कुळीथ शेंगोळे
साहित्य :
तीन वाट्या कुळथाचे पीठ
पाव वाटी दाण्याचे कूट
पंधरा ते वीस पाकळ्या लसूण वाटून
तिखट दोन चमचे ( सोसत असेल तर थोडे अजून घालावे )
हळद व हिंग अर्धा चमचा
चार वाट्या पाणी
नेहमीची फोडणी
चार चमचे तेल
स्वादानुसार मीठ
दोन चमचे तूप ( ऐच्छिक )
दोन चमचे कोथिंबीर
कृती :
परातीत कुळीथ व वाटलेला लसूण, एक चमचा तेल, हळद, हिंग, तिखट व स्वादानुसार मीठ व अगदी थोडेसेच पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. नंतर हाताला तेल लावून मळलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन साधारण बोटाएवढ्या लांबीचे शेंगोळे वळावेत.
एक खोलगट पातेले किंवा कढई मध्यम आचेवर ठेवून तापली की तेल घालावे. तेल व्यवस्थित तापल्यावर नेहमीची मोहरी, हिंग, हळद व चमचाभर तिखट घालून फोडणी करावी. तित दोन चमचे कुळथाचे पीठ घालून तीन चार मिनिटे भाजावे. थोडा खमंग वास सुटला की दाण्याचे कूट घालून परतावे. दोन-तीन मिनिटाने त्यावर पाणी ओतावे व पाण्याच्या अंदाजाने मीठ घालून एक उकळी आणावी. उकळी फुटू लागली की वळून ठेवलेले शेंगोळे हलक्या हाताने पाण्यात सोडावेत. साधारण दहा ते बारा मिनिटात जठराग्नी खवळवणारा वास घरभर दरवळू लागेल. शेंगोळ्याचा छोटासा तुकडा खाऊन पाहावा. सहजी तुकडा तुटायला हवा. थोडेसे कच्चट वाटल्यास अजून पाच मिनिटे शिजू द्यावे. त्याचवेळी दोन चमचे तूप घालून ढवळून झाकण ठेवावे. आचेवरून काढून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे.
तिखटाचे प्रमाण जरासे जास्तच छान लागते. शेंगोळ्यात मीठ घातलेले आहे हे विसरू नये व त्या अंदाजाने पाण्यात मीठ घालावे.
शेंगोळे ओलसरच असावेत. थोडासा रस्सा असतो ना तसे.
सौ . पुनम दुसाने