भाजी ( एका गृहिणीच्या मनातील खळबळ)

Spread the word

भाजी
( एका गृहिणीच्या मनातील खळबळ)

आजचा दिवस गेला आता उद्याला काय भाजी करायची हा माझ्यासारख्या बहुतांश गृहिणींपुढील यक्षप्रश्न असतो.

भोपळा केला तर मुलं नाक मुरडणार आणि टिफिन न घेताच जाणार.
मुलांच्या आवडीचे छोले केले तर सासूसासरे गॅस झाला म्हणून पोट धरून बसणार आणि बटाटा ही सर्वसंमत, न आक्षेपार्ह भाजी केली तर नवरा रोज काय गं बटाटा असं म्हणून आपली नाराजी व्यक्त करणार.

भाजीवाल्याकडे जाताच तो एकदम उत्साहात सांगतो, ताई पडवळ घ्या ना, एकदम कवळा आहे. हा कवळा पडवळ घरी नेल्यावर जून झालेले सगळ्यांचे चेहरे आपल्याला दिसतात आणि आपण दुसर्या भाजीकडे मोर्चा वळवतो.
ताई दुधी बघा ना लई मस्त आहे, जसा काय गरमागरम हलवा. ही भाजीवाल्याची खास मार्केटिंग पॉलिसी असते. दुधीत करून करून काय वैविध्य आणता येईल याचा विचार करून आपण तिसऱ्या भाजीकडे मान वळवतो.
अरे ताई इतका काय विचार करते?
भाजीवाला questioning करायला लागतो. आपल्या नजरेचा अंदाज घेत तो एक् हातात भरताचं
वांगं आणि दुसर्या हातात हिरवागार पानकोबी धरून त्याचं मार्केटिंग पुन्हा सुरू करतो.
काय खुशबूदार बैंगन आहे ताई. हातात घेऊन बघा. मघापासनं अश्शी चार खपली. घेऊन जावा नाहीतर हे बी कुणी गिर्हाईक घेऊन जाईल.
आपण गॅसवर वांगं भाजायला ठेवलं की सासूसासरे आनंदणार पण मुलं कोमेजणार या विचाराने आपली नजर पानकोबीवर स्थिरावते.
ताई एकदम फ्रेश आहे कोबी. रंग बघा त्याचा. बरेच दिवसात तुम्ही नेला नाहीत.

आता त्याला काय सांगायची माझी रोजची कथा आणि व्यथा. कोबी चणाडाळ, कोबी कांदा खोबरं की कोबी पीठ पेरून असं open discussion दरवेळेस घरी होतं. राजकीय पक्षांसारखं यावर एकमत कधीच होत नाही व शेवटी तूच खा ती कोबीची ‘चविष्ट’ भाजी असा त्याचा मुलांकडून रिझल्ट लागतो.

सगळ्या विविध रंगांनी डवरलेल्या भाज्यांवरून फिरणारी माझी नजर अखेर फ्लॉवर या सर्वमान्य भाजीवर स्थिरावते. आजपण फ्लॉवर , भाजीवाला हैराण नजरेने आपल्याकडे बघतो.

फ्लॉवर, बटाटा, टोमॅटो, मटार, कधीतरी सिमला मिरची यापुढे आपली गाडी फारशी जात नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलेलेच असते. क्वचित गाजर, फरसबीपर्यंत आपली मजल जाते. कधी मेथी, पालक. अहो ताई सगळ्या भाज्या खायला पाहिजेत. आपला भाज्यांचा फारच लिमिटेड चॉईस पाहून भाजीवालाच काकुळतीला आलेला असतो.

पण त्याला बिचार्याला थोडेच माहित असते की आमच्याकडच्या पाच तोंडांच्या टोकाच्या आवडीनिवडी आहेत.
शेपू, माठ, तोंडली, दोडके, मुळा, नवलकोल, कारले या भाज्यांनी तर माझ्या स्वयंपाकघरातून कधीचाच संन्यास घेतला आहे.

मी मला तर यात गणतच नाही कारण मला अमुक एकच भाजी हवी असा माझा कधीच हट्ट नसतो. मला सगळ्या भाज्या आवडतात पण तरीही भाजीमंडईत गेल्यावर मला मोठ्या सावधतेने भाज्या choose कराव्या लागतात, इतर घरातल्यांसाठी.

हल्ली मुलं सारखी पाठी लागतात. You Tube वर भाज्यांच्या आधुनिक रेसिपीज बघ आणि कर. हॉट, स्पायसी, क्रिस्पी इत्यादी इत्यादी. त्यांना जिभ चाळवणार्या रेसिपीज हव्या असतात तर सासूसासरे वय झालंय हे निमित्त सतत पुढे करून ते तुमचं आधुनिक काही नको असं सांगून मोकळे होतात.

प्रत्येकाची आवड जपायची म्हटली तर मला स्वयंपाकघरातून कधी बाहेर पडताच येणार नाही अशी भिती वाटते.

शेवटी ही संसार नामक भलतीच अवघड कसरत करताना एवढेच म्हणावेसे वाटते,
अरे संसार संसार भेंडी, फ्लॉवर, मटार
जे लागेल रूचकर त्यालाच माझा होकार