एका आजीची गोष्ट

Spread the word

अंधारी खोली आणि त्यात घुमणारा उदबत्तीचा छान सुवास, पलंगावर एक गोधडी व्यवस्थित घडी केलेली, पलंगाखाली पाण्यानं भरलेली लोटी त्यावर झाकलेले फुलपात्र त्याच सोबत जाड काचेचा चष्मा आणि औषधांची डबी. जवळच असलेल्या लाकडी टेबलावर ठेवलेला पंखा.
दोरीवर पातळ आणि चोळी वाळत घालता येईल त्यासाठी देवघराजवळ ठेवलेली गुढी बांधायची काठी…
पलंगाच्याच खाली ठेवलेल्या निळ्यापट्याच्या रबरच्या चपला ज्या घालून आजी चुटुक चुटुक आवाज करीत इकडे तिकडे वावरते. कोनाड्यात ठेवलेली स्टीलची डबी त्यात आजी आपली कवळी काढून ठेवत असे. निळसर मिणमिणता दिवा दिवसभर ही चालू असेल तर नवल नाही कारण आजी ला तो हवाच असतो.

ब्राह्ममुहूर्तात उठणारी आजी उठून आधी देवाचा दिवा लावते, मग सुरू होतो त्यांच्यामधील गोड संवाद.” रामराया थकले रे बाबा” ” ने रे बाबा …आता अजून किती दिवस लोळवणार??? हाडं नुसती खिळखिळी झालीयेत माझी… असं म्हणून उभी होते पुन्हा लुगड्याच्या काष्टा नीट करु लागते.

हळूच बाहेरचं दार उघडून बाहेर डुंकवून बघते, चहाचं आधण ठेवून, मुखमार्जन आणि सडा रांगोळी करते. मग चहा घेते हळूच कप उचलून बशीवर चहा ओतून सुरुप सुरुप आवाज करून पिते.

घरचे सगळे उठायच्या आत, देवलाण घासून , सहाणवर गंध उगाळून ठेवते. झाडावरून तोडून आणलेले ताजे तवाणे कन्हेरच्या फुलांनी सुंदर असे हार बनवते. मधेच गाणं सुद्धा गुणगुणत असते ” विघ्नहरा गणराया आता घेई प्रणाम हे शिवतनया” म्हणता म्हणता आजी स्नान उरकून तुळशी पाशी जाते तिच्या अवती भवती असलेला पानापाचोळा दूर करून पाणी टाकते आणि नमस्कार करून आपले धुतलेले पातळ वगैरे काठीच्या मदतीनं वाळत घालते.
एक एक कामं झाली की आजी सुटकेचा श्वास घेते. अधून मधून टाकीत डोकावते पाण्याची वेळ !!वेळेत पाणी भरणे अति गरजेचे, पुन्हा तेवढेच नाही वरची टाकी अगदी बोटभर कमी झाली तरी ती ही भरून टाकायची.

“परमेश्वरा नको रे बाबा जगणं संसारातून मुक्त कर रे बाबा” असं म्हणते आणि पुन्हा तिचे संसारातील व्यापांना सामोरी जाते.

संध्याकाळ होताच पुन्हा हातात कुंचा आणि सुपडी घेऊन अंगण स्वच्छ करून झाडांना पाणी देऊन ,कट्टयावर बसते .येणारे-जाणारे त्यांच्या चौकशी करत संध्याकाळचे दिवे लावायची तयारी करायला कंबर खोचते….

आज बरोबर 9 वर्ष झाली या आजीला खूप शोधतेय…. मला सोडून गेली पण आठवणी मात्र ठसठशीत देऊन गेली आणि त्याच बरोबर तिचे काही गुणही….

आजीवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी….

© सौं धनश्री देसाई( तोडेवाले)