‘स्नुषा दिन’

Spread the word

आपल्याकडे जितक्या जबाबदारीने आईचं ऋण मानलं जातं ..
जितकी जाण ठेवून बहिणीला मान दिला जातो ..
ज्या अधिकाराचं भान ठेवून सासूपुढे आब राखला जातो ..
ज्या मायेने मुलीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कर्तृत्वावर कौतुकाची पावती फाटते ..
तेवढ्याच समजुतीने … जबाबदारीने .. मायेनं … सुनेच्या वाट्याला एखादं ‘थँक यू’ का येत नाही ? 


हा आपल्या मानसिकतेचा दोष म्हणायचा की इथल्या व्यवस्थेचा ?
इथली स्त्री प्रत्येक रूपात पूजनीय आहे …
पण सुनेच्या रूपात तिला प्रचंड गृहीत धरलं गेलंय ..
आईचं त्याग डोक्यावर घेतला जातो .. मुलीचा त्याग डोळ्यात साठवला जातो ..
सुनेचा त्याग मात्र सहज नजरेआड होतो ..
मुलाकडून घडलेली चुकीची गोष्ट .. त्याचं खापर तिच्या डोक्यावर ..
‘हिनेच कान भरले असणार’
तिने समजून उमजून केलेल्या कामाचं श्रेय मात्र मुलाला ..
‘ह्यानं सांगितलं असणार .. नाहीतर तिला कुठलं इतकं सुचायला ?’
कामं करवून घ्यायला ती हक्काची .. सुनवायला ती हक्काची ..
पण जेव्हा हक्क दयायची वेळ येते तेव्हा …
‘केलंन तर बिघडलं कुठे .. ‘
चार शब्दांत कायम बोळवण …
खूप जवळून खूप घरांत हे पाहिल्यावर .. मनापासून वाटायला लागलंय …
‘सून’ ही पायरी टाळून सरळ वरची पायरी गाठता आली असती तर ..
तर कदाचित आमच्या देशातली स्त्री जास्त सुखी झाली असती ..
मला हुंडाबळी बद्दल बोलायचंच नाहीय ..
घरगुती अत्याचार हा माझा विषयच नाही ..
माझी साधी सरळ तक्रार आहे .. 


सोयीस्कर डोळेझाक करणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाबद्दल ..
मोठे अपराध होतात .. तेव्हा वेदना दिसते तरी …
पण मनात रोज रोज झिरपणाऱ्या वेदनेचं काय ?
तो ज्वालामुखी तसाच धगधगत किती दिवस ठेवायचा तिनं .. ? 


मला मातृदिन .. पितृदिन या संकल्पना कधी फारशा पटल्या नाहीत ..
पण एक ‘स्नुषा दिन’ ही आपल्या समाजाची नक्कीच गरज आहे ..!!