फक्त विभावरी त्याला दिसत होती …
तो बराच वेळ विचार करत राहिला…का असं होतं…? प्रेमात पडलो की काय आपण त्या विभावरीच्या…?
उत्तर सापडत नव्हतं… विचार करता करता त्याला आठवले…उद्या आपल्याला एक मुलगी बघायची आहे…ती सुद्धा MBA करून चांगल्या जॉब वर आहे…त्याची बंगलोरला मीटिंग होती…म्हणून मग मुद्दाम आई बाबांना घेऊन तो दोन्ही काम करायला आला होता…
मुलगी शादी डॉट कॉम वर पाहिली होती…आवडली म्हणून पुढचा घाट घातला होता…

पण आज त्याला फक्त विभावरी दिसत होती…शेवटी न राहून तो आई जवळ गेला…
म्हणाला आई तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचे आहे…
अरे बोल ना …? आणि परमिशन काय मागतो…? आम्हाला माहित आहे…तुला हि MBA झालेली मुलगी आवडली आहे…आणि तुझी आवड तीच आमची आवड …शेवटी संसार तुला करायचा आहे बेटा…
आई अगदी बरोबर बोलली तू.. पण आई काल त्या विभावरीला पहिले आणि मी तिच्या प्रेमातच पडलो ग…आता मला तुझ्या मैत्रिणीची मुलगी पसंद आहे …

काय…? होय आई …खूप विचार करतोय…पण डोळ्यासमोरून ती विभावरी जाताच नाही…आई प्लीज उद्या त्यानीं आपल्याला जेवायला बोलावले…तेव्हा तू माझ्या लग्नाचा विषय काढ…
त्त्यांनाही लग्न करायचे आहे का…?
तीने कोणी पाहून ठेवला का…?
काही तरी कळेल ग …आई प्लीज…मला बायको म्हणून तुझ्या मैत्रिणीची मुलगी जास्त आवडेल…
आईने उद्या गेल्यावर विषय काढते म्हटल्यावर मंदार शांत झोपला…रात्रभर स्वप्न मात्र विभावरीचे पाहत होता…
आज सकाळी त्या MBA मुलीला भेटायचे होते…तिला भेटून नंतर कळवतो…असे सांगून आजचा दिवस पार पडायचा होता…रात्री विभावरीच्या मनातले विचारायचे होते…
अर्थात हे सगळे त्याची आईच करणार होती…सकाळी मंदार त्या MBA मुलीला भेटून ….नक्की कळवतो असे आस्वासन देऊन ते रात्री सुरेखा काकू कडे जेवायला आले…

काकूंनी सगळी जय्यत तयारी केली होती…इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या….जेवण आटोपली…मंदारच्या आईने मग विषयाला हात घातला …
म्हणाली काय ग सुरेखा…! लेकीचं लग्न बिन्ग करायचे आहे की नाही…?
काय विभा शोधून ठेवला की काय…?
नाही ग मावशी शोधून नाही ठेवला…
ते काम आईबाबांवर सोपवले…सुरेखा लगेच म्हणाली…अग वर संशोधन चालू आहे…
आम्ही पण तेच करतोय ग..! मंदारची मीटिंग आणि एक मुलगी पाहायची असे दोन काम करायला आलो आम्ही…
सकाळी पाहिली त्याने एक मुलगी…पण अजून काही बोलला नाही…
अच्छा..! असं होय..! म्हणजे तुही सून शोधत आहेस…
खरयं ग..! सगळं अगदी वेळेत व्हावं…असं मला मनापासून वाटते…म्हणूनच त्याच्या मागे आलो…त्याला आवडली तर लगेच उद्या आम्ही पाहून घेऊ…

तेवढ्यात सुरेखा काकू म्हणाल्या विभा..! अग तुम्हाला आमच्या गोष्टी कंटाळवाण्या वाटत असतील तर…तू आणि मंदार थोडं फिरून या…! हवं तर सोबत बाबा आणि काकांना पण घेऊन जा…
तेवढ्यात मंदार चे बाबा म्हणाले… नको मी आराम करतो…तुम्ही जाऊन या…मंदार आणि विभावरी बाहेर पडले…
ice craem खाऊन दोघे घरी आले…त्या आधी ममताने विभावरी आणि मंदारच्या लग्नाचा विषय काढला…खरं तर सुरेखा काकुंना सुद्धा मंदार खूप आवडला होता…आणि आता ममताने अचानक विषय काढला…
मनोमन सुखावला त्या, म्हणाल्या… बोलते मी विभा सोबत…असं झालं तर खूपच भाग्यवान समजू आम्ही स्वतःला…
पण तिला विदेशात जायचे नाही ही तिची अट आहे…आणि तू तर म्हणते की मंदार सहा महिनेच इथे आहे…त्यामुळे नक्की काय ते नाही सांगता येत…? तिच्याशी बोलून तुला कळवते…आणि मग ते आपल्या हॉटेलवर आले…

रस्त्यात मंदारच्या आईने मंदारला सुरेखा मावशी व तिच्यात झालेले बोलणे सांगितले…मावशीला सुद्धा तो पसंद आहे म्हटल्यावर तोही खुश झाला…

आता विभा काय म्हणते हे बघायचे होते…? दुसऱ्याच दिवशी विभाचा मंदारला फोन आला…आणि आपला होकार कळवला…फक्त एकदा भेटून बोलू इतकंच म्हणाली…आणि संध्याकाळी भेटायचे ठरवले…

संध्याकाळी दोघे भेटल्यावर विभा म्हणाली…मंदार खरतर मला आईबाबांना सोडून जायचे नव्हते…पण आई बाबांनी खूप समजावले आणि मी या लग्नाला तयार झाले…तसं नकार देण्यासारखं तुझ्यात काहीच नव्हतं…आणि दुसरं म्हणजे आपल्या आई बालमैत्रिणी त्यामुळे त्यांचेही चांगले सूर जुळतील …त्यामुळे काळजी वाटणार नाही…
आणि लवकरच एका चांगल्या मुहूर्तावर त्यांचा साखरपुडा आणि लग्न पार पडले…आणि बरोबर सहा महिन्याने मंदार आणि विभावरी अमेरिकेला गेले…दोघेही नोकरी करत होते…मजेत दिवस जात होते…

इतक्यातच त्यानां बाळाच्या आगमनाची चाहूल लागली…दोघांचेही आईबाबा अमेरिकेला गेले…मुलीचे, सुनेचे कोडकौतुक करत दिवस सरले…एक गोंडस बाळ त्यांच्या संसार वेलीवर फुलले…दोन्ही कुटूंब मनापासून खुश होते…
आणि चार पाच महिने तिकडे राहून दोन्ही कुटूंब भारतात आले…रोज फोन, वर्षातून एकदा जाणेयेणे चालूच होते…

एक दिवस अचानक विनायक काकांच्या छातीत दुखायला लागले…
हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यानां…लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट केले…विभावरीला फोन केला…ती लगेच सकाळच्या विमानाने निघाली …

पण ती येइपर्यंत सगळं संपलं होतं…विनायक काकांची प्राणज्योत मालवली…लगेच मंदारही निघाला भारतात यायला…सर्व विधी आटोपून पंधरा दिवसाने दोघे पुंन्हा अमेरिकेला आले…
विभाला आता आईची जास्त काळजी वाटत होती…मंदारच्या आईने सुद्धा त्त्यांच्यांकडे येऊन राहायला सांगितले पण सुरेखा काकू कशालाही तयार नव्हत्या…विभावरी नित्यनेमाने दरवर्षी येऊन आईला भेटून जात होती…तिचा मुलगा आता सहा वर्षाचा झाला होता…

तो आल्यावर त्याला नित्यनेमाने बागेत घेऊन जायचा त्याचा दिनक्रम होता…यावेळी सुद्धा विभावरी आली…आजी नातू रोज संध्याकाळी बागेत फिरायला जात होती…
यावेळी मात्र त्यानां तिथे अजून एक मित्र मिळाला…
निलेश त्याचे नाव…
तोही त्याच्या आईबाबांसोबत जर्मनीला राहत होता…आपल्या आजोबांसोबत तोही रोज बागेत येत होता…दोघांची मस्त गट्टी जमली…

एक दिवस सुरेखा काकू त्यांना आपल्या घरी घेऊन आल्या…विभावरी सोबत निलेश आणि त्याच्या आजोबांची ओळख करून दिली…त्यानाही एकुलता एक मुलगा आणि तोही जर्मनीत स्थाईक…विभावरीच्या मनात एक विचार चमकून गेला…फक्त मनात ठेवले बोलले कुणालाच नाही…

पंधरा दिवसाने विभावरी अमेरिकेला गेली…सुरेखा काकू मात्र आता रोज बागेत जाऊ लागल्या…
कारण त्यानां आता निलेशचा विशेष लळा लागला होता…आठ दिवसाने निलेशही आपल्या आईबाबा सोबत जर्मनीला गेला…

आता सुरेखा काकू आणि निलेशचे आजोबा रोज बागेत भेटू लागले…एकमेकांना भेटून आपले सुखदुःख शेअर करू लागले…

आणि एक दिवस अचानक सुरेखा काकूंचे बागेत येणे बंद झाले…निलेशच्या आजोबांनी आठ दिवस वाट पाहिली…आता त्यानां सारखे वाटू लागले… आपण त्याचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे होता…
न राहवून त्यानीं शेवटी सुरेखा काकूंचे घर गाठले…काकू घरीच होत्या…पण उभे राहण्याचे त्राण सुद्धा त्त्यांच्यांत नव्हते…कसंबसं दार उघडलं…आणि दारात निलेश च्या आजोबांना बघून खोल आवाजात म्हणाल्या…

तुम्ही..? आणि इथे…? चेहऱ्यावर भल मोठं प्रश्नार्थक चिन्ह होतं त्यांच्या…या ना …आत या…मग ते घरात आले…म्हणाले…मी रोज बागेत जातो…रोज तुमची वाट पाहतो…सवय झाली ना गप्पा मारायची…पण आठ दिवस झाले तुम्ही कुठे दिसल्याच नाही…

फोन करावा तर , तुमचा नंबर सुद्धा नव्हता…खूप काळजी वाटली…म्हणून न राहवून आलो भेटायला…सॉरी मी इथे आलेले तुम्हाला आवडले नाही का…? माफ करा चुकलंच माझं…
पण का माहित नाही…खूप काळजी वाटली तुमची…वाटत होत तुम्हाला नक्की बरं नसणार…आणि आपसूकच पावलं तुमच्या घराकडे वळली…येतो मी…असं म्हणून निलेश चे आजोबा जायला निघाले…

सुरेखा काकू म्हणाल्या तसं काही नाही हो…तुम्हाला अचानक इथे बघून आश्चर्य वाटलं… बाकी काही नाही…
बसा मी तुमच्यासाठी चहा टाकते…आणि चहा ठेवायला उठणार तेवढ्यात निलेशचे आजोबा म्हणाले…हे काय सुरेखा जी…अहो मला खरंच चहा नको…आणि हो तुम्हाला हवा असेल… तर मी मात्र ठेवतो चहा…तुम्ही आराम करा…
अहो तुमच्यात उठून उभं राहायचं सुद्धा बळ नाही…आणि निलेशच्या आजोबांनी दोघांचा चहा ठेवला…सोबत त्यानां विचारून… काहीतरी त्यानीं खावं म्हणून… बिस्कीटाचा डबा शोधून बिस्कीट खायला दिले…
एव्हाना संध्याकाळचे सात वाजले होते…मग निलेशचे आजोबा म्हणाले…

सुरेखाजी जेवणाचे काय…?
मी डबा आणुका घरून…?

माझ्याकडे बाई येते जेवण बनवायला…? सुरेखा काकू नाही म्हणाल्या…मग ते जायला निघाले…दारापर्यंत त्यानां सोडून त्या घरात वळल्या…आणि त्यानां जबरदस्त चक्करआली…दाराशेजारीच भिंतीला टेकून बसल्या…निलेशचे आजोबा पुन्हा घरात आले…त्याचा हात धरून पलंगावर आणून झोपवले…अंग जरा तापलं होतच…
मग त्यानीं घरी जायचा विचार रद्द केला…जेवण करणाऱ्या बाईला फोन करून सांगितले…आज येऊ नका म्हणून…एका भांड्यात पाणी घेऊन त्यानीं काकूंच्या डोक्यावर पट्ट्या ठेवायला सुरवात केली…थोडा ताप उतरला…मग त्यानीं मुगाच्या डाळीची मऊ खिचडी केली…दोघेही थोडे जेवले…काकूंना औषधी देऊन आपण तिथेच खुर्ची टाकून बसले…

रोजच्या प्रमाने विभाचा फोन आला…फोन निलेशच्या आजोबांनी उचलला…अनोळखी आवाज एकूण विभावरी थोडी चिंतित झाली…निलेशच्या आजोबांनी हे बरोबर ओळखले…ते म्हणाले ,
मी दामोदर डेकाटे…निलेश…

निलेश…बागेत तुमच्या मुलासोबत खेळायला यायचा…तो माझा नातू…
जर्मनीला असतो …एकदा मी आणि तो तुम्हाला भेटायला तुमच्या घरी देखिल आलो होतो…सुरेखाजी घेऊन आल्या होत्या आम्हाला…

आठवले… आठवले…पण काका तुम्ही इथे कसे काय…? मग त्यानीं त्याचे रोज भेटणे…आठ दिवस त्या बागेत दिसल्या नाही म्हणून घरी येऊन गेलो हेही सांगितले…आणि आज घडलेली सर्व हकीकत सांगितली…
विभावरी म्हणाली…काका बरं झालं तुम्ही वेळेवर आलात ते..!
नाहीतर आज काय झालं असत कोणास ठाऊक…?
दामोदर डेकाटे लगेच म्हणाले…तूम्ही आता काळजी करू नका…
मी आहे इथे…
विभावरी काळजीच्या सुरात म्हणाली…
काका… आता ताप कसा आहे आईचा…? आता ताप नाही…मी त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या होत्या…
आणि हो मऊ खिचडी करून खायला दिली…
औषधी घेऊन झोपल्या त्या आता…काळजी करू नका…पण काका रात्री काही झालं तर कोण बघेल हो..!
दामोदर डेकाटे म्हणाले…
तूम्ही सुरेखाजीची काळजी करू नका…आणि हो आज रात्री मी इथेच थांबतो आहे…त्यानां एकटं सोडून जावं इतकं त्यानां नक्कीच बरं नाही…
तेव्हा तुम्ही निश्चित राहा…त्या उठल्या की सांगतो तुमचा फोन येऊन गेला म्हणून…खूप खूप धन्यवाद काका म्हणून तिने फोन ठेवला…

तिच्या डोक्यात मात्र आज वेगळेच विचार येऊ लागले…आपण इतक्या लांब…बाबांसारखं अचानक आईला काही झालं तर…? इथे येऊन राहायला सांगतो तेही ऐकत नाही…मंदारचे आईबाबा बोलवतात तिकडेही जात नाही…काय आणि कसं करावं आईचं…?
मीही सारखं येऊन नाही राहू शकत…विचार करतच झोपी गेली…सकाळी पुन्हा फोन केला… दामोदर काका तिथेच होते…

ते म्हणाले ताप सारखा चढतो उतरतो…त्यामुळे एकदा डॉक्टरकडे घेऊन जातो…आधी घरी जाऊन पटकन आंघोळ करून…काहीतरी त्यानां खायला करून आणतो…मग घेऊन जातो डॉक्टर कडे… तुम्ही नका काळजी करू…मनापासून त्याचे आभार मानून तिने फोन ठेवला…

दामोदर काका सुरेखा काकूंना घेऊन डॉक्टरकडे गेले…त्यांना खूप अशक्त पणा आला होता …त्यामुळे ऍडमिट करून घेतले…तसाच दामोदर काकांनी विभावरीला फोन केला…

विभावरी…! दामोदर काका बोलतोय…! आईला ऍडमिट केले …! आईचे सर्व रिपोर्ट आले…त्यांच्या प्लेटलेट्स खूप कमी झाल्या होत्या…दोनच दिवसात विभावरी लेकाला घेऊन भारतात आली…दामोदर काकांच्या मदतीने आईचे सगळे करत होती…तिचे सासू सासरे पण आले…आता दामोदर काका अधेमधे येऊन जात होते…सुरेखा काकू आठ दिवस हॉस्पिटल मध्ये राहून घरी परत आल्या…दोन दिवसाने सासूबाई सासरे गेले…

आता विभालाहि जाणे गरजेचे होते…सुरेखा काकू बऱ्यापैकी सावरल्या होत्या…पण आपण गेल्यावर आपल्या माघारी आईचे काय…? हा प्रश्न तिला भेडसावू लागला…नेमका विचार चालू…तेवढ्यात दामोदर काका आले…त्यानां चहा पाणी देऊन विभा त्यान्च्या सोबत गप्पा मारायला बसली…

घरी कोण कोण असत…? मुलं किती…? नातेवाईक…? सगळी चौकशी केली…मुलगा, सून आणि नातू या व्यतिरिक्त त्यानां जवळचे असे कुणीच नव्हते…विभावरीच्या मनात आई आणि दामोदर काका यांच्या बद्दल विचारचक्र सुरु झाले…कसं बोलावं हाच विचार करत होती..

त्या बद्दल ती मंदार आणि त्याचे आईबाबा यांच्या सोबत पण बोलली…त्यानां आधी थोडे हे रुचले नाही…पण जात्याच समझदार कुटूंब त्यात आईची बालमैत्रीण त्यामुळे नंतर सासूबाईं , सासरे आणि मंदारला विभावरीचे म्हणणे पटले…सुरेखा काकूचा एकटेपणा आणि आजारपण या दोन्हीला कोणाची तरी सोबत नक्की हवी होती…त्यामुळे दामोदर काका एक चांगला मित्र…एक रूम पार्टनर…म्हणून विभावरीला जास्त आवडले…

प्रत्येक नात्याला नावंच किंवा नातंच असावं असं काही नाही…मैत्रीचं नातं हे सगळ्या नात्यात एक पवित्र नातं…जातपात, पैसा, वय, कशाचेही बंधन या नात्याला नसते…

विभावरीने पक्का निर्धार केला…आपण आज काकांशी त्यांच्या आणि आईच्या फक्त शुद्ध मैत्रीच्या नात्याबद्दल बोलू…पण हो एकत्र राहून जर त्यानां या नात्याला यू टर्न द्यावा वाटला…तर भावी बाबा म्हणून स्वीकार करायची तिची तयारी होती…उद्या तिचा अमिरीकेला जायचा दिवस उजाडणार… नेहमी प्रमाणे दामोदर काका भेटायला आले…विभावरीने चहा ठेवला …आणि गप्पांच्या ओघात मुद्याला हात घातला…

काका एकदम खुर्चीतून उठून उभेच राहिले…अग काय बोलते तू हे…? सॉरी जरा स्पष्टच बोलते काका…मला यात काहीही गैर वाटत नाही…एक चांगले मित्र म्हणून तुम्ही एकत्र राहा…काका मला माहित आहे…एकटेपणा खुप कठीण असतो…निदान या वयात तरी एकटेपण खरंच नको…आमचा नाईलाज आहे…आम्ही इकडे येवू शकत नाही …तुम्ही तिकडे मुलाकडे आणि आई सुद्धा माझ्याकडे येत नाही…त्यामुळे मला हा खूप छान सुवर्णमध्य सुचला…
काका हवं तर मी तुमच्या मुलाशी आणि सुनेशी बोलते…अग त्यांना विचारायची काही गरज नाही…कारण माझी सून आणि मुलगा भारतात येतात…तेव्हा प्रत्येक वेळी म्हणतात… बाबा एकतर आमच्या सोबत चला …नाहीतर तुम्हाला समजून घेणारी कुणीतरी शोधा…यात माझी सून काकणभर पुढेच…ती तर म्हणते बाबा , आपण पेपरला जाहिरात देऊ यात का…? पण मी तसा कधी विचारच केला नाही… काका मी माझ्या नवर्यासोबत तसेच त्याच्या आईबाबा सोबत बोलले…त्यानां काही प्रॉब्लेम नाही…काका प्लीज माझ्या बोलण्याचा नक्की नक्की विचार करा…उद्या मला अमेरिकेला जायचे आहे…त्याआधी तुमचा होकार आला तर मी आनंदाने तिकडे जाऊ आणि राहू शकेल…अन्यथा माझं शरीर तिकडे मन मात्र इथेच असेल…

दामोदर काका म्हणाले ते सगळं ठीक आहे विभा…पण बाळा लोक काय म्हणतील याचा विचार केला का तू…? हो काका त्याचाही विचार केला मी…आईला बरं नसतांना यातील नाव ठेवणाऱ्या लोकांपैकी कोणकोण मदतीला धावून आलं होतं… हे विचारू आपण त्या नाव ठेवणाऱ्या लोकांना…कुणीही मदतीला आलं नाही…तुम्ही मात्र जेमतेम एक सव्वा महिना झाला ओळखता आईला…पण किती केलंत… ? अग ते तर मी आताही करेन…तू का काळजी करते…? नाही काका …आता मला पूर्णवेळ आईची काळजी घेणारं माणूस हवं…

खरतर तुम्हा दोघांचीही…आणि त्यासाठी तुम्ही दोघे रूम पार्टनर होणं गरजेचं आहे…आईला तयार करेन मी…फक्त तुमचा होकार हवा…विचार करून उद्या सांगतो असं म्हणून काका घरी गेले…थोड्याच वेळात फोन केला…
विभा काका बोलतोय …बाळा रस्त्यात येतांना फार विचार केला…आणि खरंच मला तुझं म्हणणं पटलं… मी या विषयी माझ्या मुलासुने सोबत बोललो…त्यानां तर माझा निर्णय खूप आवडला…माझी सून जॅम खुश झाली…तू तुझ्या आईवर जशी माया करते…तशीच ती माझ्यावर करते…खरतर माझ्या मुलापेक्षा काकणभर जास्त माया ती करते…त्यामुळे त्याचा होकारच आहे…तेव्हा मी तुझ्या आईचा रूम पार्टनर व्हायला तयार आहे…तू आईशी बोलून घे…त्यानां मंजूर असेल तर मी उद्याच तुझ्या आईला …

अर्थात माझ्या मैत्रिणीला माझ्या म्हणजे आमच्या घरी घेऊन येतो…कधी इकडे कधी तिकडे असे राहू आम्ही… विभावरीने सुरेखा काकुला सुद्धा त्यासाठी तयार केले…हो नाही करताकरता सुरेखा काकूं सुद्धा तयार झाल्या…उद्या विभावरीला जायचे होते…थोडे दुःख नक्कीच होते…पण आईचा हात योग्य मित्राच्या हाती दिल्याचं आंतरिक समाधान जास्त होत…त्या समाधानातच तिचा डोळा लागला…
सकाळी दामोदर काका आले…चहा नास्ता झाला…खूप गप्पा झाल्या…विभावरीने जेवण बनवले…काहीतरी गोड करावं म्हणून मस्त ड्रायफ्रूट घालून शिरा केला…जेवनं झाली…आणि विभाची विमानतळावर जायची वेळ झाली…त्या आधी दामोदर काकांच्या हातात आईचा हात देत म्हणाली…आई , काका आज पासून तुम्ही बेस्टफ्रेन्ड… आणि जगासमोर एक आदर्श निर्माण कराल असे बेस्ट रुम पार्टनर…

आईची एका वेगळ्या नात्यात पाठवणी करून…घराला कुलूप घालून विभावरी विमानतळावर गेली…एक अनामिक आत्मशांती आज तिला लाभली होती…आता आईची फक्त आठवण काढायची होती…तिची काळजी घेणाऱ्या योग्य माणसाच्या हातात तिचा हात विभाने दिला होता…आज तरी ते फक्त रूम पार्टनर होते…आता ह्या नात्याला कोणता साज चढवायचा …हे त्या दोघांवर सोपवून…तिने अमेरिकेला प्रस्थान केले….

समाप्त…..

सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण