पीठ विकून तिने पोराला केलं उपजिल्हाधिकारी

Spread the word

पीठ विकून तिने पोराला केलं उपजिल्हाधिकारी

हर्षल गांगुर्डे

गणूर – ‘दळण गिरणीतून आणून ते ईकुन मुलाला पुस्तक घेऊन दिलं, आज पोरग साहेब झालय, सगळे म्हणतायत कि चांगलं काम करतंय हे सगळं ऐकून उर भरून येत अन केलेल्या कष्टाचं चीज झाल्याच समाधान वाटतंय’ हे शब्द त्या मातेचे आहेत, जिने स्वत: निरीक्षर असतांना पोराला शिक्षणाचे महत्व पटवून दिले अन्‌ कष्टाची जाण देत महसूल प्रशासनातला एक अधिकारी बनवलयं त्या म्हणजे चांदवड प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मातोश्री सरूबाई.

बुलढाणा जिल्ह्याच्या डोंगर खंडाळ्यात वास्तव्यास असलेलं भंडारे कुटुंब. अठराविश्‍व दारिद्रय असतांना निरीक्षर असलेल्या सरूबाई यांना शिक्षणाची ताकद ओळखून होत्या. स्वता: दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन त्यांनी मुलगा सिद्धार्थ याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. म्हाताऱ्या आई- वडिलांना रानावनात राबताना बघून सिद्धार्थ यांच काळीज तुटायचं. पुस्तकासाठी आईला गिरणीतून दळूण आणलेलं दळण परत विकून आपल्याला पुस्तक घेऊन देत असल्याचे पाहून सिद्धार्थ यांचे मन खिन्न व्हायचे. याच वेदनांना आपलं हत्यार बनवत सिद्धार्थ यांनी अभ्यासाची कास न सोडता पोस्ट ऑफिस, पोलिस शिपाई अशा पदावर काम करत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून पदवी मिळवत राज्यसेवा परीक्षा देत थेट उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. यात सिद्धार्थ यांचे कष्ट होतेच पण या पदाच्या होत्या शिलेदार होत्या सरूबाई भंडारे.

उपजिल्हाधिकारी भंडारे तरुणांच्या आदर्शस्थानी
श्री. भंडारे यांचा मजुराच पोर ते उपजिल्हाधिकारी प्रवास बघता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक परीक्षार्थीसाठी ते आदर्श ठरतायत. त्याच अनुशंगाने ते राज्यभरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. चांदवड प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मुलांच्या अभ्यासात गरिबी आड येऊ नये म्हणून आपल्याच कार्यालयात मोफत अभ्यासिका सुरू केली आहे.

असा झाला शाळा प्रवेश…
मजुराच्या घरात जन्मलेल्या सिद्धार्थ यांच्या शाळा प्रवेशाचा प्रसंग तितकाच मनाला चटका लावणारा आहे. आई रोजगार हमीच्या कामावर खडी फोडायला जायची. त्याकाळी शाळेत मिळणारे ग्लासभर दुध बहिण उषा स्वता न पिता लहान भाऊ सिद्धार्थ यास देत असे. असे करताना एकदा शिक्षकाने पकडल्याने सिद्धार्थ यांना शाळेतून हाकलून दिले. जन्माची कुठलीही नोंद नसल्याने त्यांचा शाळा प्रवेश शिक्षकांनी नाकारला होता अशा परिस्थितीत आई सरूबाई यांनी कामावरून घरी येत तत्कालीन आरोग्य कार्ड सापडवले अन भांडून शाळेत मुलाचा प्रवेश करवून घेतला होता.