यशु

Spread the word

यशू म्हणजे यशश्री एक हळवी मुलगी. गावाकडच्या वातावरणात वाढलेली, घरात सगळे शिकलेले एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली पोरं.शाळेत नेहमी पहिली यायची चित्रकला, रांगोळी अशा अनेक कला तिला अवगत होत्या. आई वडील डॉक्टर होते, एक मोठा भाऊ होता.
अशी ही यशु मात्र मितभाषी होती. जास्त बोलायला, दंगा करायला तिला कधी जमलंच नाही. सतत काहीतरी वाचत असे, नाहीतर चित्र काढत बसे. पुढे शहरात शिक्षण घेऊन पोरगी इंजिनियर झाली, एका गलेलठ्ठ पगारावर नोकरी करू लागली.
तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारा यश तिचा बॉस याच्याशी तीची छान मैत्री झाली नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही घरी सांगितलं यशुचे आई-बाबा यश ला भेटले त्यांनाही मुलगा आवडला त्यांनी लग्नाला होकार दिला. पण यशच्या आईला यशश्री पसंत नव्हती कारण ती यश पेक्षा रंगाने थोडी सावळी होती आणि आपली सून गोरीपान सुंदर असावी अशी त्यांची अपेक्षा होती, त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. पण लग्न करेल तर यशश्री शीश या बोलण्यावर यश ठाम होता. हो ना करता करता नाईलाजाने यशच्या आईने होकार दिला. लग्न छान पार पडलं.
नवीन सुनेचं घरात आगमन झालं, नव्याचे नऊ दिवस छान गेले आणि यशश्री च्या सासूबाईंनी फर्मान काढलं की यशश्रीने नोकरी केलेली चालणार नाही. कारण मला आता काम होत नाही, वय झाले माझं . यांचं वय होतं पन्नास, यावरून यश आणि त्यांच्यात वाद झाला मग यशश्रीने यशला समजावलं आणि म्हणाली “हरकत नाही, त्यांची इच्छा नाही ना मग मी नाही करणार जॉब आणि तिने जॉब सोडला.
सासूबाईंनी ठरवून दिल्याप्रमाणे दिनक्रम सुरू झाला. दुपारी यशूला फार काम नसायचं म्हणून ती तिच्या आवडीप्रमाणे चित्र काढू लागली आणि ती रोज डायरी लिहू लागली त्यात दिवसभरात काय घडलं ते सगळं लिहून काढायची, काही नसेल आवडलं तर तेही लिहून काढायचे, पण कुठल्याच गोष्टीची तिने कधी तक्रार यश जवळ केली नाही. तसं पाहिलं तर तिची सासू तिला खूप मानसिक त्रास देत होती पण यशश्री यशसाठी सगळं सहन करत होती, मनातल्या मनात कुढत होती, चिडत होती. असं होत होतं लग्नाला एक वर्ष झालं, यशुच्या आई-वडिलांनाही वाटलं सगळे छानं सुरु आहे आपली मुलगी संसारात रमली आहे आणि अशातच तिचे आई-वडील मुलाकडे परदेशी राहायला गेले.
यशश्री-यश एकमेकांसोबत खूप खुश होते त्यांच्यात कधी साधा वादही झाला नाही, सगळं कसं छान चालू होतं. यशश्रीने आजपर्यंत मुलाकडे एकदाही तक्रार कशी केली नाही याची खंत तिच्या सासूला वाटत होती, हे ही येशूलाच जाणवलं कारण एकदा तिने त्यांना फोनवर बोलताना ऐकलं “की मला वाटत होतं, एवढा त्रास दिल्यावर या दोघांमध्ये भांडण होईल आणि ही घर सोडून निघून जाईल आणि मी माझ्या यशसाठी सुंदर बायको आणेल, पण कसलं काय”?
यशुने हे ऐकलं आणि तिला एक भन्नाट कल्पना सुचली तिने सासूबाईंचा कायापालट करण्याची मोहीम हाती घेतली. सासुबाई तिच्याशी बोलायच्या तेव्हा तिने त्यांच्या मनाचा ठाव घ्यायला सुरुवात केली. त्यांना काय आवडते? छंद काय?वगैरे वगैरे काही दिवसातच ती त्यांना त्यांचे छंद जोपासायला भाग पाडू लागली, मला हे शिकायचंच होतं तुम्हीच शिकवा मला, असं म्हणत म्हणत शिवणकाम, भरतकाम, ठिपक्यांची रांगोळी पासून सागरगोट्यांपर्यंत सगळं सगळं. यातून झालं असं की सासुबाई आज हिला काय शिकवायचं? कोणत डिझाईन शिकवायचं? याचं विचारात हरवून जात आणि हे करता करता त्यांची आणि यशश्रीची गट्टी कधी झाली हेच कळले नाही आणि त्या तिच्याशी अगदी मुलीसारख्या वागू लागल्या.
आता लग्नाला दोन वर्षे झाली आणि घरात एका परीचा आगमन झालं आणि आजी परी च्या विश्वात रमून गेली.
आता सासूबाईंचा दिवस “अगं! यशु”अशी हाक मारल्याशिवाय उजाडत नव्हतां.
सासूबाईंनी एकदा यशुला जवळ बसवलं आणि म्हणाल्या “मी तुला एवढां…..”वाक्य मध्येच तोडत यशु म्हणाली “झालं गेलं गंगेला मिळालं……”.

सौ.केतकी नील पारनाईक