“आई पाहिजे” भाग 2

Spread the word

आई आता तुम्ही सांगा.. तुमच्या बद्दल… मी सांगू लागले….
यांना जाऊन आठ महिने झाले…. खूप मोठ्या कंपनीत नोकरीला होते… दोन मुलं आहे…. एक मुलगा एक मुलगी…. आणि नातवंड…
मूलं मोठी झाली… पदेशातलं भारी पगाराचे पैकेज खुणावत होतं… आणि दोघांच्याही डोक्यात US ला जाऊन… MS करायचे खूळ भरले… पंखात बळ आलं होतं… उंच भरारी घ्यायचे स्वप्न पाहत होते… मग त्यांचे पंख छाटण्याचे पातक आम्ही नाही केले…
शिकायला गेलेली ही दोन्ही पोरं… लग्न करून तिकडेच स्थाईक झाले… सुरवातीला यायचे दर वर्षी… आताशा… दोन दोन, तीन तीन वर्षे येत नाही… हे होते तर काही वाटायचे नाही…
पण आता खूप एकटं एकटं वाटत… हे गेल्यावर सहा महीने गेले मी तिकडे… पण तिथल्या मातीत माझी नाळ काही रुजली नाही… या मातीशी एकरूप झालेली मी… या मातीचा गंध… इकडे यायला खुणावत होता… आले परत…
मुलगा म्हणाला आई राहा इथे… इथल्या भारतीय लोकांमध्ये मिसळली कि बरं वाटेलं तुला… सून पण म्हणाली आई राहा… मी आहे… तुमची नातं आणि नातू आहे… शिवाय ताई आहे… नका जाऊ…
तुम्ही तिकडे गेल्या तर… आम्हाला सारखी तुमची चिंता वाटत राहणार… पण नाही जमले ग… आले निघून.. आज भरल्या घरात एकटी आहे मी…
तुमची ही जाहिरात वाचली…. विचार केला तुम्हाला आई पाहिजे… आणि मला भरलं घर… पाहुयात या दोन अनाथ जीवांची आई व्हायचे… माझ्या भाग्यात आहे का …? आणि सकाळी सकाळी फोन न करताच आले बघ….
बरं येते मी…अस म्हणून… उठणार…तर ती म्हणाली…
आई कुठे निघालात..! अग कुठे काय…? घरी..! खूप वेळ झाला बोलताबोलता..! कळलेच नाही बघ..! नाही आई… तुम्ही आता जेवूनचं जायचे… अजयचा पण मेसेज येऊन गेला… म्हणाला दोन पर्यंत जेवायलाच येतो… आईला थांबवून ठेव… जेवून निवांत बोलू…
का कोण जाणे… पण मला तिचे मन मोडवले नाही गेले…. थांबले… अनुसया बाई मधेमधे काहीतरी खायला घेऊन येत होत्या… गप्पांच्या ओघात दोन कसे वाजले… कळलेच नाही…
बरोबर दोन वाजता दारावरची बेल वाजली… अनुसया बाईनी दार उघडले…
दारात अजय…. बॅग ठेवली… आई आलोच म्हणून…. फ्रेश होऊन… पाचच मिनिटात आला… आधी जेवयलाच बसलो… जेवणं आटोपली… झक्कास जेवण बनवले होते… अनुसया बाईनी… खूप दिवसात पाहिल्यांदा… पोटभर जेवल्या सारखे वाटच होते…. बडी सोप हातावर ठेवत अजय म्हणाला…
काय सुचिता….?
आवडली का आई….?
होय अजय खूप आवडली…
पण अजय… आईला आपण दोघे आवडलो कि नाही… हे तीच सांगू शकेल…?
अग असं काय बोलतेस… सुचिता …?
खूप आवडले तुम्ही दोघे मला… अजयजी… खूप नशीबवान आहात तुम्ही… सुचिता सारखी समंजस, सुशील बायको मिळाली तुम्हाला… अजय म्हणाला …
सुचिता… आईला तू आवडली…
पण मी नाही बरं का..?
काय हे अजयजी…?
अहो आत्ताच बोलले न…
दोघेही खूप आवडले म्हणून…

अहो आई तुम्ही मुलं आवडली म्हणता…. आणि अहो जाहो करता… तस नाही अजयजी…. पुन्हा जी… सॉरी सॉरी… अजय तुही खूप आवडला रे बाबा…
बरं निघते मी आता…. भेटू लवकरच..!
ये आई लवकरच का ग…? आजच ये न राहायला..! नाही अजय…घरी काही जबाबदाऱ्या घेऊन ठेवल्या… त्या पूर्ण कराव्या लागतील… काय जबाबदाऱ्या आहे आई…..? सांग तरी….चुटकी सरशी मार्ग काढतो बघ…
अरे माझी कामवाली आहे सखू… तिच्या मुलीची जबाबदारी आहे… खर सांगू अजय तशी ती बालमजूर… सुरवातीला तीच्याकडून काम करून घेतांना मला जरा जडच जात होत… पण ही सखू … तिला तिच्या सोबत घेऊन जायची… दिवसभर धुनी भांडी करून थकून जायची बिचारी…
नववीत नापास झाली… शाळा दिली सोडून… मग मीच सखुला म्हणाले… तुझ्या लेकीला पाठव… काम झाले की, मी तिचा अभ्यास घेत जाईन… येते ती आताशी… बाहेरून दहावीचा फॉर्म भरणार आहे तिचा… फावल्या वेळात आमचा अभ्यास चालू असतो… तशी हुशार आहे रे… थोडे लक्ष दिले तर नक्की पास होईल…
मी इकडे आले तर तिच्या अभ्यासाचे काय…? हाच मोठा प्रश्न पडला मला… एकदा हाती घेतलेले काम अर्थवट सोडलेले… तुझ्या काकांना कधीच रुचलेच नाही…

बस इतकच आई… माझ्याकडे एक मार्ग आहे बघ… तू सखुला तिकडे घरकाम करायला ठेवले… आताही तिला यावेच लागेल… इतकेमोठे घर, बाग हे सर्व रोजच्या रोज साफ व्हायला पाहिजे… ती हे सगळे काम करून… इकडे येईल… इथे तू तिचा अभ्यास घे… सुचिताला पण नवीन मैत्रीण मिळेल… घर लांब पडत असेल तर… आपण तिला एक सायकल घेऊन देऊ…
वाह…! किती पटकन सोल्युशन काढलं रे तू अजय..! मी आताच सखुला फोन करून बोलवून घेते…
चला तर मग निघते मी आता….खरच तुमच्या दोघांसोबत … वेळ कसा गेला कळलेच नाही… तेवढ्यात सुचिता म्हणाली… सॉरी अजय… तुला आईंना सोडवायला जावे लागेल… मी त्यांच्या ड्राइवर ला केव्हाच पाठवून दिले… ओके बॉस म्हणत… त्याने किल्यांचा जुडगा हातात घेतला… बोटात चाबी गरागरा फिरवत… छान गोड अशी शीळ वाजवतच बाहेर आला… मला भेटून त्याला आनंद झाला…. हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते….

त्याने गाडी काढली…. सुचिता नमस्कारासाठी वाकणार…. मीच तिला थांबवले…. आताशी पुन्हा तिला दिवस गेले होते… तिसरा लागला होता…. पुन्हा निमित्याला कारण नको बाई…! आजकाल फार जपावं लागतं…
आधीच पोरींचं एक बाळ गेल…
“देवा सगळं सुखरूप होऊ दे रे बाबा”..! मनोमन त्याची प्रार्थना करून झाली… सुचिता गाडी जवळ आली… टाटा केला… तिला आराम करायच्या सूचना देऊन… मी आणि अजय निघालो… सखू घरी येऊन तयारच होती…
सखुला अजयची ओळख करून दिली…. आणि पेपर च्या जाहिराती पासून… इथपर्यंतचा सगळा इतिहास सांगितला… तिला हे पटले… तिनेही लेकीला अजयकडे पाठवण्याचे कबूल केले…. ठराविक सामान घेऊन… मी निघाले… नव्या … भरल्या घरात… दोन अनाथ जीवांचे… आई व्हायचे स्वप्न पूर्ण करायला……

“आई,आई “करतांना दोघेही थकत नव्हते… हे गेल्यानंतर कधीही kitchen मध्ये… न गेलेली मी… आजकाल kitchen मध्ये रमायला लागली… त्या दिवशी सुट्टी होती… अजय घरीच होता… माझी kitchen मधील खुडबुड बघून म्हणाला…
आई हे ग काय करते…? तुला जेवण बनवणारी मेड म्हणून नाही आणले ग..? जा बाहेर…. मस्त आराम कर… आणि सुचिताची काळजी घे… बस.. बाकी काही करू नको…अरे राजा ..! आरामच करते रे बाबा..! पण काय आहे न..! माझं होणार नातवंड छान गुटगुटीत…. गोरेपान आणि सुदृढ व्हायला पाहिजे न..! म्हणून चांगलचुंगलं करून खाऊ घालते..! माझ्या लेकीला… आणि तिचे डोहाळे पण पुरवायचे आहेत न…

तू नको लक्ष देऊ…जा तू …बाहेर जाऊन बस… आणि हो तुझ्यासाठी…. छान केशर घालून शिरा करते… सुचिता कालच बोलली मला… तुला केशर घातलेला शिरा खूप आवडतो म्हणून… धन्य हो माते…! म्हणत त्याने हात जोडले… बाहेर जाऊन पेपर वाचत बसला… शिऱ्याची डीश घेऊन… सोफ्यावर बसले…. चार वेळा सांगितले… अजय शिरा खाऊन घे…. पण हा पेपर वाचण्यात मग्न…
शेवटी घेतला चमचा… भरवला शिऱ्याचा घास…. मग सॉरी सॉरी म्हणायला लागला…. घे आता गुपचूप खाऊन… भरवते मी…. तू कर त्या पेपराचे पारायण… आणि माझी मीच हसायला लागले….. माझ्या या लटक्या रागाने… सुचिता सुद्धा खो खो हसायला लागली…
दुसऱ्या दिवशी मी… सुचिता आणि अजयला म्हणाले…अजय, सुचिता दोन दिवस तिकडच्या घरी जाईन म्हणते… काकांचे वर्षश्रद्धा आहे परवा… तर अजय म्हणाला… आई त्यासाठी तिकडे जायची काय गरज आहे…? आपण काकांचा फोटो आणु… किंवा तिकडेच जाऊन पूजा करू… नंतर अनाथ आश्रमात जाऊन… काकांच्या नावाने दानधर्म करू… मी नेहमी असेच करतो… सुचिताचा , माझा आणि लग्नाचा वाढदिवस आम्ही तिकडेच साजरा करतो…
आणि आई तुला पण पाहायचा होता ना ग आश्रम..! त्या निमित्याने तू ही बघून घे..! पण आई माझी ही कल्पना तुला आवडली असेल तरच ..! जबरदस्ती नाही बर का…? होय रे बाळा… खरच खूप आवडली तुझी कल्पना…. नक्की न ! थांब मी आता आश्रमात फोन करूनच विचारतो… त्यानां कशाची गरज आहे ते… त्यानुसार आपण देऊ…
मी नेहमी असेच करतो… आई तू सामानाची यादी करून दे…. मी सगळं सामान घेऊन येतो बघ आज उद्या मध्ये… ऐ आई…! तुझा कधी असतो ग वाढदिवस…? आपण तुझा ही वाढदिवस मस्त आश्रमात मुलांसोबत साजरा करू..!
आठ जानेवारी तारीख आहे बघ… पण माझ्या वाढदिवसाचे काही विचारु नको… अरे माझी जन्म तारीख वेगळीच…आणि शाळेच्या दाखल्यावर वेगळीच… आम्ही नाही केला कधी वाढदिवस साजरा… मग मुल मोठी झाली… ते आणत होते… केक… ते गेले US ला… तसा नाहीच साजरा केला कधी… शेवटचा कधी केला हेही आठवत नाही बघ…. पण मुलं फोन मात्र आठवणीने करतात दरवर्षी…

अजय श्राद्धाचे सगळे सामान घेऊन आला… ठरल्याप्रमाणे पूजा करून… आम्ही आश्रमात गेलो… दिवसभर तिथे घालवून… बरंच काही दान देऊन घरी आलो….
आज पर्यंत मी मुलांना अजय आणि सुचिता बद्दल… काहीच सांगितले नव्हते… देवदर्शन करत फिरते असेच सांगितले होते… आज बाबांचे श्राद्ध … दोघांचेही फोन येतील… तेव्हा सगळे सांगून टाकायचे ठरवले… तेवढ्यात मोबाईल ची रींग वाजली… फोन मुलाचाच होता…. कसे झाले श्राद्ध पूजन ..! कधी आलीस देवदर्शन करून..! तब्बेतीची चौकशी करून झाली…. मग मी हळूच त्याला… सुचिता आणि अजय यांच्या…

आई या संकल्पने बद्दल सांगितले…. मी त्याच्याच कडे राहते हेही सांगितले… सुरवातीला त्याला हे नाहीच पटले… मग अजयने मोबाईल घेतला आणि बोलायला सुरवात केली.., दादा मी अजय बोलतो… सॉरी आपण एकमेकांना ओळखत नाही… पण तरीही मला तुमच्याशी बोलायचे आहे… दादा आई माझ्याकडेच असते… तीन महिने झाले…

खरं तर ती माझ्याकडे असते हे म्हणणे चुकीचेच ठरेल रे दादा…. कारण मी आता आईजवळ असतो…. आम्ही दोघे अनाथ होतो…. आई नावाच्या या देवतेमुळे आमच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली..!
तिच्यात भोवती आम्ही आमच हरवलेलं बालपण जगतोय रे दादा..!
खूप खूप खुश आहोत आम्ही..! “आई नावाचा हिरा गवसला आम्हाला..!” खऱ्या अर्थाने आयुष्याला आता पैलू पडत आहे…
दादा प्लीज… आमचा हा आनंद नको हिरावून घेऊ…
आई सदैव तुमचीच असणार आहे…. तुम्ही इथे नसतांना या दोन अनाथ जीवांवर… तिच्या मायेची पाखर घालू दे दादा… दादा प्लीज….

ज्या दिवशी आईला आमच्या बद्दल अविश्वास वाटले… तो दिवस माझ्या आणि सुचिताची आयुष्यातील शेवटचा दिवस असेल…
खूप खूप प्रेम करतो आम्ही तिच्यावर… आणि आई या शब्दावर..! बघा दादा … विचार करा…. आणि त्याने जोरात हुंदका दिला… माझ्या हातात फोन दिला… त्याचा हुंदका, त्याची भावना US परंत पोहचली बहुतेक…! लगेच मला म्हणाला..आई तू खुश आहेस न तिकडे…? मी लगेच म्हणाले… हो रे राजा..! उलट US वरून आल्यानंतर दोन महिने खूप कंटाळवाणे गेले बघ… आता पुंन्हा भरलं घर… आई चा पाढा म्हणणारे पोरं… मस्त चाललंय माझं… खरंच नका काळजी करू आता… ठीक आहे… काळजी घे म्हणून त्याने फोन ठेवला….

हे गेल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी होती… मी अजयला म्हणाले… अजय, सुचिता दिवाळीला तिकडे जाईन म्हणते… एक दोन दिवसात… अजय म्हणाला हो.. हो…जा …जा…..तुला कोण अडवते…! कधी चालली बोल…! उद्या किंवा परवा जाईन म्हणते..!
अजय लगेच म्हणाला…
सुचिता ..ये ..सुचिता…अग बाहेर ये जरा..! काय झालं अजय..! का इतका कळवळून बोलतोस… अग आई चालली… तिकडच्या घरी..! दिवाळी साजरी करायला..! आपली पण बॅग भर..! तिच्या मागे मागे आपणही जाऊ..! मला तरी नाही जमणार ..! तिच्या शिवाय दिवाळी साजरी करायला..!
मलाही नाही जमणार अजय… चल आपली बॅग भरू… आई कधी जायचे ….?

काय रे पोरांनो..! खरंच किती प्रेम करताय रे..? कशी करू तुमच्या प्रेमाची उतराई …! डोक्यात विचार आला…. देवा किती तरी मुलं आहेत… जे आपल्या जन्मदात्यांना सांभाळत नाही…
आणि ही दोघे….. कोणता ऋणानुबंध आहे माझा नि त्यांचा… त्या वरच्यांलाच ठाऊक… शेवटी नाहीच गेले… छान आनंदात पार पडली दिवाळी… हे गेल्या नंतरची ही पहिलीच दिवाळी… ही दोन पोर नसती तर काय केलं असत देवच जाणे..?
अजयने सखूच्या पोरीला दिवाळीला कपडे, फटाके आणि मिठाई दिली… मी पैसेच दिले… हव नको ते घेता यावं म्हणून….
आताशी सुचिताला सातवा महिना लागला होता.. .मी अजयला म्हणाले… अजय… सुचिताचे डोहाळे जेवण करायचे म्हणते…. तुझं काय म्हणन आहे रे….? आई तू जे ठरवशील ते…मस्त दणक्यात होऊन जाऊदे डोहाळे जेवण मग…. आणि सुचिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम… थाटामाटात पार पडला… त्या नंतर सुचिताच्या चेहऱ्यावर वेगळीच तेजी दिसत होती…. मी तर बाई नजरच काढली….माझीच मेलीची लागायची दृष्ट्.

क्रमशः….

सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण