मसालेभात-लग्नामध्ये व मंगल कार्यालयामध्ये असतो तसा.

Spread the word

मसालेभात
साहित्य:- (लग्नामध्ये व मंगल कार्यालयामध्ये असतो तसा… )
१) १ वाटी बासमती तांदूळ /आंबेमोहर तांदूळ
२) अर्धी वाटी कोणतीही भाजी-मटारदाणे, फ्लॉवरचे तुकडे, वांगी,
तोंडली, श्रावण घेवडी यापैकी काहीच हाताशी नसल्यास ४ कांद्याच्या
चौकोनी फोडी
३) १०-१२ काजू किंवा शेंगदाणे ( ऐच्छिक)
४) ३ मोठे चमचे कोरडं खोबरं
५) १ चमचा धने, जिरे,
६) ३/४ लवंगा, काळी मिरी
७) लहान तुकडा दालचिनी
८) १ चमचा दही
९) २-३ हिरव्या मिरच्या
१०) ५-६ कढिपत्त्याची पाने
११) १ इंच आलं – किसून
१२) १ चमचा गोडा आणि गरम मसाला
१३) १ चमचा साखर चवीनुसार मीठ
१४) २ मोठे चमचे तेल
१५) फोडणीचे साहित्यः- मोहरी, जिरे, हिंग, हळद, तमालपत्र.

कृती:-

१) तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत.
२) एका कढल्यात कोरडं खोबरं, धने-जिरे, लवंग काळीमिरी, दालचिनी
असे वेगवेगळे भाजून घ्यावे आणि गार झाल्यावर मिक्सरमधून काढावे.
३) एका गॅसवर २ वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे.
४) साध्या कूकरमधे किंवा कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग,
हळद, तमालपत्र घालून फोडणी करून घ्यावी.
५) त्यात हिरवी मिरची, किसलेलं आलं घालावे. का़जू घालून ते चांगले
परतून घ्यावेत.
६) त्यात वांग्याचे तुकडे, तोंडली , मटाराचे दाणे घालून चांगले परतून घ्यावे.
७) आता त्यात भिजवलेले तांदूळ घालून चांगले परतून घ्यावे.
८) त्यात मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला घालावा.
९) आता यात चांगले गरम झालेले पाणी घालावे. (या भाताला गार पाणी
अजिबात वापरू नये).
१०) या मिश्रणाला उकळी आली की त्यात गोडा मसाला, गरम मसाला,
फेटलेले दही, १ चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. व
झाकण लावून वाफ काढावी.
११) भात तयार झाला की झाकण उघडल्यानंतर दोन चमचे साजूक तूप
कडेने भातावर घालावे. म्हणजे तांदळाचे दाणे मोकळे दिसतात. साध्या
कुकरमध्ये /राईस कुकरमध्ये/ कढईमध्ये हा भात शिजवावा,प्रेशर
कुकर मध्ये नको ,म्हणजे भात मोकळा होतो
१२) एका ताटात भाताची मूद पाडून त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर आणि
तूप घालावे.

टीप:– १) मसालेभातात शक्यतो हिरवी मिरचीच घालावी. तिखट घातल्याने
रंग बदलतो.
२) मसालेभात बनविण्यासाठी लागणार्‍या मसाल्याच्या अनेक पद्धती
आहेत. पुढील पोस्ट मध्ये मी वेगवेगळ्या मसाल्यांच्या रेसिपी देणार
आहे. बाकी मसाले वगळता मसाले भात बनविण्याची कृती
वरीलप्रमाणेच वापरावी.

3) आपण जो खडा मसाला आणि सुके खोबरे भाजून मसाला करतो त्यामुळे भाताला काळेपणा येतो. भाताला छान रंग व चव येण्यासाठी खडा मसाला (लवंग, दालचीनी, मिरी, जिरे) हा तमालपत्राबरोबरच फोडणीला घालावा. व गोडा मसाला जेव्हा घालतो तेव्हा धने-जिरे पावडर घालावी. तसेच ५-६ चमचे ओलेखोबरे, वाटीभर कोथिंबीर, आलं बोटभर, चार हिरव्या मिरच्यांची चटणी करून भाज्या परतून घेतल्या की त्यात घालावी.