कैरीचे पदार्थ

Spread the word

होळीनंतर हळूहळू वातावरण तापू लागतं .आणि उन्हाचा कडाका जाणवायला लागतो त्यामुळे सारखं पाणी प्यावसं वाटतं .तहान भागत नाही .उन्हातून आल्यावर थंडगार पन्ह ,जेवताना कैरीचं लोणचं ,कैरीची चटणी ,मेथांबा ,तक्कू ,कैरीची डाळ ,साखरआंबा किंवा गुळांबा असला तर जेवणमस्त जातं .आणि त्यांमुळे शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होत.
यातील बरेच पदार्थ आपणास माहित असतील . तरी आपण कशा प्रकारे कैरी पासून पदार्थ बनवू शकतो हे बघूया

१.मेथांबा
एक वाटी कैरीच्या फोडी, अर्धी वाटी गूळ फोडणीसाठी तेल मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद
दोन चमचे तिखट पाव चमचा मेथीदाणे चवीप्रमाणे मीठ घ्यावे.
प्रथम कैरी धुवून सालं काढावी .कैरीच्या लहान फोडी कराव्या .कढईत तेल ,मोहरी जीरं घालावं .मोहरी तडतडल्यावर मेथीदाणे घालावे .ते लालसर झाल्यावर हिंग ,हळद तिखट व कैरीच्या फोडी घालाव्या . त्यावर थोडं पाणी शिंपडावं व झाकण घालून वाफ काढावी .नंतर मीठ व गूळ घालून थोडं शिजवावं .मेथांबा तयार .हा पोळी किंवा भाकरी बरोबर खायला छान लागतो .

२.कैरीची चटणी
एक वाटी खोवलेला नारळ किंवा
खोबर्याचा किस अर्धी वाटी किसलेली कैरी चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर ,आलं ,अर्धा चमचा जीरं चवीप्रमाणे मीठ आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर
घ्यावी.
प्रथम वरील सगळं साहित्य बारीक वाटावे .चटणी तयार
आवडीप्रमाणे तेल मोहरीची फोडणी घालावी .

३. कैरी कांदा चटणी
दोनकांदे, अर्धा वाटी कैरीचा किस, अर्धा वाटी भाजलेले शेंगदाण दोन तीन चमचे तिखट चवीप्रमाणे मीठ व गूळ, फोडणीसाठ तेल मोहरी ,जीरं हिंग घ्यावे
प्रथम कांदे चिरून तेलावर परतावे .त्यात वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य घालून चटणी वाटावी .तेल मोहरीची फोडणी घालावी .

४. तक्कू
एक कांदा, अर्धा कैरी
भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट (भरड ) मीठ व गूळ,फोडणीसाठी, तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद ,
तिखट
प्रथम कांदा किसून घ्यावा त्यात किसलेली कैरी ,मीठ ,गूळ व शेंगदाण्याचे कूट घालून कालवावे.त्यात तिखट व फोडणी घालावी .बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे .

५. आंबाडाळ
चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात .
चार पाच तास भिजवलेली चनाडाळ दोन वाट्या चार पाच हिरव्या मिरच्या अर्धी वाटी किसलेली कैरी बारीक चिरलेली कोथिंबीर आलं ,कढिलिंब , फोडणीसाठी तेल मोहरी ,जीरं हिंग हळद चवीप्रमाणे मीठ व साखर सजावटीसाठी खोवलेला नारळ घ्यावे.
प्रथम भिजवलेली चनाडाळ चाळणीत उपसून ठेवावी .नंतर जाडसर वाटावी .त्यात वाटलेली मिरची, आलं ,कैरी ,मीठ व साखर घालून कालवावे .थोडी कोथिंबीर घालावी .वरून तेल ,जीरं मोहरी व भरपूर कढिलिंब व हिंगाची फोडणी घालावी .सजावटीसाठी कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा .ही डाळ कच्चीच खातात .आपल्याला कच्ची नको असेल तर कढईत फोडणी करून त्यात वाटलेलीडाळ मिरची आलं घालून वाफ काढावी .नंतर किसलेली कैरी ,मीठ व साखर घालून वाफ काढावी .

६.कैरीचं पन्ह
कैरी,गूळ ,साखर ,आलं ,मीठ ,वेलचीपूड , केशर
प्रथम कैरी धुवून वाफवावी त्याचा गर काढावा .एक वाटी गर असल्यास दोन वाट्या गूळ व एक वाटी साखर घालावी अर्धा चमचा मीठ घालावे .अर्धा चमचा आल्याचा रस ,एक चमचा वेलची पूड घालावे .सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून एकत्र करावे .
यात केशर घातल्यास रंग व सुगंध येतो .प्रत्येकवेळी पन्ह करताना वरील मिश्रणात आवश्यक तेवढे पाणी घालावे .आंबडगोड पन्ह तयार .साखर व गूळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे .
कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदलते .

७. साखरआंबा
एक वाटी कैरीचा किस
दोन ते तीन वाट्या साखर
एकचमचा वेलचीपूड चमचाभर तूप पाच ते सहा लवंगा ,छोटा दालचिनीचा तुकडा
प्रथम कैरीची सालं काढून किसून घ्यावी . कढईत तूप घालून त्यात लवंगा व दालचिनीचा तुकडा घालावा .त्यात कैरी घालून थोडी वाफवावी .नंतर साखर घालून ढवळावे .मिश्रण चांगले शिजवावे .थंड झाल्यावर त्यात वेलचीपूडमिसळावी .साखरआंबा तयार .( साखरआंब्यात तुपात परतलेल्या लवंगा व दालचिनीची पूड करून घातली तरी चालते).
आपल्याआवडीप्रमाणे घालावे नको असल्यास घातलं नाही तरी साखरआंबा छान लागतो .

८. गुळांबा
एक वाटी कैरीचा किस, साडेतीन वाट्या गूळ, तीन ते चार लवंगा ,छोटा दालचिनीचा तुकडा व वेलचीपूड
प्रथम गुळांब्याची कृती साखरआंब्याप्रमाणे
आहे .

९.हापूस आंब्याचा साखरआंबा एक वाटी कैरीचा किस दोन वाट्या हापूस आंब्याचा रस
दोन वाट्या साखर, चार पाच लवंगा ,छोटा दालचिनीचा
तुकडा, एक चमचा वेलचीपूड
एक चमचा तूप
प्रथम कढईत तूप ,लवंगा ,दालचिनी घालावी. नंतर कैरीचाकिस घालून वाफ काढावी .त्यात साखर व हापूस आंब्याचा रस घालून चागलं शिजवावं .थंड झाल्यावर वेलचीपूड घालावी. आंब्याच्या रसाऐवजी फोडी घातल्या तरी छान लागतात. हा साखरआंबा खूप छान लागतो .