“सर्व सखींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”…

Spread the word

कालच्या लेखाच्या like आणि कंमेन्ट ने खूप बोर्नव्हिटा मिळाला…लेखनास नवीन उमेद आली…

 

“आणि त्या बदलल्या”.. भाग 2

फोटो पाठवला त्याने..
“हॅन्डसमच होता तो..!
फोटो पाहून तरी सगळ्यांना आवडला…विशेष म्हणजे… निकिताला…मग सासरे म्हणाले… त्यालाच पुढच्या शनिवारी किंवा रविवारी बोलव इकडे…त्याचे तुला भेटणेही होईल…शिवाय निकिता आणि त्याला मोकळेपणाने बोलता येईल …

त्रिज्जाने पुन्हा लगेच त्याला फोन केला…
हॅलो अमित …!
मी त्रिज्जा …
अमित जरा स्पष्ट बोलते…फोटो पाहून तरी घरी सगळ्यांना तू आवडलास…मुख्य म्हणजे निकिताला…तू सुद्धा फक्त फोटोच पाहिला आहे…तेव्हा माझ्या घरी सगळयांचे म्हणणे असे पडले की…तू येत्या शनिवारी किंवा रविवारी मुंबईला ये…निकिताला बघून घे, जर तुमची एकमेकांची पसंती झाली तर… तुम्हा दोघांना बोलायला जरा मोकळीक मिळेल…

तुम्हा दोघांची पसंती झाली तर… मग काका काकूंना दाखवून पुढची बोलणी करू…” जमेल का तुला यायला”..?
दोन दिवसात सांगतो…
थँक्यू …थँक्यू…तायडे… असे म्हणून त्याने फोन ठेवला…

दुसऱ्याच दिवशी त्याचा फोन आला …ताई मी शनिवारी सकाळीच येतो…रात्री परत पुण्याला जाईन… आई बाबांच्या कानावर घातले मी तुझे बोलणे…
अमित मला काकांचा किंवा काकूचा नंबर दे…मीही त्यांच्याशी बोलून घेते…ओके ताई…बाकी भेटून बोलू…आणि त्याने फोन ठेवला…

सगळेच शनिवारची आतुरतेने वाट पाहत होतो…तोही खूप आतुर झाला होता… व्हाट्सअप्प वर सांगत होता…भेटण्यास उत्सुक म्हणून…
शुक्रवारी रात्री फोन केला…ताई मी येतोय उद्या…

बरोबर सकाळी दहा वाजता अमित आला…फोटो पेक्षाही सुंदर दिसत होता…आम्ही सगळे पाहतच राहिलो…त्रिज्जा तर मनोमन म्हणाली सुद्धा… खूप छान दिसेल निकिता आणि अमितची जोडी..!

चहा , नास्ता झाला…थोडं बोलून निकिता अमित बाहेर गेले…
मॉल मध्ये फिरणं, खाण आणि एकमेकांना आपली पसंती देऊनच दोघे घरी आले…

आल्या आल्या अमित बोलला…ऐका… ऐका… ऐका..!

ताईसाहेब आणि सर्वांनी ऐका…
मला निकिता माझ्या आयुष्यभराचा जोडीदार म्हणून पसंद आहे…पुन्हा मस्करीत हेही म्हणाला… पण ताई तुझ्या नंदेला मी पसंद आहे की नाही हे नाही सांगितले बुवा तिने…आणि निकिता लाजून आत गेली…

पुढच्या रविवारी त्रिज्जाचे आई, बाबा, काका, काकू, अमित आणि त्याचा एक मित्र आला…पसंती तर झाली होती…हि औपचारिकता बाकी होती…तीही पूर्ण झाली…
लगेच ब्राम्हण बोलवून साखरपुडा आणि लग्नाचा मुहूर्त काढला…

थाटात लग्न झाले…आणि निकिता सासरी गेली…तिला मात्र ही नोकरी सोडावी लागली…कारण तिची कंपनी पुण्यात नव्हती…
हनीमून करायला सित्झर्लंडला गेले दोघे…

आठ दिवस फिरून…अमितने ऑफिस जॉईन केले…आणि निकिताने नोकरी साठी फॉर्म भरायला सुरवात केली…रोज कुठेतरी मुलाखत दयायला जात होती…कुठे पॅकेज चांगले होते, पण मनासारखा जॉब नव्हता…तर कुठे काय…एका ठिकाणी लागला एकदाचा जॉब…

आणि निकिता सुखावून गेली…आधीपेक्षा हि पगार जास्त होता…सकाळी अमित आणि निकिता…दोघेहि ऑफिसला जात होते…सुरवातीला सासूबाई अमित आणि निकिता चा डबा करून देत होत्या…

अचानक त्या आजारी पडल्या…रात्री निकिताला म्हणाल्या …
निकिता…! मला जरा बरं वाटतं नाही…तेव्हा तुमचे दोघांचे सकाळचे डबे करायला मला नाही जमणार…तूच करून घेशील बेटा..!

निकिता तेव्हा हो म्हणाली…पण जेवण बनवायची बोंबच होती…
बेडरूम मध्ये गेली…अमितला म्हणाली… अमित..! उद्या तुला डबा नाही दिला तर चालेल का..?

तो म्हणाला चालेल ग..! त्यात काय एवढं..! का ग..! आई कुठे चालली की काय…!
नाही रे…! पण मग असं का विचारते तू…! काही नाही रे ..! आईना बरं नाही… त्या मला म्हणाल्या उद्या डबे तू कर…!
अच्छा असं होय..!
म्हणजे उद्या बायकोच्या हातचे जेवण मिळणार..!
तसं नाही अमित..!
अमित मस्करीत म्हणाला..!
मग कसं..!
मग ती हळूच म्हणाली…
अमित..! मला जेवण बनवायला येत नाही रे..!
काय..?
अमित जरा उडालाच..!

हो अरे मला जेवण नाही बनवता येत..!
अग काय बोलते तू हे..!
पुरुष असूनही मला उत्तम जेवण बनवायला येत..!आणि तू म्हणते तुला जेवण बनवायला येत नाही..!

ठीक आहे निकिता …आपण उद्या बाहेर जेऊ…पण आई बाबां च्या जेवणाचे काय..? आणि जर आईला चार दिवस बरं वाटल नाही तर..!

तर..! काय अमित..?
अरे आपण बाई ठेऊ जेवण बनवायला…माझ्या आईकडे पण आहे बाई…अमित म्हणाला…निकिता हे सगळं ठीक आहे…पण आईला जेवण बनवायला बाई आवडत नाही …

एकदा ती खूप आजारी होती…तेव्हा तर मी आठवी, नववीत असेन…आई झोपून असायची…पण तिने सांगून सांगून आमच्या कडून जेवण बनवून घेतले…आता मला उत्तम जेवण बनवायला येत..!

बाबा सुद्धा शिकले..!
तुही असच शिकशील..!
आई एकवेळ चपातीला बाई ठेवेल…पण भाजी …!
नो वे..!चालणारच नाही..!
ती तुला किंवा आईलाच करावी लागेल…

उद्या आपण अस करू ..! मी जरा लवकर उठतो…तू भाजीची तयारी करून ठेव …मी भाजी करतो…तू चपाती कर..! म्हणजे आईबाबाचा पण प्रॉब्लेम solve होईल…
अरे पण मला पिठच भिजवायला येत नाही तर चपाती कशी करू…!

आता तर अमित अजूनच उडाला…पण मग सावरून घेत म्हणाला…ठीक आहे…चपाती सुद्धा मीच करतो…

पण तू तुझ्या आईला किवा वहिनीला फोन करून विचार…! सगळ कस करायचे ते…किंवा आल्यावर आईला विचारून, विचारून कर…
हो म्हणून निकिताने वेळ मारून नेली…

अमित ने सकाळी पोळी भाजीचा डबा केला…आईबाबांसाठी पण करून ठेवला…जातांना बाबांना म्हणाला …
बाबा…डाळ आणि तांदूळ काढून ठेवले निकिताने…तुम्ही गरम गरम वरण भात आईसाठी लावून घ्याल… आणि दोघे ऑफिस ला निघून गेली… दुपारी डबा खाता खाता निकिता ने आईला फोन केला…

सासूबाई आजारी असल्याचे सांगितले…त्यामुळे अमितने जेवण बनवले हेही सांगितले…आणि मग म्हणाली…
आई, मी आता वेगळी राहायचा विचार करते..!
आई म्हणाली का…?
तर निकिता म्हणाली…आम्ही दोघे इतका पगार कमवतो…पण काय …?
पण काय निकिता..?
काय झालं ते स्पष्ट सांग..! घरी येऊन शेवटी आहे आमच्या वाट्याला जेवण बनवणे..!
आई हे मला जमणार नाही..!

आणि अमितच्या आईला जेवण बनवणाऱ्या बाई चे जेवण म्हणे आवडत नाही..!

आई, मी आजच अमितशी बोलते या विषयावर…एकतर जेवण बनवायला बाई ठेव..! नाही तर आमचा पुण्यात अजून एक फ्लॅट आहे…तिथे राहायला जाऊ..!
नोकरी करून हे असे..

“रांधा वाढा उष्टी काढा “…

मला नाही जमणार…आईने लगेच मुलीच्या म्हणण्याला दुजोरा दिला…म्हणते कशी..!
अगदी बरोबर बोलते तू..! काही नको ते जेवण बनवायला..!
ठेवा म्हणावे बाई..!

आणि इतका पैसा ..! मग त्याचे करायचे काय ..? अजिबात करू नको काही काम..!
ठणकावून सांग..! मी हे करणार नाही..! माझ्या माहेरी हे सगळं करायला बाई आहे म्हणावं..!

निकिता घरी आली, मुद्दाम जरा उशिरानेच आली…अमितला फोन करून सांगितले…आज मीटिंग आहे थोडा उशीर होईल…

अमित आज जरा लवकरच आला होता…त्याने कुकर लावला…आईने बसल्या बसल्या भाजी चिरून दिली…अमितने फोडणी घातली…आणि पीठ सुद्धा मळायला घेतलं…तोवर निकिता आली…तिने कस्याबस्या भारताचा नकाशा पोळ्या केल्या…जेवणं झाली…
अमितची आई जेवण झाल्यावर म्हणालीच…निकिता..! तुला पोळ्या नाही करता येत का..?

सॉरी जरा कडकच झाल्या , आणि गोल म्हणून नाहीच…म्हणून विचारले…अग बोलायचे ना तू..! मी तुला छान पोळ्या करायला शिकवल्या असत्या…!

निकिता जरा रागातच म्हणाली…आई मला, मला जेवणातले …फक्त जेवण करणेच माहित आहे…जेवण बनवणे माहीत नाही…
लगेच सासूबाई म्हणाल्या…
हरकत नाही ग..!
मी शिकवीन सगळ..!
अमितला बघ सगळ करायला येत…हळूहळू तूही करशील…गुस्यातच अमितच्या मदतीने सगळ आवरून झोपायला गेली…

गेल्या गेल्या अमित चे डोके खाऊन झाले…अमित मी आत्ताच सांगते..! हे जेवण वगैरे करणं मला जमणार नाही..! एकतर बाई ठेव..! नाहीतर आपण आपल्या दुसऱ्या फ्लॅटवर रहायला जाऊ..!
नाहीतर मी आईकडे निघून जाते..!

अमित समजावनिच्या सुरात म्हणाला…अग तुला वाटतं तितकं सोपं असतं का हे..? ठेऊ आपण बाई…पण थोडा वेळ जाऊ दे..!

आज आईला बरं नाही म्हणून…तिला बरं वाटलं तर तुझ्या आधी उठून तिचा डबा तयार असेल…ओळखतो ग मी माझ्या आईला..! सून आली म्हणून ती काही करणार नाही …हा स्वभावच नाही तिचा..! उलट तुला आयत खायला देईल… थोडा धीर धर..!

पण हिचे मात्र तेच…शेवटी तो रागाने म्हणाला…तुला जे करायचे ते कर..! मी हे घर सोडून..माझे आईबाबा यांना सोडून कुठेही जाणार नाही..!आणि तोंडावर पांघरून घेऊन …कुस बदलून झोपी गेला…

झोप तर कोसो मैल दूर गेली होती…पहाटे पहाटे डोळा लागला…दुसऱ्या दिवशी निकिता डबा न करता ऑफिस ला निघून गेली…अमित पण गेला…

आईने बाबांच्या मदतीने मऊ खिचडी करून खाल्ली…दुपारी निकीताचा अमित ला फोन आला…
अमित…! मी आज ऑफिस मधून हाफ डे घेतला आहे…आज मी मुंबईला आईकडे जाते…आणि फोन ठेऊन दिला…

अमितला वाटले…निकिता नक्की मस्करी करत असणार…इतक्या क्षुल्लक कारणासाठी इतक्या टोकाचा निर्णय कुणी कसा काय घेणार…?
आणि तो कामाला लागला…

संघ्याकाळी निकीता ला अमित ने फोन केला…मोबाईल swichoff लागत होता…आता मात्र तो हादरला…बापरे…!
खरचं गेली की काय ही माहेरी..!
पार गोंधळून गेला तो…त्याने त्रिज्जा ला फोन केला…पण सांगायचे धाडस होत नव्हते…
शेवटी सगळं बळ एकवटून तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली…

त्रिज्जा फक्त अच्छा असं होय इतकंच म्हणाली…बोलते तिच्याशी…एवढ बोलून फोन ठेवणार… अमित बोलला… ताई ती तिकडे आली तर मला नक्की कळव…!

खूप काळजी वाटते ग..!

अन हिच्या असल्या मूर्खपणा मूळे घरी काय सांगू..! हेही कळत नाही ग..!

क्रमशः…

सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण