पितृपक्ष !!

Spread the word

एक टुमदार घर , सुंदर बगीचा , जणू समृद्ध घरटे !! व्हरांड्यात एका कोपऱ्यात मात्र अडगळ पडून रहावी , तशी एक म्हातारी जोडपे !! दुपारचे ३ वाजले होते , एकटक स्वयंपाक घराकडे नजर त्यांची , म्हाताऱ्याची औषधाचे वेळ झाल्याने , म्हातारीने हाक ठोकली , ” अगं , सुनबाई …. दोन भाकरी असतील तर दे , ह्यांना भूक लागलिया , औषध घ्याचंय ह्यांना ” , तशी भराभर एक बाई दिवाण घरातून आली , हातात एका ताटात १ भाकरीचा तुकडा , लाल चटणी , चमच्याला पुरून उरल्या इतकी भाजी , आणि ताट धाडकन तिने त्या म्हातारीपुढे आदळला …. म्हणाली ” हि एक किटकिट , जरा उशीर का झाली ( ३ वाजले होते ) , कि तुमचं हे कोकलने !! घ्या गिळा , असं म्हणून बाईसाहेब निघून गेल्या , ते म्हातारे जोडपे एकमेकांकडे बघत होते , विचार करत होते कि आज कोणाचं पोट भरेल , त्या एक भाकरीत निघत असलेला एक एक दिवस मोजत होते !!

६ महिन्यातच ते जोडपे हे दुर्दैवी जग सोडून निघून गेले !!!

थोड्याच दिवसात पितृपक्षाचं पंधरवडा सुरु झाला , त्या दिवशी थोडी स्वयंपाक घरात हुडधूड माजली होती , मस्त पक्वान्नचा सुगंध दरवळत होता. हॉलमध्ये म्हातारे जोडप्यांचा मोठा फोटो लटकत होता , त्याची सुंदर पूजा केली होती , सुनबाईंनी मोठ्या पत्रावळीत पंचभोग भरले आणि व्हरांड्यात ठेवून कावळ्याची वाट बघू लागली , हे पाहून त्या घरातल्या छोट्या १० वर्षाच्या चिंटूने विचारले , ” आई हे काय करतेस ?? ”

सुनबाई अभिमानाने बोलल्या , ” बाळा , आपल्या परंपरेत आहे , पितृपक्षात आपल्या आजोळाना नैवैद्य दाखवायचं , आणि कावळ्याने येऊन हे खाल्लं कि आजी-आजोबानी खाल्यासारखं असत ”

चिंटू बोलला ” मग आई जेव्हा आजी आजोबा होते , तेव्हा का नाही ग त्यांना असं जेवण दिल ???

सुनबाईचा तोंड उघडे ते उघडेच राहिलं , ती गुपचूप स्वयंपाक घरात निघून गेली … चिंटू मात्र नवलाईने पाहत होता ….

मार्मिक : जिवंतपणी आपल्या वाड-वडलांना न पाहणारी आपली हि सुशिक्षित समाज पितृपक्षात मात्र संस्कार आणि परंपरेच्या आड आपल्या वडीलधाऱ्या लोकांना एका कावळ्यात शोधतात , एकदम नवल वाटत ह्या सगळ्या गोष्टीचा !!!

 

प्रभाकर जक्कन