अनाथांची यशोदा – सिंधुताई सपकाळ

Spread the word

अनाथांची यशोदा  – सिंधुताई सपकाळ, यांची थोडक्यात जीवन यात्रा….

जन्माला आले तर मृत्यू चुकला नाही. पण, कायम दुसऱ्यासाठी झटत असलेले व्यक्तिमत्व गेले की त्रास होतो. दुसऱ्यांच्या लेकराला माया देणे सोपे अजिबात नाही, ते माईंनी केलं.

ओळख तिची अनाथांची माय,

प्रेमाला पोरक्या असलेल्या निराधारांची ती माय….

हिमती समोर तिच्या हरला तो काळ,

चिंधीची झाली सिंधू, सिंधू ची झाली माय….

अशी ओळख तिची, ती सिंधुताई सपकाळ…

     माईंच्या प्रेमाची एवढी सुंदर व्याख्या तयार झाली.

अनाथांची माय म्हणून जगभर ओळख असणाऱ्या ‘सिंधुताई सपकाळ’ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ साली वर्धा जिल्ह्यात झाला. जन्माला येताच त्यांच्या कुटुंबाला त्या नकोशा झाल्या, त्यामुळे त्यांना “चिंधी” या नावाने ओळखू लागले. त्यांच्या वडिलांनी मात्र त्यांचा हात घट्ट धरला. वडिलांच्या मायेची सावली त्यांना मिळाली.

माईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी २६ वर्षांनी मोठे असलेले ‘श्रीहरी सपकाळ’ यांच्याशी झाला. 18 व्या वर्षात त्यांना ३ मुले झाली. त्यानंतर त्यांनी महिलांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष चालू केला आणि तो त्यांच्या आयुषाचा संघर्ष झाला. सुरु केलेल्या संघर्षात एकट्या पडल्या पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. अनेक संकटे पार करून त्यांनी आपल्या आयुष्यातील अडचणींचा सामना केला.

पुढे त्या स्वतःचाच आधारस्तंभ झाल्या व अनाथ मुलांचा सांभाळ करू लागल्या. त्यापुढे जाऊन “अनाथांचा आधार” म्हणून ओळखू लागल्या. सिंधुताई अनाथांचा  सूर्य झाल्या. अनाथ मुलांसाठी आयुष्यभर अविरत सेवाकार्य करणाऱ्या ‘ज्येष्ठ समाजसेविका’ म्हणून त्यांची ओळख बनली. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

२०२१ साली “पद्मश्री पुरस्कार”, महाराष्ट्र शासनाचा “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार”, “अहिल्याबाई होळकर पुरस्कार”, पुणे विद्यापीठाचा “जीवन गौरव पुरस्कार”, ABP वृत्तवाहिनीचा “माझा सन्मान पुरस्कार” तसेच याच्या जीवनावर आधारित “मी सिंधुताई सपकाळ” चित्रपटाची निर्मिती झाली. “अनाथांची यशोदा” या नावाचा अनुबोधपट १६ फेब्रुवारी २०१४ साली प्रदर्शित झाला.

पण ‘सिंधुताई सपकाळ’, अनाथांच्या माय माऊली, आज (०४, जानेवारी, २०२२) आपल्यातून निघून गेल्या. शेवटी माईच एक वाक्य आठवतं, “आपल्या देशात जिवंतपणी व्यक्ती कळत नाही, तर ती जगातून निघून गेल्यावर कळते.” भयंकर यातना सहन करत प्रवास सुरू होता, आज प्रवास थांबला आणि ती वाट स्तब्ध झाली…

कधीही न भेटलेल्या पण त्यांच्या कामातून सदैव मनात घर करून अनेकांचे प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ असणारी माय अनाथांना पोरकं करून निघून गेली. त्यांच्या जीवनातून त्यांनी आदर्शवादी महिला आणि खंबीर महिला कशी असावी, हे अवघ्या महाराष्ट्राला दर्शविले.

एकवेळ अशी होती कि स्वतःला आसरा नव्हता पण पुढे जाऊन कित्येकांना आसरा दिला. सदैव महाराष्ट्र तुम्हाला आठवणीत ठेवील. सिंधुताईंच्या निधनाने नक्कीच अनाथांचा आधार हरपला. पण आज आपल्या देशाला सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या महिलांची फार मोठी गरज आहे. त्यांचे आत्मचरित्र महाराष्टार्तील प्रत्येक स्त्रीने वाचले व आत्मसात केले पाहिजे.