योगासनांचे शरीराला होणारे फायदे.

Spread the word

योगासनांचे शरीराला होणारे फायदे!

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक निरनिराळे फायदे होतात. योगाचे बरेच फायदे असून शरीराच्या व्याधी कमी होतात तसेच मानसिक स्थिती खंबीर होते. यामुळे रक्त संचलन प्रक्रिया सुधारते, पचनक्रिया आणि मानसिक शांतता आपल्याला लाभते. याचा राहणीमानात बदल होतो. आजकालची जीवनशैली धकाधकीची असल्याने मनुष्याला लगेच राग येतो तसेच त्याची चिडचिड देखील होते. आजकाल कॉलेजमधील युवकांची मनस्थिती बिघडत चालल्यामुळे मानसिक ताण देखील वाढत आहे. हेच मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासन महत्वाची भूमिका बजावते. योगासनाबरोबर आहार देखील तितकाच महत्वाचा आहे.

शरीर सदृढ राहण्यासाठी प्राणामय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश असे चार टप्पे महत्वाचे आहेत. योगासनामुळे फक्त शरीरासोबतचा मनाचाही विकास होतो. सकारात्मक विचार मनामध्ये निर्माण होऊन मानसिक ताण कमी होतो. परिणामी रागावर नियंत्रण येते आणि रोगापासून मुक्ती मिळते.

दररोज किमान अर्धा तास योगासनासाठी दिल्यास आपल्या संपूर्ण आयुष्यात बदल घडू शकतो. शिवाय श्वसनक्रिया करताना ओमकाराचा रोज अर्धा तास मंत्रघोष केल्याने मानसिक व शरीरिक स्वास्थ्य लाभू शकते. योगा करतेवळी श्वास सोडताना नकारात्मक विचार, वाईट गुण, व्देष, राग आणि शरीरातील वाईट बाहेर जावो असा विचार केला पाहिजे. योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे आता आपण बघणार आहोत.

सर्व स्तरांवर तंदुरुस्ती | All-round fitness
वजनात घट | Weight loss
ताण तणावा पासून मुक्ती | Stress relief
अंर्तयामी शांतता | Inner peace
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ | Improved immunity
सजगतेत वाढ होते | Living with greater awareness
नाते संबंधात सुधारणा | Better relationships
उर्जा शक्ती वाढते | Increased energy
शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते | Better flexibility & posture
अंतर्ज्ञानात वाढ | Better intuition

एक नवशिके म्हणून आपल्याला बहुदा असे वाटते की योगा म्हणजे काहीतरी अवघड, हात-पाय वेडेवाकडे वळवायला लावणारी आसने आहेत. आणि कधीतरी तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते की, ‘मला तर पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करणेसुद्धा जमत नाही तर मी योगा कसा करणार?’ योगा म्हणजे पायांना स्पर्श करणे किंवा तुमच्या उत्तरपूर्व दिशेला ९८ अंश वळणे नव्हे. तुमचा श्वास, शरीर आणि मन यांना एकत्र आणण्याची ती साधी प्रक्रिया आहे. आणि ती सोपी आणि सहज शक्य आहे.

म्हणूनच जर तुम्ही मिस लवचिक किंवा मिस्टर ताणबहाद्दर नसाल, किंवा तुमची वयाच्या ४० व्या वर्षी योगा सुरु करीत आहात, किंवा तुमच्या कमरेचा वाढता घेर तुम्हाला तणाव देतो आहे , तर काही हरकत नाही. योगाचा सराव सुरु करण्याआधी फक्त या कल्पित कथांना सर्वप्रथम सोडचिठ्ठी द्या! तुम्हाला बघणारे केवळ तुम्ही स्वतःच आहात – तर निश्चिंत राहा. हा प्रवास आनंददायक आणि आरामशीर असेल.

योगा शिकताना या चुका टाळा- सुरूवातीच्या काळात योगा शिकताना घाई किंवा काही अन्य कारणांमुळे मोठ्या चुका होण्याची शक्यता असते.

दुसऱ्याशी तुलना करणे – योगा वर्गांमध्ये नवखे असणारे लोक बहुतेकदा इतरांशी तुलना करण्याच्या नादात स्वत:ला इजा करून घेतात. दुसऱ्या व्यक्तीपाशी असणारी शरीराची लवचिकता किंवा त्या स्थितीत पोहचण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र, प्रत्येकाच्या शरीराची ठेवण आणि आकार वेगळा असतो ही मुख्य गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. त्याशिवाय एखादी व्यक्ती किती काळापासून योगाचा सराव करत आहे, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे.

वयोमानानुसार शारीरिक स्थितीत होणारा बदल ध्यानात न घेणे- बदलत्या वयानुसार आपल्या शारीरिक स्थितीदेखील बदलते याचे भान अनेकांना राहत नाही. वाढत्या वयामुळे शरीराची लवचिकता आणि हालचालींवर येणाऱ्या मर्यादेचा विचार केला पाहिजे. गतकाळातील शरीराची ताकद आणि लवचिकतेशी तुलना करून योगासन करणे टाळा.

अपुरी माहिती आणि अतिरेक- एखादा व्यायाम नियमितपणे करत असल्याने योगासन सहज जमेल असा गैरसमज तुमचा घात करू शकतो. वरकरणी सोपे दिसणारे आसन प्रत्यक्षात मात्र स्नायुंवर अधिक जोर पाडणारे असू शकते. त्यामुळे प्रत्येक आसन हे योग्य माहिती घेऊन करणे गरजेचे असते. स्वत:ची शारीरिक क्षमता जाणणे आणि प्रशिक्षकाच्या सूचना ऐकणे केव्हाही उत्तम.

सातत्याचा अभाव- योगसाधनेच्या सुरूवातीच्या काही सत्रांनंतर शरीर आणि मनाला मिळणारा निवांतपणा यामुळे अनेकजण भारावले जातात. नवीन काही तरी गवसल्याच्या उत्साहात पुढील काही दिवस नियमितपणे योग सत्रांना हजेरीही लावली जाते. मात्र, सुरूवातीचा उत्साह ओसरल्यानंतर किंवा कामाच्या धावपळीत हळुहळू योग वर्गांना नियमितपणे जाणे बंद होते. अनेक दिवस योगापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा योगासाधनेला सुरूवात कराल तेव्हा कदाचित पूर्वी जमणाऱ्या अनेक गोष्टी करणे तुम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांत आठवड्यातून किमान तिनदा तरी योगाप्रकार नियमितपणे करणे चांगले.

एखादी गोष्ट न जमल्यामुळे निराश होऊन प्रयत्न सोडणे- सुरूवातीच्या काळात अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर एखादे आसन न जमल्यामुळे खूपजण निराश होताना दिसतात. निराश झालेले हे लोक मग, योगासन ही गोष्ट आपल्यासाठी नाहीच, असा ग्रह करून प्रयत्न करण्याचे थांबवतात. योगसाधनेपूर्वीची शारीरिक आणि मानसिक स्थिती आणि योगसाधनेनंतर शरीरात आलेली लवचिकता, सुधारलेली श्वसनक्रिया, योगाभ्यास केल्यानंतर तणावापासून मिळणारी मुक्ती, निवांतपणा या सकारात्मक गोष्टींचा त्यांना विसर पडतो.