मुलीच्या बापाला फक्त हेच हवं असतं

Spread the word

बघा रे सगळं आचारीचं सामान आलंय ना?  तो टेंटवाला बांधून गेला का स्वयंपाकेच्या जागी पडदा? बरं तुम्ही जरा सामान देताना आधी थोडं-थोडं द्या नाहीतर स्वयंपाकाच्या आधीच सामान लंपास करतील आणि वेळेवर आपली धावपळ होईल….
भास्कर आज खूप म्हणजे खूप व्यस्त होता, आज मुलीचं सीमांत पूजन ना!!
बाप बहुतेक यांच दिवसासाठी जन्माला येतो …..”मुलीचं लग्न”
जितका ताव तोरा स्वतःच्या लग्नात केला असतो अगदी त्याची परतफेडच म्हणा ना!!
एका हातात फोन, एका हातात काळी बॅग अश्या बॅग वर्षानुवर्षे मुलीच्या बापाच्या हातात तिच्या लग्नाच्या वेळीच हमखास दिसतात
त्यात साऱ्या आयुष्याचा साठा ठेवून बाप दोन मनं घेऊन मिरवत असतो, एक मुलीचं आयुष्य आनंदात जाणार म्हणून आनंदी मन एक मन मुलीपासून आपली ताटातूट होणार म्हणून दुःखी मन…
भास्कर सगळी सोय बघत, फोनवर बोलत, काळी बॅग छातीशी बिलगत हमखास परिधान सफारी सूट घालून डोक्यावर पांढरी फरवाली टोपी घालून वरात येण्याची वाट बघू लागला…
अरे कुठपर्यंत आलेत? काय म्हणतो बस खराब झाली? बरं-बरं मी कळवतो मुलं वाल्यांना….म्हणून भास्करनी नोकियाच्या फोनवर बारीक डोळेकरून बटणं दाबली… हॅलो नमस्कार मी वैद्य बोलतोय भास्कर वैद्य… अहो जरा उशीर होतोय तुम्हाला घ्यायला येणारी बस जरा खराब झालीयें, नाही-नाही असं नका करू मी बघतो व्यवस्था….
तेवढ्यात रोहिणी भास्करची बायको आली काय हो काय झालं?
अगं बस खराब झाली म्हणून कळवत होतो कुळकर्णींना तर चिडले म्हणे येतो आम्ही रिक्षा करून,अग आता गाडीघोडेच ते त्याचे ही तंत्र असतात ना.. तू काळजी करू नको तू बाकी विधींचे सगळं लावून ठेवलंय ना ते बघ, गुरुजींना काय हवे नको ते बघ, ही बाजू मी बघतो….
भास्कर येता जाता आपल्या जीवाशी ठेवलेल्या बॅगेतून पैसे देत असतो, कधी या सामानाचे तर त्या समानाचे… वरात येते पाहुणचार होतो, सीमांत पूजन सुखरूप पार पडते आणि दुसऱ्या दिवसाची लगबग सुरू होते, बापाच्या डोळ्यात झोप नाही रात्रभर, पुन्हा दुसऱ्या दिवसाचे कार्य नीट पार पडावे यांसाठी हा बाप झोप सुद्धा उडवून लावतो…
मुलीच्या जीवनातला मोठ्ठा प्रसंग यांत काही कमतरता नको….
सकाळ होते चहाचे कंटेनर उचलून चहावाला होतो, नाश्ते पोहोचवायला बॅरा देखील होतो माणूस…. जेव्हा स्वतःच्या मुलीचा प्रश्न असतो…. सर्वांचे आटोपले हे जाणून घेऊन मग पुढील कर्तव्य पार पडण्यास दक्ष… कुर्ता घालून कन्यादान विधी करतांना देखील मनाला खचू ना देणारा बाप आपले अश्रू डोळ्यातच थांबवून ठेवतो. व्याहिंची पंगत, मानपान, सगळं रागलोभ जपत उरकते… शेवटी लक्ष्मीपूजन होऊन आपली लक्ष्मी दुसऱ्याच्या अंगणात जातेय हे ही सुद्धा काळजावर दगड ठेवून बघत असतो, पैसा ही जातोय आणि मुलगी ही… पिड्यांचे शास्त्र असले हे तरी बापाचं ही काळीजच ना ते?
भास्कर आणि रोहिणी वाट बघतात मुलवाल्यांची, तोंड उष्ट करण्याची पद्दत असते ना? कन्यादानाचे उपवास धरून आई वडील मुलीला सासरी पाठवतांना मुलवाल्यांनी दिलेला फराळ करूनच त्यातून मुक्त होतात म्हणे…. मुलंवाले काही आले नाही आणि फराळ फार दूरच राहिला, वरात निघाली सगळे बसमध्ये बसले, एक म्हाताऱ्या आजी मुलंवाल्यांच्या नातलग होत्या, खूप वेळ त्यांनीही वाट पाहिली आणि मग मुलाच्या आईच्या कानांत जाऊन त्यांनी काही सांगितलं, मुलाची आई भास्कर आणि रोहिणीच्या जवळ आली आणि म्हणाली “खूप सुंदर लग्न केलं बरं तुम्ही”.. बस मग काय आता पर्यन्त जपून ठेवलेले अश्रू अगदी खळखळ वाहू लागले भास्करच्या डोळ्यातून, एक बाप म्हणे उत्तम लग्न केलं फक्त हे एकण्यासाठीच तळमळत असतो, सारे श्रम, कष्ट फळास आले जणू.. हात जोडत एक-एक पाहुण्याला निरोप देतांना त्याला खूप आनंद होत असतो…..
© सौं धनश्री देसाई (तोडेवाले)