देवपूजे विषयी विशिष्ट माहिती

Spread the word

देवपूजे विषयी विशिष्ट माहिती

देव्हार्‍यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात, फोटो सुद्धा डबल नसावेत, घरातील देव्हार्‍यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये. देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीला असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल ,

देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती ,
प्रतिमा असावीच असावी . सर्वात मागे मध्यभागी कुलदेवता प्रतिमा आणि त्या समोर मध्यभागी गणपती
व गणपतीच्या डाव्या बाजूस देवी मूर्ती म्हणजे लक्ष्मी / अन्नपूर्णा / दुर्गा इत्यादी आणि
उजव्या बाजूस देव मूर्ती म्हणजे बाळकृष्ण इत्यादी…

देवघरात शंख असावा , पण तो छोटा पूजेचा शंख असावा , वाजविण्याचा मोठा शंख देव्हाऱ्यात ठेऊ नये , बाजूला ठेवावा .

देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला शंख असावा आणि देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस घंटी असावी ..

पूजेचे साहित्य —

अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर,वस्त्र,फळं,नारळ, विडा, नैवेद्य व पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोडा गूळ)

वापरती भांडी –

तांब्या, भांडे,(पंचपात्र),पळी ताम्हण, अभिषेकपात्र,निरांजन, समई ( विषेश प्रसंगी ) घंटा.

पूजेचे साहित्य कसे असावे ?

सर्व पूजेची भांडी तांब्या , पितळेची – शक्य तर चांदीची असावी. स्टेनलेस स्टीलची अथवा प्लॅस्टिकची नसावी.

गंध –

चंदनाचे उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
सहाणेवर गंध उगाळून तो प्रथम दुसऱ्या तबकडीत घेऊन गंध लावावा . देवासाठी गंध हातावर उगाळू नये .

अक्षता –

धुतलेल्या अखंड तांदुळांना थोडेसेच कुंकु लावून त्या अक्षता वाहाव्या.
शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
शंख नेहमी पाण्याने भरून ठेवावा , दुसऱ्या दिवशी ते पाणी कृष्णावर / देवांवर स्नान म्हणून अर्पण करावे .

हळद – कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा/ पांढरा अबीर ) पूजा साहित्यात असावा.
गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का (काळा अबीर ) वाहण्याची वहिवाट आहे.

फुले –

ऋतुकालोद्भभव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवाला वाहावी.
जाई, जूई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले सर्व देवांना चालतात.

विष्णुला – चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
शंकराला – पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.
गणपतीला – गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला दूर्वा वाहातात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही.

गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.

देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.

पाने –

विष्णु, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहातात.

धूप –

देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.
अगरबत्ती देव्हाऱ्याच्या आत मध्ये ठेवू नये , बाहेर बाजूला ठेवावी .

दिप –

निरांजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूस ठेवावे. देवाजवळील समईंची ज्योत दक्षिणेकडे करू नये.
समईत एक दोन पाच सात अशा ज्योती (वाती) असाव्या. तीन नसाव्या.
देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस तुपाचा दिवा असावा आणि
देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूस तेलाचा दिवा असावा .
वाती या जोड वाती असाव्यात म्हा जे दोन वाती एकत्र करून केलेली एक वात ..

नैवैद्य –

रोजच्या पूजेत देवाना पंचामृताचा नैवैद्य दाखवितात.
दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात सर्व देवांना चालतात.
विशेष प्रसंगी गणपतीला मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य,
देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.

फळे –

देवाला कच्ची फळें वाहू नयेत.
पक्व फळाचे देठ देवाकडे करून ठेवावीत.

तांबूल –

म्हणजे विड्यांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे.
पानाचे देठ देवाकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.
तसेच ड्रायफ्रुट्स सुद्धा असल्यास उत्तम .

नमस्कार –

दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा.

आरती –

देवाला आरती ओवाळताना देवावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी.
आवाज सौम्य असावा , किंचाळू नये. आर्ततेने म्हंटली जाते ती आरती हे लक्षात घ्यावे .

प्रदक्षिणा –

देवाला प्रदक्षिणा घालावी. अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.
गणपतीला एक, सूर्याला दोन , शंकराला तीन, विष्णूल चार, पिंपळाला सात,
आणि मारुतीला अकरा अशा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
हात जोडून आणि तोंडाने नामघोष करीत प्रदक्षिणा घालव्यात.
किंवा सर्वाना समान तीन किंवा पाच प्रदक्षिणा कराव्यात ..

प्रार्थना –

देवाला नमस्कार करून भक्तिभावाने प्रार्थना करावी. प्रार्थना आणि सर्व पूजा
एकाग्र चित्ताने शांतपणे मनःपूर्वक करावी. देवाजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत
किंवा त्याला सांकडे , नवस घालू नये. फक्त त्याची कृपा मागावी.
देवाच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात.

देवपूजेचे महत्त्व —

प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे.
हल्लीच्या संघर्षमय व तणावपुर्ण जीवनात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी
आपणाला जास्त वेळ मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करणे आवश्यक आहे.

यथाशक्ती, यथाज्ञानाने व मिळतील त्या उपचारांनी मनोभावे देवपूजा केली तर मनाला शांती मिळते,
घरातील वातावरण पवित्र व प्रसन्न होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो.

देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते,
अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो , आनंद होतो.

देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात.
आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे.
तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते.

आपल्य कुटुंबास देवघरातील देवांची पूजा एकजणच करतो.
बाकीचे कुटूंबीय स्नानानंतर देवाला फुले, अक्षता वाहून देवाला
नमस्कार करतात. आपल्या नित्यक्रमातुन थोडासा वेळ काढून
पूजेनंतर जप करावा. पोथी वाचावी. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र,
गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा,
पोथी यांचे वाचन करावे. जेवढे शक्य असेल तेवढे करावे …

अधिकस्य अधीकम् फलम् .. असे म्हटलेच आहे.

अशा प्रकारे जप, पोथी-वाचन, देवदर्शन आणि व्रते, पूजा, स्तोत्रे,
प्रार्थना वगैरे उपानसनेचे प्रकार आहेत.
त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होतात.

देवपुजा करण्याचे प्रकार —

१ मानसपूजा
२ मुर्तीपूजा

मुर्तीपुजा करताना म्हणजे नेहमी प्रमाणे पूजा करताना
देवाची मुर्ती किंवा प्रतीमा किंवा सुपारी , नारळ किंवा टाक ह्यांची पूजा केली जाते.

ही पूजा करताना दोन प्रकारे करतात

१ पंचोपचार पूजा

२ षोडशोपचार पूजा

१ पंचोपचारी पूजा

यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
(१) गंध (२) पुष्प (३) धूप (४) दीप (५) नैवेद्य

२ षोडशोपचार पूजा

यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
(१) आवाहन (२) आसन (३) पाद्य (४) अर्ध्य (५) आचमन
(६) स्नान (७) वस्त्र अथवा यज्ञोपवीत (८) गंध (९) पुष्प
(१०) धूप (११) दीप (१२) नैवेद्य (१३) फल (१४) तांबूल
(१५) दक्षिणा (१६) प्रदक्षिणा .

देवाला वरील सर्व उपचार करताना विशिष्ट मंत्र स्तोत्र येत असल्यास उत्तम ,
नसेल येत तर निदान त्या त्या देवतेचे नाम मंत्र तरी म्हणावे .

अभिषेक करताना त्या त्या देवतेचे स्तोत्र , मंत्र म्हणावेत .

उदा .- गणपती पूजा करताना गणेश स्तोत्र किंवा गणेश मंत्र ,
विष्णू पूजा करताना विष्णू स्तोत्र / व्यंकटेश स्तोत्र /
विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र इत्यादी इत्यादी ..

आणि मानसपूजा हि सश्रद्ध अंतःकरणाने / मनाने करायची असते ..

वरील सर्व साहित्य व उपचार हे मनानेच देवाला अर्पण करायचे असते .
मानासपूजेमध्ये एकाग्रचित्त अंतःकरण आणि सश्रद्ध भाव असणे जरूरी आहे .

मानसपूजा हिच श्रेष्ठ सांगितली गेली आहे ..

@ संकलित माहिती….