उन्हाळा आला, अशी घ्या काळजी!

Spread the word

डॉ.सारिका आरू (होमिओपेथिक, आहारतज्ज्ञ)

 

उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. भारतामध्ये उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या काळामधे सुरू होतो. या काळामधे वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे अंगाची लाही लाही होते. घराबाहेर पडणे मुश्कील होऊन जाते. गुलाबी थंडीनंतर उन्हाळ्याचे प्रखर चटके अगदी नकोसे होतात. हा उन्हाळा येताना काही शारीरिक समस्याही बरोबर घेऊन येतो. जसे की हिट स्ट्रोक, डोकेदुखी, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे (डिहायड्रेशन), सनबर्न, घामोळे व इतर त्वचेच्या तक्रारी, घामामुळे पायांचे इन्फेक्शन इत्यादी. आपण आता बघूया की या शारीरिक तक्रारी झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आपण आधीच काय काळजी घेऊ शकतो?

 हिट स्ट्रोक

 म्हणजे शरीराचे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले तापमान, जवळ – जवळ 40 अंश सेल्सियस. अतिप्रमाणात शरीराने उष्णता ग्रहण केल्यामुळे हा त्रास होतो. यामुळे मळमळ, उलटी, डोकेदुखी या तक्रारीसुद्धा सुरू होतात.

 काळजी

 हिट स्ट्रोक होऊ नये म्हणून बाहेर जाताना सैलसर, हलक्या वजनाची, पातळ आणि फिक्कट रंगाची किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. डोक्याला ऊन लागू नये म्हणून टोपी किंवा स्कार्फ, छत्री यांचा वापर करावा.

 शरीराचे तापमान प्रमाणात राहावे यासाठी दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी किंवा इतर पातळ पदार्थ यांचे सेवन करत राहावे.

 जे लोक बाहेर, उन्हामध्ये काम करतात त्यांनी पाणी पिण्याबरोबरच मधे- मधे सावलीच्या ठिकाणी जाऊन विश्रांती घ्यावी.

 सिझनल फळे, फळांचे ज्युस, कोथिंबीर – पुदिना ज्युस, कोरफड ज्युस यांचे सेवन केल्याने हिट स्ट्रोक होत नाही.

 हिट स्ट्रोक झाला तर उपाय

 ज्या व्यक्तीला हिट स्ट्रोक झाला असेल त्याला तत्काळ थंड ठिकाणी न्यावे, तसेच त्याला हवा घालावी, थंड पाण्याचा शिडकाव करावा किंवा पाण्याच्या टबमधे बसायला सांगावे.

 सनबर्न

 उन्हाळ्यात जर तुम्ही प्रखर उन्हामधे फिरत किंवा काम करत असाल तर सावध राहा. कारण या प्रखर उन्हामधे अल्ट्राव्हायलेट रेझ असतात. हे रेझ त्वचेवर अतिप्रमाणात पडले तर सनबर्न होऊ शकतो. म्हणजे काय तर त्वचेवर लालसर रंगाचे चट्टे येतात व या चट्ट्यामधे सूज आणि वेदना असतात. याकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्वचेच्या कॅन्सरला सनबर्न कारणीभूत ठरू शकते. ताप, थंडी वाजून येणे, मळमळ, उलटी ही लक्षणे ही आढळून येतात.

 उपाय

 सनबर्न होऊ नये म्हणून प्रखर उन्हामधे जाण्याच्या १५ ते ३0 मिनिट आधी चेहरा, हात, पाय, पाठ, गळा इ. ठिकाणी सनस्क्रीन लावावी त्यामुळे अल्ट्राव्हायलेट रेझचा दुष्परिणाम टाळता येतो. तसेच गॉगल, टोपी, स्कार्फ, सनकोट, छत्री यांचाही वापर करावा.

 डिहायड्रेशन

 म्हणजे उष्णतेमुळे शरीरातील पाणी लघवी व घामामार्फत जास्त प्रमाणात शरीराच्या बाहेर टाकले जाते आणि त्या प्रमाणात शरीरामध्ये घेतले जात नाही. शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे अतिप्रमाणात तहान लागते, डोके दुखते, उलटी होऊन मोठ्या प्रमाणात थकवा येतो.

 उपाय – डिहायड्रेशन होऊ नये म्हणून दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा, तसेच सिझनल फळे, फळांचा ज्युस, ताक, मठ्ठा, नारळ पाणी घेत राहा.

 हिट रॅश (घामोळे)

 उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात घाम येतो. अतिप्रमाणात घाम आणि घामाच्या ग्रंथीचे ब्लॉकेज यामुळे हिट रॅश येते. या मधे त्वचेवर पुरळ येतात, वेदना होतात, खाज सुटते. यालाच घामोळे म्हणतात. लहान मुलांमधे याचे प्रमाण जास्त असू शकते कारण त्यांच्या घामाच्या ग्रंथी पूर्णपणे डेव्हलप झालेल्या नसतात.

 उपाय- हिट रॅश होऊ नये म्हणून अतिप्रमाणात घाम येणाऱ्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीज टाळाव्यात किंवा अशा फिजिकल अ‍ॅक्टीव्हीटीज सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कराव्यात. अतिप्रमाणात घाम येत असेल तर दिवसातून 2-3 वेळा अंघोळ करावी. तसेच त्वचा कोरडी राहवी म्हणून टाल्कम पावडर लावावी व सैलसर, सुती कपडे परिधान करावेत.

 फूट इन्फेक्शन

 उन्हाळ्यामधे पायांना येणाऱ्या अतिप्रमाणात घामामुळे पायाच्या अंगठ्याला किंवा बोटांच्या बेचक्यामधे फूट फंगस, बैक्टीरिया यांची वाढ होते आणि फूट इन्फेक्शन होते. आणि एका बोटांनंतर दुसऱ्याला, असे ते पसरतही जाते.

 उपाय

 पायाला अतिप्रमाणात घाम येत असेल तर बंद शूज टाळावेत व चपलांचा वापर करावा. परंतु ज्यांना कम्पलसरी शूज वापरावे लागतात त्यांनी रोज स्वच्छ सॉक्स वापरावेत. शूज स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना रोज शूज सॅनिटायझर लावावे. आणि शक्य असल्यास थोड्या थोड्या वेळाने शूज काढून पाय मोकळ्या हवेमधे ठेवावेत.

 उन्हाळ्यामध्ये काय खावे, काय खाऊ नये

 काय खावे

 पातळ पदार्थ आणि पाणी : दिवसभर थोड्या थोड्या वेळाने माठामधील पाणी पीत राहावे. फळांचे ज्युस, नारळ पाणी, ताक, मठ्ठा, पुदिना ज्युस, लिंबूसरबत, सोलकढी इ. चे सेवन करावे.

 फळे : द्राक्ष, कलिंगड, संत्री, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, पपई, कवठ, पेरू इ.                               सर्व सिजनल भाज्या, गाजर, काकडी, टॉमेटो, बीटरुट इ.

 प्रत्येक भाजीमधे कांद्याचा भरपूर वापर करावा, कच्चा कांदा किंवा कांद्याचा ज्युस घ्यावा. कांदा थंड असल्याने तो शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो.

 जेवण करताना प्रत्येक वेळी दही जिरे टाकून किंवा ताक, कच्चे सलाड यांचा कम्पलसरी समावेश करावा.

 काय खाऊ नये

 तिप्रमाणात नॉनव्हेज, अति प्रमाणात तिखट, तेलकट पदार्थ, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ टाळावेत. कारण उन्हाळ्यामधे हे पदार्थ पचायला जड जातात आणि त्यामुळे अ‍ॅसिडीटी होते.

कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळावे.

 कडक उन्हामधे आईस्क्रीम खाऊ नये. जर खायचे असेल तर ऊन कमी झाल्यावर संध्याकाळी खावे. परंतु शक्यतो टाळावे.

 उन्हामधून सावलीमधे आल्या आल्या लगेच थंड पाणी पिऊ नये. थोडा वेळ बसावे आणि नंतर पाणी प्यावे. तसेच उन्हामधून घरी आल्यानंतर लगेच आंघोळ करू नये, शरीराचे तापमान नॉर्मल होऊ द्यावे व नंतर आंघोळ करावी.

 फ्रिजमधील पाणी पूर्णपणे टाळावे, कारण ते शरीराला घातक आहे. फ्रिजऐवजी मातीच्या माठामधील पाणी प्यावे, त्यामुळे मातीमधील मिनरल्स ही शरीराला मिळतात. किंवा पाण्याच्या भांड्याला ओले कापड गुंडाळून ठेवावे.

 उन्हाळ्यामधील आहार

 आपल्या शरीररूपी गाडीला धावपट्टीवर पळवायची असेल तर उत्तम आहाररुपी पेट्रोल टाकावेच लागेल, होय ना! उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. गर्मीमुळे आपण थकून, गळून जातो, उत्साह कमी होतो. त्यासाठी आहार योग्य घेतला