आटपाडीत विधवांसाठी हळदी-कुंकू समारंभ !

Spread the word

आटपाडीत विधवांसाठी हळदी-कुंकू समारंभ !

जुन्या रितीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल

आटपाडी तालुक्यात आवळाई येथे आयोजित करण्यात आलेल्या विधवांच्या हळदी-कुंकू समारंभात विधवांना सुवासिनीचा मान देत असताना लता बोराडे (छाया- प्रशांत भंडारे)
|| दिगंबर शिंदे

जुन्या रितीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल-

विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात विधवा महिलांना बाजूला ठेवण्याच्या जुन्या रितीरिवाजाला फाटा देत आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे संक्रांतीचे वाण देऊन या महिलांना सुवासिनीचा मान देण्यात आला. विधवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमाद्वारे जुन्या चालीरितींना मूठमाती देण्यात आली. विधवांना हळदी कुंकवाचा सुवासिनीचा मान देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गावातील महिलांनी सहभागी होत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकले.

लग्नानंतर अल्पावधीत नियतीने हिरावून घेतलेले सौभाग्याचे लेणे आणि पती निधनानंतर विधवा म्हणून समाजाकडून मिळणारी वागणूक अनुभवून आवळाई येथील लता बोराडे या विधवा महिलेने विधवांना सन्मान देण्याचे कार्य हाती घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून वैधव्याचे दुख विसरुन त्या अनिष्ठ रुढी-परंपरा बाजूला ठेवत विधवांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

पतीच्या निधनानंतर पुन्हा विवाह न करता लता बोराडे यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. सध्या त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. विधवा म्हणून अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले. परंतु या प्रसंगातूनच त्यांना विधवांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. विधवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम सुरू आहे.

धार्मिक कार्यक्रमात विधवांना प्रवेश दिला जात नाही. सामान्यपणे जगणे या महिलांना नाकारले जाते. तसेच मकरसंक्रांतीला सर्वत्र हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमात महिला सुवासिनीदेखील प्रथेनुसार विधवांना टाळायच्या. ही प्रथा बंद व्हावी या उद्देशाने आवळाई येथे विधवांसाठी विधवा विकास प्रतिष्ठानने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. हा कार्यक्रम घेतानाही विरोध झाला.

मान्यवर आणि पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे पद्धतशीरपणे टाळले. परंतु विधवांना न्याय देण्यासाठी निर्धारपूर्वक हा कार्यक्रम घेण्यात आला आणि एका चुकीच्या परंपरेला तिलांजली देण्यात आली.