“एक कप कॉफी”

Spread the word

“आई श्यामा आली की तिच्याकडून
जळमटे काढवून घ्या”,” यश शाळेतून येईल तेव्हा श्यामाला सांगा की त्याचं दफ्तर नीट तपासून घे नाहीतर बस मध्ये काही पडलेलं असेल” बरं मी निघतेय आई पोळ्या डब्यात टाकून घ्या, कुकरची सीटी बघा मग बंद करा आणि वरणाला तेवढी फोडणी करून घ्या तुमच्या सोयीप्रमाणे…अच्छा निघते.

उषा बाल्कनीत येऊन सुनेला हात हलवून बाय करते आणि सुटकेचा श्वास सोडते…..

हुश्श…..
अजून माझी ६५ ष्टी येतेय आणि दमलेय मी…..किती कामं वाढत चाललीये माझ्या मागे ….हे करून घ्या ते करून घ्या… आपलं “चूल आणि मूल” अजून काही संपलं नाही बाई….

तेवढ्यात फोन वाजतो आणि उषा विचार करते की फोन उचलू का आधी कुकरकडे लक्ष देऊ?
फोन उचलते आणि समोरहून कुणी विचारते “उषा रानडे यांचा नंबर का?
” नंबर तर श्रीष रानडे यांचा आहे, पण मी त्यांची आई उषाच बोलतेय आणि हळूच हासते… बरं गम्मत केली आपण कोण?”
“अगं उषे मी जयू…. जयश्री वेलणकर…”
“अगं बाई जयू कुठे होतीस ग इतके वर्ष? लग्नानंतर जे गायब झाली ते आता उगवलीस ग तू?”
“अगं काय सांगू लग्नानंतर आपण दोघी दुसऱ्या शहरात….मग माहेरी जाण्याचे योग ही वेगळे!!!त्यामुळे भेटाभेटी नाही, मग माहेर ही संपले आणि त्या शहराशी नातं ही ….”

“काय म्हणते ???नाशिकला कुणी नाही का ग आता?”
” नाही ग भाऊ आई -वडील गेल्यावर सगळं विकून परदेशात रमला,मी ही माझ्या संसारात रमले मग कधीच नाशिकला परत जाणे नाही झाले…
नातलग पण कुणी मायेनं बोलवणारे नव्हते मग नाशिक फक्त आठवणीतच राहिले.”

“हो ग आपलं मेलं सगळं आयुष्यच बदलून जातं बघ लग्नानंतर, माझं ही तसं काहीसं नाशिक लांब झालेच म्हणा, एकतर आई -वडील नाही तर कसलं आलंय माहेर? मग भावंड त्यांच्या -त्यांच्या संसारात आणि आपण आपल्या …. मग यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या आणि मुलांचे शिक्षणं …..झालं ….आपलं सगळं झालं समजायचे.”

हो, मग काय बाकी जाऊदे ग तू कशी आहेस ग उषे ते सांग? कडकडून मिठी मारावी तुला असे वाटतेय…

आपण तसेच आहोत ग !! फक्त कालचक्र फिरलंय आणि आपले स्थान मात्र बदलले ….ए थांब ग जरा कुकर बंद करून येते नाही तर माझी सासू म्हणजे सून ओरडेल!! आणि हसते (कुकर बंद करून येते आणि म्हणते)हा बोल ग आता

“काय ग बरी नाही का सून?”

“नाही ग छान आहे ,मी आपलं गम्मत म्हणून म्हटलं.माझ्या सासूबाई गेल्यावर त्यांची कमी भासत नाही आता !!! मला आपला सासुरवास कायम!!! ” आणि पुन्हा दोघी हसतात….

“बरं सध्या कुठेस जयू बाई?”

“अगं मी सध्या मुलांकडे मुंबईत, दोघांची घरं जवळ -जवळ आहे,मग ज्याला गरज असते त्याच्या कडे मी,दिवसभर नातवंड, येणारे जाणारे आणि कुरियर वगैरे घेणं, नातवंडांच संगोपन, शाळेत सोडणे आणणे यांतच वेळ जातो ” अशी सगळी पात्रं वठवते आता…..

हो ना !!!अभिनयाची फार आवड होती न आपण दोघींना ? “तेव्हा लग्न करा आणि सासरी जाऊन नाटकं करा असं म्हणून चक्क फसवलं ग घरच्यांनी आपल्याला “…(आणि दोघी मोठ्याने हसतात….)

तुला आठवते का ग आपण कॉलेज ते घरी पायी यायचो २रु वाचवून आपण त्या कॉफी हाऊसला जाऊन कॉफी प्यायचो?

हो मग….”कॉफी आपलं पाहिलं प्रेम”…आजही ती कॉफी मला आठवते ग!!! काय तो झाग यायचा, आणि आपण दोघी कॉफी वेड्या त्या एक कप कॉफीसाठी पायपीट करायचो….

नशाच होती जणू त्या कॉफीची, तुझं आणि माझं लग्न झालं, आपली सोबत संपली आणि मग त्यांनतर कधीच ती कॉफी पिणे झाले नाही….

मिस्टरांना चहा प्रिय मग मी ही कुठे प्यायले ग कॉफी!!! एकटीसाठी काय करायची म्हणून मोह संपला….

“सून नोकरी करते का ग उषा?”

नाही ग तिचं ते ऑनलाइन काय ते बिझनेस आहे….मी काही जास्त खोलात जात नाही “ती व्यस्त आणि त्यामुळे आपण मस्त” पुन्हा दोघी खिदळतात”

“बरं तुला माझा नंबर कसा काय मिळाला ग?”

अगं माझ्या मिस्टरांनी फेसबुक वर तुझ्या मिस्टरांना शोधले आणि तू सध्या नवी मुंबईत हे कळले…. मग आमच्या सूनबाईंनी नवी मुंबई टेलिकॉमवरून नंबर काढून दिला. मला तुझ्या मुलाचे नांव माहीत होते त्यामुळे वाटलं की त्या नावानेच विचारपूस करावी……

बाई -बाई किती आटापिटा ग?? आता मुंबईत म्हटल्यावर नवी मुंबई काय लांब??? यें आरामाला….

नको- नको आपल्याला काही घरात आराम नाही …. असं कर आपण कुठेतरी बाहेर भेटू , आणि दोघीच……नवरे, नातवंड नको मागे…..

हो बरोबर म्हणतेय, पण अगं घरी माझ्या भरवश्यावर नातवंड, घरातल्या कामं करणाऱ्या बाया, नवरा आणि इतरांचे खाणे पिणे सगळंच आहे ना बाई!!!! बाहेर नको तू यें घरी…..

‘नको ग ऐक माझं आपण बाहेरच भेटू ”

“बरं मग उद्या किती वाजता? कुठे ते ठरवा बाई म्हणजे आम्हाला ही घरचे बंदोबस्त करून निघावे लागेल.”

बरं ऐक उद्या संध्याकाळी ४वाजता भेटू….

“कुठे?शिवाजी पार्कला?”

“नाही गं पत्ता लिहून घे ब्रिटनिया अँड कं, वेकफिल्ड हाऊस,बल्लार्ड इस्टेट,न्यू कस्टम हाऊसच्या समोर…”

“बरं लिहिला आता उद्या येते मी ” तुझा मोबाईल नंबर दे आणि माझा ही लिहून घे….

उषा फोन ठेवते आणि खूप आनंदात घरात वावरते, संध्याकाळी सर्वांना सांगते उद्या मी दुपार नंतर संध्याकाळ पर्यन्त घरी नसणार तेव्हा आपली आपली कामे वाटून घ्या!! सून, नवरा, मुलगा आणि नातवंड उषाचं तोंड बघतात की हे आईला एकदम काय झालं? ती सांगते माझी फार जुनी मैत्रीण भेटणार आणि आम्ही संपूर्ण संध्याकाळ बरोबर असणार त्यामुळे आवश्यक गोष्टींची काळजी उद्या पुरती तुम्ही सर्वांनी घ्यायची…. सर्वांना एकदम कुणी कृत्रिम श्वास घ्यायला सांगितल्या गत होतं…पण उषा जास्त विचार न करता उद्या घालायची साडी किंवा सूट याच्या विचारात गुंग होते आणि सकाळ होते.

दुपारी नवऱ्याकडून कॅब बुक करवून उषा जयूला भेटते.दोघी कडकडून मिठी मारतात आणि खूप रडतात…

मग त्या ब्रिटनिया कं मध्ये शिरतात आणि जसेच वेटर येतो दोघी एक स्वरात म्हणतात “एक कप कॉफी” . असं म्हणून पुन्हा हसतात आणि डोळ्यात ४२ वर्ष जुन्या आठवणी तरंगू लागतात … मग कॉफीचा बार उडवत एक एक कप न पीता आलेल्या कॉफीचा हिशोब पूर्ण करतात…….

सौं धनश्री देसाई