वृद्धाश्रम

Spread the word

वृद्धाश्रम

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध बालरोगतज्ञ श्री डॉ. अरुण गोधमगावकर यांची करूण कहाणी वाचनात आली अहमदपूर मधील रुक्मिणी वृद्धाश्रमात जेव्हा त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या अमेरिकास्थित मुलगा व सुनेने आमचे येणे होणार नाही अंत्यविधी उरकून घ्या असे कळवले आणि आश्रमातील कर्मचार्यांनी साश्रुनयनांनी डॉक्टरांना अखेरचा निरोप दिला. दुर्दैवाने आपण ज्या समाजाचे भाग आहोत.
त्या समजात वृद्धाश्रम नावाची व्यवस्था आजही अस्तित्वात आहे, विचारचक्रात अडकलेली, कित्येक आई बाबांच्या स्वप्नांची सुखलेली पालवी तिथे पायाखाली चिरडली जात असेल निष्ठुर मुलांच्या पायाखाली…. एक हाड मोडले तर वेदना असह्य होतात मग अशी अनेक हाडे तुटण्याएवढी वेदना सोसून जन्म देणाऱ्या आईची किंमत आणि हाडे झिजे पर्यंत आपल्याला सांभाळणारा बाप याची किंमत फक्त नावापुढे लावण्यासाठी आणि जात चोरण्यासाठी तर करत नाही आहोत ना याचा विचार करण्याचे शहाणपण प्रत्येकाला मिळो.
थोडे मागे डोकावून पहिले तर लक्षात येईल कि गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात जात असताना मातापित्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे सुख असे, कमविलेली सम्पत्ती योग्य हाती सोपवून ईश्वराची, समाजाची सेवा करण्यासाठी सर्व संसाराचा त्याग करायचा असे अलिखित नियम पण कालांतराने मानवी मानसिकतेत संकुचित वृत्ती येऊन उपयोग्य वस्तूंनाच घरात ठेवण्याची मानसिकता दृढ झाली किंबहुना ज्या आई वडिलांनी शिकवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले त्यानाच अडगळीच्या सामानासारखे बाहेर काढले गेले आणि परफेक्ट फॅमिलीची चौकट पूर्ण करण्याचा अयशस्वी प्रयत्नही झाला फक्त या जाणिवेतून कि वृद्धाश्रमात पैसे पाठवून आपण मुलगा होण्याचे कर्तव्य पूर्ण पार पाडू शकतो पण कोणी हा विचार केला आहे का कि पैशाने फक्त भौतिक वस्तू विकत घेता येतात आईची ममता आणि पित्याचे प्रेम नाही.

परदेशी किव्वा मोठ्या शहरात आज अनेक तरुण रोजगारार्थ बाहेर पडतात तेथेच स्थायिक होतात नव्याचे नऊ दिवस त्याप्रमाणे रोज घरी फोन असतो पण हळू हळू कामात एवढे व्यस्त होतात की घरच्यांची आठवणही सवडीने काढली जाते घरी आपली म्हातारी आई वाट पाहत आहे याचाही विसर पडतो सणासुदीला येणे होते पण कालांतराने याचे रूपांतर’ सुट्टी नाही ‘म्हणून येणे होणार नाही असे होते आणि दरी वाढत जाते… कधीतरी पित्याचे कार्य उरकून घ्या सुट्टी नाही असेही दुर्दैवी स्वर गावकऱ्यांच्या कानी येत असतील.. यातूनच वृद्धाश्रम ही व्यवस्था अस्तित्वात येत नसेल ना…..! मुंबईत छोट्याश्या खोलीत आई वडिलांची अडचण नको म्हणून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करणारी भावनाशून्य माणसेही जगात आहेत पण त्यांना हा विचार का शिवत नाही कि मोडकळीस आलेल्या घरात त्याच आई बाबांनी अगदी ताकदीने संसार करून आपले पालनपोषण केले !

आज खेदाने म्हणावे लागते कि माणसाने आज खूप डिग्र्या घेतल्या पण आई बापाचे प्रेम समजण्याचे धडे त्याला कोणत्याच विद्यापीठातून मिळाले नाहीत…. चाकोरीबाहेर जीवन जगताना व्हाट्स अँप फेसबुक वर हजारो फ्रेंड्स जमवताना घरातील असे फ्रेंड्स तो कायम दुर्लक्षित करतो जे हसण्यामागचं दुःख समजून घेऊ शकतात…..भारतासारख्या सुसंस्कृत देशात जन्मदात्यांची रवानगी आश्रमात करणे हे अनाकलनीय आहे कारण आई वडील हेच गुरु ही आपली संस्कृती आहे…. कोणत्याही आश्रमात जा तिथे सर्व डोळे वात्सल्याचे भुकेले दिसतील मायेच्या हळव्या स्पर्शासाठी हात आसुसलेले दिसतील तुमचे दोन प्रेमाचे शब्द त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारे असतील कारण माणसांची किंमत ओळखण्याची हातोटी त्यांना नकळत प्राप्त झालेली असते…. आश्रमात भेटावयास आलेल्याना मायेने जवळ बोलावून त्यांच्या रूपात स्वतःच्या मुलांना, नातवांना भेटण्याचा क्षणिक आनंद ते घेत असतात त्यांना तुमचे पैसे नको असतात त्यांना हवे असतात मायेचे चार शब्द, मायेचा स्पर्श हवा असतो कधीतरी असाही विचार जरूर करून बघा मुलांचे वाढदिवस आश्रमात जाऊन करा मुलांना लहानपनीच ती ओढ लागूद्या आजी आजोबांची.. कारण असे संस्कार कोणत्याही ट्युशन मध्ये विकत मिळणार नाहीत कितीतरी आजी आजोबा वाट बघत असतील आपली.

माणसाचा जन्म पुण्याईने प्राप्त होतो असे शास्त्र सांगते पण आईच्या उदरात स्वर्ग सुख असते हे सर्वांना क्वचितच समजते खूप पुण्यवान असतात माणसं ज्यांना आई बाबा असतात,दुर्दैवी नशीब त्यांना विचारा जे पोरके असतात..वृद्धाश्रमासारखी दुर्दैवी दुसरी वास्तू नसेल कारण तिथल्या भिंतीनी रोज दुभांगलेली मने उद्विग्न होऊन रडताना पहिली असतील कित्येक माय लेकरांची ताटातूट त्यांनी पाहिली असतील कित्येक मुलाशिवाय बापाला दिलेला भडाग्नी पहिला असेल ……या शाश्वत जगात अशाश्वत सुखाच्या मागे झेपावताना काही सुटले तर नाही ना यासाठी मागे वळून निच्शितच पाहिले पाहिजे कारण जगाच्या बाजारात प्रेम देणारी वस्तूची किंमत मोजता येण्याएवढा श्रीमंत जन्मला नाही आणि जन्मणाराही नाही.छोट्याश्या आयुष्यात भरभरून जगताना त्यांचे ऋण विसरू नका ज्यांच्यामुळे आपण सुदर जग पाहण्यासाठी जन्म घेतला. भविष्यात एकही वृद्धाश्रम निर्माण करण्याची वेळ येऊ नये कोणतेही जन्मदाते मुलांशिवाय पोरके होऊ नये कारण तुमची कोट्यवधी रुपयांची सम्पत्ती ओवाळून टाकली तरी तुम्हाला त्यांच्या अश्रूंची किंमत करता येणार नाही….. एका वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिले होते…

सुकलेल्या पानांवरुन सम्भाळून चाला:
कधीतरी याच पानांनी तुम्हाला सावली दिली होती

– भाग्यश्री महादेव रेवडेकर,सिंधुदुर्ग