“आई पाहिजे”…भाग 3

Spread the word

मी तर बाई नजरच काढली…. माझीच मेलीची लागायची दृष्ट्.
दुपारी चार साडेचार ची वेळ असेल.. पुष्पाताई हातात चहाचा कप घेऊन… सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होत्या… सुचिता खुर्चीत बसून… बालाजी तांबे यांचे… गर्भसंस्काराचे पुस्तक वाचत बसली होती…
इतक्यात दारावरची बेल वाजली… अनुसयाबाई ने दरवाजा उघडला… दारात अजय… खूपच थकलेला दिसत होता… ड्राईव्हरने त्याच्या हाताला धरूनच त्याला घरात आणले… अजयने सोफ्यावर बसून… पुष्पताईच्या मांडीवर डोके ठेऊन… तिथेच झोपला… अंगात चांगलाच ताप होता… ड्राइवर म्हणाला… साहेबांना ऑफिस मध्ये थोडी कणकण वाटत होती… त्यामुळे लवकरच निघालो…. येतांना डॉक्टरकडे जाऊनच आलो…
ह्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी… आणि आराम करायला सांगीतला… किल्ली जागेवर ठेऊन तो निघून गेला… सुचिता म्हणाली… आई… याला रात्रीच थोडा ताप होता… मी सकाळी बोलले सुद्धा…

अजय आज ऑफिस ला नको जाऊस म्हणून…. पण नाही ऐकले…. गेला… बघा न आई आता तापाने कसा फणफणला… थोडीशी घाबरूनच गेली ती…
मी सुचिताला म्हणाले… अग बाळा..! उतरेल ताप..! जाऊन आला न तो डॉक्टर कडे..! तू आता याला काहीतरी खायला दे..! आणि मग गोळ्या देऊन… बेडरूम मध्ये घेऊन जा..! आराम करू दे..! बरं वाटेल बघ..! नाहीतर पुसून देते मी त्याचे अंग..! तू अजिबात टेंशन घेऊ नको…
अजय चल बाळा बेडरूम मध्ये जाऊन आराम कर बरं…. तर म्हणाला..नको ना ग आई…! तुझ्या मांडीवरच झोपु दे ग…! मग म्हणाला… आई बरंच झालं…आज मला ताप आला…. एक वेगळंच सुख अनुभवतोय मी…आई… आज नवीनच अनुभूती आली बघ..आईच्या उबदार मांडीची… वात्सल्याने डोक्यावर, चेहऱ्यावर फिरणाऱ्या आईच्या हाताची सर…या जगाच्या पाठीवर कशा कशात नसेल ग… आणि अजूनच कमरेला घट्ट विळखा घातला…
मी त्याच्या केसांवरून मायेने हात फिरवत राहिली… डोळ्यात आनंदाच्या अश्रूंनी तुफान गर्दी केली होती.. कधी कोसळतील याचा नेम नव्हता… त्याला दिसू न देता डोळ्याला पदर लावला… स्त्री आणि ममता…! स्त्री आणि वात्सल्य…! स्त्री, आणि प्रेम….! स्त्री नावाची किती सूंदर कलाकृती निर्माण केली त्या ईश्वराने नाही….! मनोमन त्या परमेश्वराला धन्यवाद दिले…
गोळ्या खाऊन पुन्हा मांडीवरच विसावला तो… हळूच म्हणाला… आई… माझी एक मैत्रीण आहे… तिला कविता करायचा छंद आहे… खूप वर्षांपूर्वी तिची एक कविता वाचली होती… ती म्हणे स्कुटी चालवतांना पडली… तिला खूप लागल होत… आईच्या मांडीवर डोके ठेऊन झोपल्यावर… इतके लागूनही तिला त्या क्षणी कविता सुचली…. आणि तेव्हाच कागदावर उतरवली… माझी तर पाठच झाली… थांब तुला कविताच म्हणून दाखवतो… सुचिता तू पण ऐक.. आणि कविता म्हणायला सुरवात केली… आणि इतक्या तापातही त्याने कविता वाचन सुरु केले…..

” माऊली”
माझी माय माऊली
पिंपळाची साऊली
तिच्या छायेत विसावा
देह तान्हुला दिसावा
मागणे हे देवाला
माझी माय माऊली ll१ll
तिच्या मांडीवर शीर
तिचे थरथरणारे कर
फिरे माझ्या माथ्यावर
शीण जाई कुठे दूर
माझी माय माऊली… ll2ll
तिच्या हृदयाची पोकळी
सदाचीच का मोकळी?
माया तिची ना आटली
प्रीत कंठात दाटली
माझी माय माऊली… ll3ll
माझी माय माऊली
पिंपळाची साऊली………

माझ्या हात त्याचा केसांवरून फिरून… त्याला थोपटत होता…. तो शांत झोपी गेला… माझ्या डोळ्यासमोरून बरंच चित्र सरकून गेलं… किती तरी वर्षात माझ्या दोन्ही मुलांपैकी… एकानेही जरा मोठे झाल्यानंतर… मांडीवर डोके ठेऊन विसावले नव्हते…
कसं आहे न… जी गोष्ट आपल्याला सहज मिळते… त्याची किंमतही तशी कमीच असते… प्रत्येकाचा गुणधर्मच आहे तो… त्या विषयी माझी… माझ्या मुलांबद्दल तक्रार अजिबात नाही… खरंच खूप समजदार आहेत दोघे… पण… अजय आणि सुचिता दोघेही आईच्या प्रेमाला पारखे झालेले…. म्हणून त्यानां जास्त किंमत वाटते… इतकंच… माझीच मला समजूत घालू लागले…..
सुजिताचे आता दिवस भरत आले होते… आठ जानेवारी डॉक्टरांनी तारीख सांगितली…. तेव्हा पासून अजय जॅम खुष हता…. कारण आठ जानेवारी माझा पण वाढदिवस होता… मध्यरात्री अचानक सुचिताच्या पोटात दुखायला लागले… दवाखाण्यात भरती केले… बरोबर आठ जानेवारीला पहाटे सात वाजून वीस मिनिटांनी… एका छान ,गोंडस, गुटगुटीत आणि काळेभोर जावळ असलेल्या मुलीला जन्म दिला… सिझेरियन झाले… बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप होते…
अभिनंदन अजय…! आई खूप खूप अभिनंदन..! आणि त्याने मला उचलून गिरकीच घेतली…! त्याच्या आनंदाला उधाण आल होत… सुचिता हळूहळू शुद्धीवर आली… पुन्हा अभिनंदनाच्या वर्षावात सगळे न्हाऊन निघालो…
अजयने US ला फोन करून ही बातमी सांगितली… सगळेच खूष होते… अजय म्हणाला… दादा लगेच बारस्याची तारीख काढतो…. तुम्ही सगळेच या इकडे… तसेही तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता लागली आहे… मला आई तर मिळाली… पण आता… दादा… वहीनी… ताई… भाऊजी…आणि भाचे कंपनी यांना भेटायचे वेद लागले आहे… अभिनंदानाच्या वर्षावातच फोन ठेवला…..
अजय ,आई आत्ता यतोय… म्हणून बाहेर गेला…. बर्फी घेऊन आला… मला म्हणाला… आई डोळे मिट बरं…  हे रे काय नवीनच अजय….? मिट ग आधी डोळे…. गंमत आहे… मी डोळे मिटले… दार उघडल्याचा आवाज आला… काय रे उघडू का….? नाही एक मिनिट… मग मला तसेच डोळे बंद करून…. एका जागेवर उभे केले….
हं आई ! उघड पाहू डोळे आता… काय आश्चर्य…? समोर भला मोठा कैके…? आणि डॉक्टर सहीत सर्व स्टॉप उपस्थित…. एकच गलका….HAPPY BIRTHDAY TO YOU
” आई”…..
सुचिताने आणि अजयने त्या लहानग्या जीवाला… माझ्या हातात दिले… म्हणाले आई तुमचे वाढदिवसाचे गिफ्ट… सांभाळा आता तुमच्या नातीला… त्यासाठी तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो…
बारस्याची तारीख ठरली… US वरून सगळेच आले… दणक्यात बारसे आटोपले… अजय आणि सुचिताच्या लेकीचं नाव ठेवले
‘सुजया’…
त्या दोघांच्या प्रेमाच सुंदर प्रतीक…
सुचिता आणि अजयच्या प्रेमाने सगळेच भारावून गेले… US वरून मुलांनी नव्या भाचीसाठी बरंच काही आणलं होतं… अजयनेही सर्वांना छान छान गिफ्ट… आठवण म्हणून दिल्या… चांगले पंधरा दिवस राहून… परतीच्या प्रवासाला निघाले… म्हणाले आई तुही चल आमच्या बरोबर…. तुझंही तिकीट काढतो… नाही रे बाबा…
आता तर मला माझ्या या नव्या नातीची जबाबदारी स्वीकारायची आहे…. पण आम्ही लवकरच येऊ… काय अजय जायचे न आपण US ला….? होय आई नक्की जाऊ… लवकरच….
जातांना मुलं म्हणाली… आई सुरवातीला जेव्हा तू आम्हाला… सुचिता, अजय बद्ल सांगितले… तेव्हा मनाला रुचतच नव्हते ग…. पण आता आम्ही खरच निश्चिंत आहोत बघ… आईची काळजी घ्या….असे म्हणणे म्हणजे…. या दोघांच्या प्रेमाचा अपमान करण होईल…
अग आम्ही सुद्धा घेणार नाही… इतकी काळजी घेतात तुझी…. हि दोघे…. पाहीले आम्ही… “याची देही ,याची डोळा” तेव्हा इतकच म्हणतोय…. एकमेकांची काळजी घ्या…. असं म्हणून सगळ्यांनी….
ONE BYE ONE वाकून आईला नमस्कार केला….
अजय , सुचिता खरंच तुमचे दोघांचेही खूप खूप धन्यवाद….. आणि तुमच्या ‘आई पाहिजे’……? या कल्पनेला सलाम…..
सुचिता लगेच म्हणाली…. खरं तर धन्यवाद तुम्हा सर्वांचे….. तुमच्यामुळे आम्हाला एक प्रेमळ आई तर मिळालीच….. पण बहीण, भाऊ, वहिनी ,भाऊजी… भाचे सगळेच मिळाले…. हे दोन अनाथ जीव …. कुटूंब नामक एका रेशमी धाग्यात गुंफले गेले…. कायमचे….

समाप्त…

सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण