10 - 10Shares
पोखरबावचा श्री सिध्दिविनायक :-
देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्या जवळील पोखरबाव येथील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी त्या गणरायाचे दर्शन घडते.
इतिहासाच्या अभ्यासकांच्या मते, पोखरबावच्या गुहा अथवा लेणी हा अनमोल ठेवा आहे. तिठ्यावरून आत वळल्यावर मार्गालगतच अध्यात्माचे नितांत सुंदर शिल्प दृष्टीस पडते. अरबी समुद्राच्या काठावर प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरापासून अलिकडे वीस किलोमीटर अंतरावर दाभोळेत श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे.
समोर शेष, गोकर्ण, द्रौपदी आणि पांडव अशी नावे असलेली कुंडे दृष्टीस पडतात. ती कुंडे कोणी तयार केली याचे उत्तर कोणालाही सापडलेले नाही. मंदिर परिसरात पाण्याची वानवा नसते. कितीही कडक दुष्काळ पडो, तेथील पाणी कधीही संपलेले नाही. दाभोळे गावातील नदीचा उगम मंदिरापासून काही अंतरावर होतो. दाभोळेच्या डोंगरातून झिरपणारे पाणी तेथील गोमुखातून वर्षानुवर्षे वाहत आहे.
मंदिर परिसरात कासवाच्या पाठीवर शिवलिंग आहे. दर संकष्टीला, विशेषत: अंगारकीला तेथे भाविकांची गर्दी उसळते. माघी गणेश जयंतीला तर तेथे जत्राच भरते. होम, गणेशयाग, पूर्णाहुती असे धार्मिक विधी होत असतात. जत्रा तीन दिवस सुरू असते. गगनबावड्याचे गगनगिरी महाराजही त्या स्थळी आले होते. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांची प्रतिमाही तेथे लावण्यात आली आहे. आशा या सुंदर ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जायला सगळ्या ना नक्की आवडेल.