तुझ्या प्रेमाचा गोडवा !!

Spread the word

तुझ्या प्रेमाचा गोडवा !!

एका कॉफी शॉप मध्ये कोपऱ्यात असलेल्या टेबलावर एक नवतारूण्य जोडपं बसलेलं होत, बरीच वर्दळ होती तेथे , पण असे जोडपे नेमके आपल्याच विश्वात रमलेले असतात , बरेचदा अशी हरहुन्नरी मंडळी अश्या कॉफी शॉप मध्ये येऊन एका कॉफीच्या जीवावर कित्येक घंटे आरामात काढतात !! हि सुद्धा एक वेगळी कला आहे म्हणा !!

तर झाले असे कि, हे जोडपे हातात हात घालून , दोन शरीर पण एकाच खांदा असलेल्या प्राण्यागत बसले होते, बराच वेळ कुजबुज चालू होती त्यांची !! मधूनच मुलगी डाएट विषयी सुद्धा बोलत होती , एकंदरीत ती डायट वर आहे हे मात्र समजलं !! थोड्याच वेळात टेबलावर दोन कॉफी ,तीन बर्गर , एक पॅन केक आलं , हे पाहून नक्कीच कोणी डाएट वर नाही , त्या सर्व भपक्या गप्पा अँड इम्प्रेशन झाडण्याचा प्रकार होता हे समजलं !!

आता गंमत अशी , कि अश्या कॉफी शॉप मध्ये साखर हि वेगळी दिली जाते !! नेमकं काय झालं होत हे समजलं नाही , पण मुलीने मुलाच्या कॉफीमध्ये एक शुगर पॅकेट मोकळी केली , त्यावर मुलगा म्हणाला,

मुलगा : अजून एक टाक ना ( डोळ्यात डोळे , हळूच स्मितहास्य चालू होत )
मुलगी : खरं ?? ठीक आहे घे हि दुसरी ( दुसरं पॅकेट हि ओतलं कॉफीमध्ये )
मुलगा : ऐ , ऐक ना , अजून एक , आज ना मला तुझ्या हाताची गोड कॉफी पिऊ वाटते,

आता हि मुलगी कधी आपल्याच किचन मध्ये गेली असेल नसेल , पण कॉफीशॉपच्या त्या रेडिमेड कॉफी जशी तिनेच बनवली आहे अश्या तावात तिने चक्क तिसरे शुगर पॅकेट कॉफीत ओतले, आता मात्र त्या कॉफीचा नक्कीच गुलकंद झाला असेल !! हे सर्व अटाटोप बाजूला बसलेले सद्गृहस्थ बघत मजा घेत होते !! काय आहे ना पूर्वी अशी सूट नव्हती , त्यामुळे अश्या कॉफेशॉपमध्ये आजकाल चालत असलेल्या अश्या भन्नाट गोष्टी पाहतांना बऱ्याचदा खूप मजा येते !!

तर झाले हे , ते सद्गृहस्थ ( साधारण ४५-५० वर्षाचे असतील ) जागेवरून उठले , व हळूच आपल्या पाकिटातून एक कार्ड बाहेर काढलं आणि त्या जोडप्यातल्या मुलाच्या हातात ठेवून बोलले,

” हे घे , कधी गरज भासल्यास , कॉल कर , वाटतंय लवकरच भेट होईल ”

या अनपेक्षित घटनेने ते जोडपे थोडं चक्रावून गेलेले, सद्गृहस्थ तेथून निघाले , मुलाने कार्ड बघितला ,तो थोडा असा होता,

डॉ. मकरंद कुलकर्णी
( मधुमेह तज्ज्ञ )
मोबाइल : ९९९९९९९९९९

हे पाहून ते जोडपे थोडे लाजले , न कळण्यासारखं काहीच नव्हतं तेथे !!

कदाचित यालाच आजकालचा ” प्रेमातला गोडवा म्हणतात ” ( हाहाहाहाहा )

नोट : प्रत्यक्ष घडलेल्या घटनेला थोडी काल्पनिक ओळींची जोड दिलीय , वाईट वाटून घेऊ नका

प्रभाकर जक्कन