वजन आणि चरबी कमी करण्यासाठी करा व्हिटॅमिन सी युक्त फळांचं सेवन!

 

वजन आणि चरबी कमी करण्यासाठी करा व्हिटॅमिन सी युक्त फळांचं सेवन!

फळं आणि हिरव्या भाज्यांचं नियमीत सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि त्यातून शरीराला वेगवेगळे पौष्टिक तत्व मिळतात हे सर्वांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या फळांमुळे शरीरात रक्तप्रवाह तर वाढतोच सोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. सध्या अनेकांना भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे वाढलेलं वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी पचन शक्ती चांगली असणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही फळं असेही आहेत ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्याचं टेन्शनही कमी होऊ शकतं. व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचं हिवाळ्यात सेवन केल्याने तुम्ही फिटही रहाल आमि तुमच्या पोटाच्या समस्याही दूर होतील.

संत्री खा, ज्यूस टाळा.

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असाल तर संत्र्यांचा ज्यूस सेवन करण्याऐवजी नुसती संत्री खा. संत्र्याच्या ज्यूसमध्ये संत्रीपेक्षा जास्त कॅलरी असतात. संत्र्याच्या एक ग्लास ज्यूसमध्ये संत्रीपेक्षा दुप्पट कॅलरी असतात. त्यामुळे तुम्ही जर रोज संत्र्याचा ज्यूस घेण्याऐवजी केवळ संत्री खाल्लीत तर तुम्ही वर्षभरात १९ हजारपेक्षा जास्त कॅलरी बर्न करु शकता. त्यासोबतच संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने तुमची भूकही शांत होत नाही, कारण त्यातून फायबर नष्ट झालेलं असतं.

वजन कमी करण्यास फायदेशीर द्राक्ष

द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी सोबतच फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास अधिक फायदा होतो. यासाठी तुम्ही आहारात नियमीतपणे द्राक्षांचा समावेश करा. याने तुम्हाला काही आठवड्यातच फरक बघायला मिळेल.

स्नॅक्स म्हणून खा सफरचंद

अधेमधे भूक लागली तर तुम्ही तेलकट किंवा तळलेलं काही खाण्याऐवजी स्नॅक्स म्हणून रोज सफरचंद खाऊ शकता. याने केवळ तुमचं वजनच नियंत्रणात राहील असेल नाही तर तुम्ही फिटही रहाल. या फळात कॅलरी कमी असतात आणि व्हिटॅमिन, मिनरल्ससोबतच फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. या तत्वांच्या मदतीने तुम्हाला फॅट कमी करण्यास मदत मिळेल.

मेटाबॉलिज्म मजबूत करतो अॅवकाडो

अॅवकाडोमध्ये ओमेगा ९ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आढळतं. जे फॅट्सना ऊर्जेत बदलण्याचं काम करतं. सोबतच मेटाबॉलिज्मही मजबूत करण्यास मदत मिळते. अॅवकाडो व्यतिरीक्त ओमेगा ९ फॅटी अॅसिड ऑलिव ऑइल व नट्समध्येही आढळतं.

फायबर असलेलं नारळ

नारळामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन ए, बी, सी आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. हे तत्व वजन वाढलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतात. तसेच यात कोलेस्ट्रॉल नसतं. याचं सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि शरीराला लगेच ऊर्जा मिळते.

अननसात नसतं कोलेस्ट्रॉल

अननसामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसतं. तर यात शरीराला पोषण देणारे व्हिटॅमिन, फायबर, मिनरल्स आणि अॅटी-ऑक्सिडेंट हे सर्वच तत्व असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. अननसामध्ये ८५ टक्के पाणी असतं, त्यामुळे हे खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्याचं जाणवतं.