” चूक कोणाची “

Spread the word

” चूक कोणाची “

आज मी ऑफिस चे काम घरात बसून करत होतो…आई आणि बायकोला आधीच सांगितलं होतं…आई , सुधा आज मला खूप महत्वाचे मेल करायचे आहे…आणि ते वेळेत गेले पाहिजे…ऑफिसला जाईपर्यंत वेळ होईल…मी बॉस ला सांगितले आज मी घरूनच काम करतो…तेही त्याला राजी झाले…लवकर उठून आधी मेल चे काम करायला बसलो…

आईला आणि सुधाला हे ही सांगितले…दोन बायांनो बाबांना जरा आज माझ्यापासून दूर ठेवा…घरी असलो की सारखी काहींनाही कटकट चालूच असते त्याची…त्यामुळे माझं काम होणार नाही…उद्या बोलणी खावी लागेल ती वेगळी…मी बाजूच्याच स्टडी रूम मध्ये काम करत होतो…आईला बाबांशी बोलतांना ऐकलं…तिकडे जाऊ नका जरा वेळ…संदेश ला ऑफिसचे महत्वाचे काम करायचे आहे…
बाबांचा वरचा सूर पण ऐकला… हो हो कर म्हणावं त्याला काम…आज काम आहे…निमित्यच आहे…नाहीतर फारच काळजी घेतो बापाची…गप्पा मारायला वेळच असतो त्याला बापा सोबत..?

आई म्हणाली सुद्धा…अहो असे काय करता…? आपण लोकांची पोरं पाहतो…कसले उद्धट बोलतात हो आई वडिलांशी…संदेश लहानपणापासूनच खूप समंजस…तुम्ही एवढ्यातेवढ्या वरून किती संतापता…सारखं तुमच्याच मनासारखं झालं पाहिजे हा अट्टाहास…तरी तो मुलगा सगळं हसण्यावारी नेतो…तरीही तुम्ही तुमचाच हेका चालवता…बाबांचा पुन्हा वरचा सुर ऐकला…
हो.. हो.. मी म्हणजे आता बिनकामाचा माणूस ..! रिटायर्ड झालो ना..! आता यालाच एकट्याला तेवढे काम..! आणि काय ग..! काय घालून पाडून बोलतो मी त्याला…? नेहमी त्याच्या भल्याचाच विचार करत असतो न..! आई म्हणाला अहो ते सगळे मला मान्य आहे…पण म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्यावर लादू नका…घेऊ द्या थोडे त्याचे निर्णय त्याला…

रागानेच म्हणाले…मोठा निर्णय घेतो ..! काडीची तरी अक्कल आहे का..! अहो नसेल कदाचित…पण चुकणार तर समजणार…असं लादून कधीच समजणार नाही हो..! उलट तेढ वाढत जाणार…बरं.. बरं.. आता तुही मला तत्वज्ञान शिकवणार तर…तो नोकरीवर लागला तसं पाहतो आहे मी…दोघेही जरा जास्तच बोलायला लागले…
काहीतरीच काय हो तुमचं…? बरं आता सुधाने पोहे केले ते खाऊन घ्या…आणि तुमची आवडती कॉफी प्या…लवकर शांत व्हाल…आणि बाबा गप्प झाले…सुधाने तेवढ्यात पोह्याची प्लेट आणून दिलीच…आज तीही सुट्टीवर होती…सुधा तर यांच्या वाऱ्यालाही उभी राहत नाही…

हो..! पण तिचं आणि माझं मस्त बॉंडिंग आहे..! ऑफिस च्या एकेक गमती जमती सांगत असते…हक्काने मुलीसारखे लाड करून घेते..! आई नेहमी म्हणते…खरंच कौतुक करावी अशीच आहे माझी सून…पण बाबांचा स्वभाव असा…चिडका…म्हणून ती बोलायचेच टाळते…बाबांना आवडते म्हणून काय काय घेऊन येत असते..? पण त्यांना काडीचीही किंमत देता येत नाही कुणाला..

एक दिवस सुधाला त्याबद्दल संदेशशी बोलतांना ऐकलं सुद्धा…सुधा संदेशला म्हणत होती…संदेश बाबा किती सारखं सारखं तुला घालून पाडून बोलतात रे..! तुला त्यात काहीच कसं वाटत नाही..! ते तुला बोलतात रे ..! पण खरंच मला खूप त्रास होतो..! कधी वाटतं… चांगलं खडसावून विचारावं ..! तेव्हा संदेश काय म्हणाला हे एकूणच सुखावून गेले मी…

संदेश म्हणाला… सुधा..! अग त्यांच्या प्रश्नाला प्रतिउत्तर देणं खूप सोप्प …पण त्यामुळे फक्त घरात वाद निर्माण होतील…आणि या वादात कायम आई भरडली जाते ग…बाबा आधी पासूनच शीघ्र कोपी..! एवढ्या तेवढ्याने पण त्यांचा पारा चढतो..! मी मात्र आईला नेहमी शांत राहिलेले पाहिलं आहे…तुही तशीच शांत राहा…

पुढचे बोलणे एकूण तर अचंबितच झाले… माझ्या कानात ते सूर अजूनही घुमत आहे…संदेश सुधा ला सांगत होता…सुद्धा आईला मी खूपदा विचारले …आई का…? आणि कुठवर सहन करशील हे सगळं…? तेव्हा आई काय म्हणायची माहित आहे..! आई म्हणायची..! संदेश..! अरे..! अरे…ला कारे म्हंटल की वाद होणारच..! मी मौन धारण करते…त्यामुळे वादाच वादळ होत नाही..! आणि खरंच त्यामुळे या घरात वाद झालेले मला आठवत सुद्धा नाही…

सुधा खरतर मला तबल्या मध्ये करियर करायचे होते…मला काहीही वाजवायचा भारी छंद… ताट, वाटी, टेबल..जे मिळेल त्यावर ठेका धरून वाजवायचो…खूप विनंती केली बाबांना क्लास लावायला…म्हणाले बरं आहे..! करिअर नाही झालं तरी …तोच तबला घेऊन दारोदारी गाणं म्हणून भीक मागायला उपयोगी पडेल..! आईनी खूप समजावले…अहो हौस म्हणून क्लास लावू…त्याला का त्यात करिअर करायचे…? पण नाही… मला आवड म्हणून मग आईने…गुपचूप क्लास लावला…म्हणाली आवड म्हणून वाजवायला शिक…आणि हो क्लास लावला हे सांगू नको…नाहीतर माझं काही खरं नाही.

बऱ्याच गोष्टी मला आवडतात म्हणून आई गुपचूप करायला लावायची..! या कानाची त्या कानाला खबर नाही..! प्रत्येक गोष्टीत तडजोड केली आम्ही…बाबांच सारचं मुडी काम…कधी आईला कुठे फिरायला नेलेले पण मला आठवत नाही…मीच आईला कित्येक वेळा मित्रांसोबत न जाता…पिच्चरला घेऊन गेलो…कोणतीच हौसमौज केली नाही आईची.

विचारांच्या तंद्रीत संदेश ने हाक मारली…आई जेवणाचे झाले का ग..? भूक लागली…तशीच सुधा बाहेर आली…म्हणाली जेवण तयार आहे संदेश ..! पान वाढायला घेते लगेच..! आज तुझ्या आवडीची शेवयाची खीर केली आईंनी…भरपूर ड्रायफ्रूट घालून..! ऐकूण तोंडाला पाणी सुटले…लगेच जेवायला बसलो…येथेच्छ खिरीवर ताव मारला…जेवण आटपून पुन्हा राहिलेले काम उरकले…चार वाजले तोवर…मग मी सुधाला म्हणालो… चल आपण थोडा आराम करून…सिनेमाला जाऊ…सुधा म्हणाली, खूप दिवस झाले आईबाबांना घेऊन नाही गेलो…आज सगळे सोबत जाऊ…संदेश म्हणाला ठीक आहे…आणि तो बाबांना विचारायला गेला.

बाबांनी नेहमी प्रमाणे नकार घंटा वाजवली…नेहमी प्रमाणे आई म्हणाली जाऊन या तुम्ही दोघे..! मलाही कंटाळा आला..! संदेश म्हणाला… आई..! बाबा नाही म्हणतात, तर मग तूच चल..! राहूदे त्यांना घरी..! आणि हो त्यांच्या रात्रीच्या जेवणासाठी खिचडी करून ठेव..! आपण बाहेरच जेवू..! पुढे हेही म्हणाला… आई तू आमच्या सोबत येते आहेस..! तयारी कर..!

आणि आम्ही चहा घेऊन …यांना खिचडी करून सिनेमा पाहायला गेलो…येतांना बाहेरच जेवण केले…संदेश आणि सुधा प्रत्येक मेनू माझ्या आवडीचे मागत होते…खरंच खूप अभिमान वाटत होता त्या दोघांचा… त्याने फिश फ्राय मागवले…तीन तुकडे होते फिश चे…वाढतांना त्याने शेपटी कडचे पीस मला वाढले…मला शेपटी आणि डोके दोन्ही पीस आवडत नाही…संदेश लगेच म्हणाला…आई तू हि प्लेट घे..! मी म्हणाले अरे नको..! राहू दे…म्हणतो कसा…आई अग तुला हे पीस नाही आवडत माहित आहे मला..! चल हि प्लेट घे..! आणि माझ्या पुढ्यातली प्लेट उचलून घेतली…आई असून मी आज त्याच्यासाठी बाळ झाले होते..! आपण नाही का लहानपणी मुलांना आवडते ते पीस शोधून शोधून देतो..!
आज माझा लेक मला माझा बाबा वाटला..! हेवा वाटला मलाच माझ्या भाग्याचा..! दोन थेंब आनंदाचे डोळ्यात तरळून गेले..! क्षणात हेही वाटून गेले…किती दुर्देवी माझा नवरा..! इतके प्रेम करणारा मुलगा सून मिळाली…पण यांना त्याचे खरंच काहीच वाटत नाही…रात्री जेवून मस्त icecreem खाऊन घरी आलो…हे बाहेर ओटीवर बसून आमचीच वाट पाहत होते…

कधी अधेमधे ड्रिंक घ्यायची सवय आहे यांना…आज थोडी जास्तच घेऊन आलेले वाटत होते…डोळे लालभडक दिसत होते…आम्ही गेट उघडून आत आलो…आल्याबरोबर जोरात खेकसले… ही काय वेळ आहे यायची..? बाप घरी एकटा आहे विसरले वाटते…?
आणि काय ग…? तुला तरी काही वाटायला पाहिजे न…नवरा घरी आहे…निदान थोडे वेळेचे तरी भान ठेवायचे..? आणि अंगावर धावून आले…तसाच संदेश पुढे आला यांचा हात धरला आणि अलगद मागे ढकलले…यांचा तोल गेला आणि पडले…लागलं कुठेच नाही हे नशीब…मी आणि संदेश ने नेऊन बेडवर झोपवले…बडबड मात्र चालूच होती…मधेच कधीतरी झोप लागली…सकाळी उठले…त्याचे दोन मित्र रोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉक साठी बोलवायला आले.

हे रात्री मला मुलाने कसे ढकलून दिले…हे रंगून रंगून सांगू लागले…यांचा स्वभाव दोन्ही मित्रांना चांगलाच ठाऊक होता…मग ते जरा जोरातच म्हणाले…अरे भाग्यवान आहेस लेका ..! संदेश सारखा मुलगा आणि सुधा सारखी सून मिळाली…लेका हेवा वाटावा असे गुणी आहेत दोघेही..! आणि वहिनी तर त्यावर कळस आहे..! तुलाच लेका त्याची किंमत कधी कळली नाही..!

जरा माझ्या घरी चल..! आणि बघ..! माझा मुलगा आणि सून कसे वागतात ते..! अरे कधीच बोललो नाही…कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ..! कुणाला सांगणार..! मला तर एक गोड चुणचुणीत नातं आहे…तिला मांडीवर घेऊन खेळण्याचे सुद्धा माझ्या भाग्यात नाही…कारण माझ्या सुनेला ते आवडत नाही…
आजोबा डर्टी आहे म्हणून सांगते तिला..! कधी चुकून घेतलेच मांडीवर… तर..! तर..! आठवूनच अंगावर शहरा येतो रे..! माझी जेवणाची भांडी सुद्धा वेगळी आहे..! अजून खूप आहे…काय काय आणि किती सांगू…? आणि सांगून काय उपयोग…म्हणून म्हणतो लेका…आता तरी शहाणा हो..! वेळीच आवर स्वतःला ..! स्वतःची चूक दुरुस्त कर..! चूक कोणाची शोधत बसू नको..! आणि जर तू खरंच सुधारला नाही तर तुझं खरंच पुढचं काही खरं नाही…नंतर म्हणू नको…दोस्तांनी मला सांगितले नाही…सावध हो मित्रा…वेळीच सावध हो…

आणि ते तिघे फिरायला निघून गेले…जरा उशिरानेच घरी परतले…पण आल्यावर त्त्यांच्यांत आमूलाग्र बदल झाला होता…रात्री संदेश आणि सुधा घरी आले…बाबांनी संदेश ला हाक मारली…संदेश..! पण आजची हाक संदेशला का कोण जाणे आपलेपणाची वाटली…म्हणाला आई …सुधा… आजची हाक जरा प्रेमळ नाही वाटत का तुम्हाला..? मला तरी बाबाच्या हाकेतल्या शब्दाची धार जरा बोथट आहे असे वाटते… आणि हसतच तो बाबांजवळ गेला…

बाबांनी एक प्रेमळ कटाक्ष संदेश कडे टाकला…क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिले…आणि मग संदेश ला कडकडून मिठी मारली…म्हणाले… संदेश..! माझं खरंच चुकतं रे बाबा..! खरंच माझा स्वभाव खूप रागीट..! खूप त्रास दिला मी…तुला आणि तुझ्या आईला…नकळत सुधाला सुद्धा…
या बापाला माफ करशील बेटा..! खरतर मी माफी मागायच्या सुद्धा लायकीचा नाही…संदेश म्हणाला..! नाही हो बाबा… खरंच चूक माझीच आहे..! मी तुम्हाला समजून घेण्यात कमी पडलो..! आणि नेहमी पडतो..! बाबा म्हणाले… संदेश…चूक माझीच होती…बरंच झालं कालचा प्रकार घडला…त्यामुळे माझ्या मित्रांनी मला माझी चूक दाखवून दिली…पण आता चूक कोणाची हा विचार करायचा नाही..! आपण आता मात्र अशी चूकच करायची नाही..! माझा निर्णय पक्का आहे…फक्त एकदा तू मला माफ कर…आणि नकळत यांचे डोळे पाणावले…

मी म्हणालो … बाबा मी तुमच्यावर रागावलो तर माफ करणार न…उलट बाबा कालच्या प्रकरणात तुम्ही मला माफ करा….बाबा बोटाने डोळ्याच्या कडा पुसत म्हणाले… संदेश खरंच खूप भाग्यवान आहे मी…तुझ्या सारखा मुलगा आणि सुधा सारखी सून मिळाली…आणि तुझी आई…तिच्या साठी या पामरा जवळ शब्दच नाही…

बायको जवळ येऊन म्हणाले…संदेशाची आई जमल्यास माफ करा या पामरला…आई म्हणाली…अहो असे का बोलताय …? मी कधी काही बोलले का तुम्हाला…? बाबा म्हणाले… अहो..! तुम्ही कधी काही बोलला नाहीत…आणि म्हणूनच आमची चूक आम्हाला आजवर कळली नाही…वेळीच बोलला असतास तर…तर कदाचित ह्या पमरात सुधारणा झाली असती…तस नाही हो…
खरतर तुमच्या अश्या बोलण्याची सवय झाली आंम्हाला…कधी नाही बोललात तर चुकल्या सारखे वाटते…तुम्ही नका हो तुमच्या मित्रांचे म्हणणे इतके मनावर घेऊ…आणि त्यानीं जवळ जाऊन नवऱ्याचा हात हातात घेतला…

म्हणाल्या नका इतका त्रास करून घेऊ…तुमच्या शिवाय कोण आहे आम्हाला…बायकोला मिठीत घेऊन पुन्हा म्हणाले…खरंच एकदा माफ करा मला…प्लीज…आणि दोन्ही हात जोडले…संदेश…सुधा… आणि बायको…तिघेही त्यांचे हे वेगळे रूप डोळ्यात साठवून ठेवत होते…तिघांनाही जवळ घेतले त्यानीं…त्यांच्यातील हा बदल संपूर्ण घराला सुखावून गेला…

समाप्त….

सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण