वेडी

Spread the word

त्याने बुकडेपो च्या दुकाना समोर गाडी लावली नेहमी सारखी आणि नेहमीचे ठरलेले ऑफिस साठी लागणारे न्युजपेपर घेऊ लागला. त्याचा हा वर्षा 2 वर्षा पासूनचा नित्यक्रम होता. यात बदल फक्त कधीतरी मिळणारी किंवा त्याने घेतलेली सुट्टी च करायची. ती हि समोरच होती. कपड्याची सूद नसलेली. कपडे जागोजागी फाटलेले. त्यातून निसर्गाची किमया डोकावत होती. कमरेला एक अंत:वस्त्र. त्या खाली काही नाही. केसांच्या बटाणा विविध रंगीबेरंगी दोऱ्या रिबिनी बांधलेल्या आणि रस्त्या ,कचऱ्यातून जमा केलेल्या वेगवेगळ्या रंग आकाराच्या नवीन जुन्या पिना लावलेल्या.पायात कधीच काही घालायची नाही. सोबत एक भलंमोठं गाठोडं गळ्यात अडकवलेलं. त्यात बहुतेक लोकांनी दिलेलं काही बाही भरलेल असावं.
तो समोर असे पर्यंत ती त्याला एकटक पहात राहायची. तो मात्र नजर चोरायचा. तिच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत त्याच्यात नव्हतीच. कारण तिच्या नजरेतील प्रश्न त्याला वाचायचे नव्हते. तिच्या डोळ्यातील आशा बघायची नव्हती. ती तशीच गुपचूप तो जाई पर्यंत तिथेच उभी राहायची. हे रोजचच होतं अपवाद कधीतरी आलेली सुट्टी.
ऑफिसवर पोहचून त्याने नित्यक्रम उरकली आणि टेबलावर जाऊन बसला. आता साहेब येई पर्यंत फक्त आले-गेलेल्याचे निरोप घ्यायचे होते. निवांत क्षणी ती आठवायची त्याला तशी आता हि आठवली पण एक वर्ष आधीची. नीटनेटकी राहणारी, लाजून बोलणारी, मनात असंख्य स्वप्न साठवून हि गप्प राहणारी. त्यांचं प्रेम बहरल होतं. दोघांच्या मनात लग्नाचे विचार मनात घुटमळू लागले होते . तिला सांगायच्या आधी त्याने घरच्यांना विचारलं नी तिथेच खेळ संपला. घरच्यांनी आधीच मुलगी बघून ठेवली नव्हती तर सोयरीक पक्की केली होती. भरपूर हुंडा आणि घर ,जमीन, जागा मिळणार होती तिच्या रुपात. घरची परिस्तिथी बदलणार होती, बहिणींची लग्न होणार होती. आयुष्यभर कष्टात दिवस रात्र खपलेल्या म्हाताऱ्या आई-बापाचे शेवटचे दिवस सुखात जाणार होते. पोरगी गावातील मामाचीच मुलगी होती.
त्याच्या इच्छेला तिथल्या तिथे नाकारण्यात आले आणि आईबापाला डावलून जाण्याची त्याची हिम्मत नव्हती. त्या नन्तर तो तिला टाळू लागला. ती सारखी भेटायला ,बोलायला बघायची पण हा प्रतिसाद द्यायचा नाही आणि ठरल्या दिवशी त्याच लग्न हि झालं.
त्या दिवसानन्तर ती त्याला कधीच माणसात दिसली नाही. कुठेही फिरायची, कशी हि राहायची. नं कपड्यांची पर्वा नं काळ वेळे च भान. निसर्ग आपली कर्तव्य पार पाडतच असतो. तिच्या बाबतीत हि त्याने कामचुकारपणा केला नाही. फाटलेल्या कपड्यातून त्याची किमया दिसायची आधीमधी.
ती रोज येऊन दुकान समोर थांबायची आणि त्याला डोळ्यात प्रेम ,आशा, वेदना घेऊन पहात राहायची तो जाई पर्यंत. तिने एकदाही केल्या कर्माचा जाब विचारला नाही कि त्याला दोष दिला नाही. म्हणूनच तो अजूनच अपराधी व्हायचा आणि तिच्या समोर खाली नजर करून असायचा. पण आज त्याने पक्का निर्णय घेतला तिथे न थांबण्याचा. तीच बघणं नको आणि आपलं अपराधिपन वाढायला नको म्हणून तो तिच्या समोर जाणार नव्हता उद्या पासून. घरी गेल्यावर हि त्याने मनाची तयारी सुरु केली होती. हजारदा मनाला बजावलं होतं.
सकाळी ठरल्या वेळेला तो तिथे आला मात्र थांबला नाही तसाच पुढे गेला. ती तिथेच होती. त्याची वाट पहात. तो न थांबता जातोय हे बघताच ती हि धावत सुटली त्याच्या मागे. त्याच अपराधिपन अजून वाढलं नी गाडीचा वेग हि. साईड मिरर मधून ती उर फुटेस्तो पळताना दिसली आणि दिसेनाशी झाली मात्र त्यानंतरचा प्रत्येक क्षण त्याने तलमळून काढला. स्वतःला लाख दूषण दिली. आपल्या भ्याडपणा साठी मनातल्या मनात हजारदा थोबाडीत मारून घेतलं आणि रात्री उद्या पुन्हा तिच्या समोर जायच, तिला बघायचं ठरवल्यावरच त्याच मन थोडं शांत झालं.
दुसऱ्या दिवशी त्याने दुकाना समोर गाडी लावली आणि पेपर घेतले पण तो शोधत होता तिला. ती त्या जागेवर नव्हती. त्याने आजूबाजूला, रस्त्यावर, पलीकडे नजर फिरवली पण ती दिसलीच नाही. न राहवून दुकानदाराला त्याने तिच्या बद्दल विचारलं त्याने जे सांगितलं त्या नन्तर पुढचं आयकायला तोच माणसात उरला नव्हता आता.
दुकानदार सांगत होता” साहब कल वो रस्ते पे भाग रही थी. पीचेसे ट्रक आया और उसको कुचलके चला गया. अच्छा हुआ साब. वैसे भी वो कहा जिंदा थी”

प्रिस्का