“आई पाहिजे”….भाग 1

Spread the word

“आई पाहिजे”..भाग 1
सकाळी थोडे चालणे, मग हलकासा व्यायाम… यातच सात वाजून जायचे… मग गरमागरम वाफाळलेल्या चहाचा घोट घेत… वर्तमान पत्र वाचत बसणे… हा पुष्पाताईचा सकाळचा दिनक्रम… आताशा पेपरात वाचण्यासारखे काहीच नसते…त्यामुळे जाहिराती पासून सगळे वाचायचा जणू त्यांना छंदच जडला…
दिनकर रावांचे निधन झाल्यानंतर… काय करावे…? ह्या प्रश्नाचे उत्तर.. हा पेपर वाचन.. तेवढाच विरंगुळा.. आणि वेळ जायचे माध्यम्..! आजही असाच पेपर वाचून झाल्यानंतर.. त्यानीं त्यांचा मोर्च्या जाहिरातीकडे वळवला…

एक वेगळीच जाहिरात त्यांच्या दृष्टीस पडली….
“आई पाहिजे….?”
नावातच कुतूहल…. वाचायला सुरुवात केली… ‘उच्च शिक्षित, सुख संपन्न घरातील… ज्यांना मुलबाळ नाहीत…किंवा ज्यांची मुले परदेशात स्थाईक झाली… किंवा मुले गावात आहेत…पण सोबत आई नको…. अशा एकटे पणाचा कंटाळा आलेल्या.. भरल्या घरात राहवेसे वाटणाऱ्या… आईची… दोन अनाथ मुलांना… नितांत गरज आहे..”
संपर्कासाठी पत्ता आणि मोबाइल नंबर….
पुन्हा पुन्हा जाहिरात वाचली… तसाच पेपर घेतला… आणि शेजारच्या बंगल्यात गेले… सुधारकर भाऊजी आणि वासंती बंगळीवर बसून गप्पा मारत होते…. सुधाकर भाऊजींचा स्वभाव फारच मिस्कील….
मला पाहून म्हणाले…अरे वहिनी सकाळी सकाळी..! आम्हाला जेवायला बोलवायचा बेतबित आहे की काय…? आमचे आजचे सकाळचे जेवण तिकडेच वाटतं….? मी लटक्या रागात म्हणाले…
भाऊजी नेहमी कशी काय मस्करी सुचते हो तुम्हाला..? पुन्हा नरमाइच्या सुरात म्हणाले… भाऊजी..! आजचा पेपर वाचला काहो..! हो वहिनी वाचला… वहिनी आम्ही पेपर वाचतो…. आणि तुम्ही पेपराचे पारायण करता…. जाहिराती सगट…! आणि खो खो हसायला लागले…
वासंतीने पण त्यांच्या सुरात सूर मिसळला….आणि आम्ही तिघेही खो खो हसायला लागलो…
मग मी म्हणाले वासंती ही जाहिरात पहिली का ग…? कोणती हो पुष्पाताई…? आणि मी पेपर पुढे केला… हवेत जरा गारवाच होता… वासंतीने बायजाबाईला चहा करायला सांगितला… आणि जाहीरात वाचू लागले…. खरंच वेगळीच जाहीरात आहे… नाही…! आजपर्यंत तरी अशी जाहिरात… माझ्यातरी वाचनात आली नाही.. बाई …!
आणि त्यांनी पेपर सुधाकर रावांकडे दिला… त्यानीं सुद्धा जाहीरात वाचली…. म्हणाले हे तर नवलच…! इथे मुलांना आईबाप नकोत… वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली… आणि ह्या मुलांना आई पाहिजे..? त्यासाठी चक्क जाहीरात…!
काय गौडबंगाल आहे देवच जाणो…..? पण वाहिनी या जाहिरातीचा आणि आपला काय समंध…?
आपला नाही भाऊजी… माझा..!
म्हणजे …? समजलो नाही मी….? भाऊजी तुम्हाला तर माहिती आहे… मी माहेरी एकटी आणि हेही त्यांच्या घरी एकटेच….दोघांचेही आईवडील या जगात नाही…. हे होते तेव्हा आम्ही वेळेचे छान नियोजन केले होते….
अनाथ आश्रम… वृद्धाश्रम यांना भेटी…. त्यांच्या अडचणी… गरजू मुलांना मदत… त्याच्या शिकवण्या…. वेळ भुर्रकण निघून जायचा…. हे गेले..… आता माझं कशा कशात लक्ष लागत नाही…. एवढा मोठा आठ खोल्यांचा भव्यदिव्य बंगला… समोरचा तो बगीच्या… सारं सारं खायला उठते हो…!

हे नेहमी म्हणायचे…. मला वाटते पुष्पा… माझ्या आधी तुला देवाच्या घरचे बोलावणे यावे… मी काय मनमौजी माणूस… कुठे ही आणि कसाही रमतो… एकदा जेवून घराच्या बाहेर पडलो की …,मी… आणि माझी समाज सेवा… चोवीस तास कमी पडतात मला…
पण तू पडली कुटूंब वत्सल… मुलं, घर या विश्वात रमणारी…आता मुलं पण नाहीत इथे….. मी आहे म्हणून घेतेस समाजकार्यात भाग…. पण मी जर आधी गेलो तर… तुझे सगळेच थांबेल.. मग मुलांचे आणि माझे फोटो पाहण्यात… आणि अश्रू गाळण्यात दिवस जातील…. खूप भावनाविवश व्हायचे तेव्हा …
कधी स्वप्नातही वाटलेच नाही हो…. यांच्या सारख्या माणसाला हृदय विकाराचा झटका येईल….? सगळे कसे होत्याचे नव्हते झाले हो…! गेले हे एकटीला सोडून… थोडाही माझा विचार नाही आला…
खूप कंटाळा आला आता या एकटेपणाचा … तुला सांगते वासंती…. मी एका खोलीत टेबलवर यांचा फोटो ठेवला….. बाकी सर्व भिंतीवर… मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडाचे छान छान फोटो लावून ठेवले…. दिवसातून बऱ्याच वेळा मी त्या खोलीत जाते…
सगळ्यांशी मूक संवाद साधते…
हितगुज करते…
डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत… जुन्या आठवणींना उजाळा देत दिवस काढते…. रात्र तर अजूनच भयाण वाटते….ग..!

आधी माझ्याकडे सखू यायची कामाला…. काम करून झाले की लगेच जायची… म्हणून मी आताशी तिच्या लेकीलाच बोलावते… नववीत नापास झाली ती… मागच्या वर्षी… तर पट्ठीने शाळाच सोडून दिली… मग मीच सखूला म्हणाले… सखू आता तू कामाला न येता तुझ्या लेकीला पाठवत जा… हळूहळू जमेल तसे काम करेल…. आणि फावल्या वेळात अभ्यास घेत जाईन मी तिचा…. सखुला ही ते पटले…
तुला सांगते वासंती… सखू जेवण बनवुन जायची… तर एक वेळचे जेवण दोन वेळा पुरायचे… आताशी तिची मुलगी येते… तेवढीच सोबत… चार घास जातात.. त्या निमित्याने पोटात… म्हणूनच विचार करते वासंती…. जावे का या जाहिरातीच्या ठिकाणी…?
म्हणूनच मुद्दाम तुमचा दोघांचा सल्ला घ्यायला आले बघ… हे सगळं खरं वहीनी… पण… अश्या प्रकारची जाहिरात फसवी पण असू शकते न….? पहिल्यांदाच असे काही वाचनात आले… म्हणून म्हणतो… वासंती पण म्हणाली.. नका बाई असे धाडस करू…! तिथे गेल्यावर जर कळले.. की… त्यांना घरकाम करायला बाई पाहिजे… तर किती यातना होईल तुमच्या मनाला..! मुलांना कळले तर तेही दुःखी होतील… खरच…. ताई… काढून टाका डोक्यातले हे खूळ…

पण वासंती…. अग जाऊन पाहायला काय हरकत आहे….?  ही जाहीरात खरी असेल… आणि त्या दोन अनाथ मुलांची… आई होण्याचे भाग्य मला लाभणार असेल तर….?
एक वेगळीच अनुभुती … अनुभवते वासंती मी… ही जाहीरात वाचल्यापासून … का कोण जाणे…? पण मला सारखे वाटते… त्या दोन जीवांना खरंच एका आईची गरज आहे… आणि मीच ती होणारी आई… ! कल्पनेनेच भारावून गेले बघ…! ठीक आहे पुष्पाताई … जा तुम्ही….,पण शांत डोक्याने पूर्ण विचार करून निर्णय घ्या…. बाकी आम्ही आहोतच तुमच्या सोबतीला….

घरी आले… सखूच्या पोरीला नास्ता करायला सांगितला… आज कशा कशातच मन लागत नव्हते… डोळ्यासमोर ती जाहिरात…. अन दोन अनाथ मुलं दिसत होती… कशीबशी आंघोळ केली… देवाच्या डोक्यावर पाणी घातले…. आज पूजेत सुद्धा लक्ष लागत नव्हते…. ड्रायव्हर ला फोन करून बोलावून घेतले…. छानशी प्युवरसिल्क ची साडी नसले… हे गेल्यानंतर पहिल्यांदाच इतकी छान तयार झाले….
आणि निघाले… त्या कधी न पाहिलेल्या …. दोन अनाथ मुलांची … आई होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी……
फोन करायची तसदी मुद्दामच घेतली नाही…. अचानक समोर उभी पाहून…. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव … अचूक टिपता यावे म्हणून….
दारावरची बेल वाजवली… एका सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या स्त्री ने दार उघडले… स्त्री यासाठी कारण तीच्या गळ्यात साधेच…पण नाजूकसे मंगळसूत्र होते…
नमस्कार , मी पुष्पा सोनकुसरे… आणि मी हळूच पेपर पुढे केला… ही जाहीरात वाचून आले…. अच्छा …! या …या ..आई आत या… प्लीज… मी आता गेले… अजय… ये… अजय …लवकर बाहेर ये… हे बघ कोण आले…? अजय सर्व आवरून… लगेच बाहेर आला…
अजय ह्या आई..!
आई हा अजय ..! माझा नवरा..!
बसा न आई … तुम्ही उभ्या का..? मी बसले…
तो म्हणाला… आई मला अत्यन्त महत्वाची मीटिंग आहे… त्यामुळे मी निघतो… तुम्ही सुचिताशी बोलून घ्या… तसेही घरातले सगळे निर्णय तीच घेते…. माझ्या जवळ आला….नमस्कारासाठी पायाला स्पर्श केला….
सुचिता येतोय ग..! आई येतोय…! म्हणून निघून गेला… .सुचिता आलेच म्हणून…. त्याला दारापर्यंत सोडायला गेली… मी तर त्या दोघांच्या ‘आई आई’ या शब्दाने भारावून गेले… किती वेळा उच्चारला असेल शब्द…”आई” ….
बाई ग …! नुसता कानात गुंजतो आहे आवाज तो…! दोन महिने झाले भारतात येऊन… पुढ्यात उभ राहून कोणीतरी आज पहिल्यांदा… आई म्हणून साद् घालत होत… पाखराचे पंख लावून… माझे मन… त्या अनाथ जीवांवर…मनोमन मायेची पाखर घालत होते… त्याला बाय करून… सुचिता माझ्या बाजूला येऊन बसली….अनुसया बाई म्हणून हाक मारली… एक चाळीस, पंचेचाळीस वर्षाची विधवा समोर आली…तिला चहा बिस्कीट आणायला सांगितले… मग मीच विषयाला सुरवात केली…
ही जाहीरात… ” आई पाहिजे…?” या विषयी काही सांगाल का…? सुचिता सांगू लागली…
आई …मी आणि अजय दोघेही अनाथ आहोत….आम्ही दोघे एकाच आश्रमात लहानाचे मोठे झालो…अजय अभ्यासात खूप हुशार होता… अनाथ आश्रमातील सरांनी मग त्याच्याकडे विशेष लक्ष दिले… अजय दहावी, बारावी दोन्ही वेळेला मेरिट मध्ये आला… IIT ची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन… नामांकित कंपनी मध्ये इंजिनीअर म्हणून कामाला लागला…
मीही इंजिनीअर आहे…. हे घर, गाडी आणि नोकर सगळं कंपनी ने दिले… मीही नोकरी करत होते… अशातच आम्हाला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली…. दोन महिने झाले असतील… ऑफिस ला जायला निघाले… गाडी स्टार्ट होत नव्हती… म्हणून गाडीला किक मारायचे निमित्य झाले… आणि आमचं बाळ गेलं…. खूप खच्चून गेलो होतो आम्ही…. अनुसया बाईंनी त्यावेळी खूप सांभाळून घेतले…
तेव्हा अजय म्हणाला… सुचिता… तुला किंवा मला… दोघांपैकी कुणालाही आई असती तर ही वेळ आलीच नसती….. डोळ्यात तेल घालून तुझ्याकडे लक्ष ठेवले असते बघ….
आता पुन्हा पाळी चुकली… तीन महीने होत आले… तो मला आता नोकरी करू द्यायला तयार नाही… आधी बाळ… मग तुला जे करायचे हे कर म्हणतो…”आई “.. या शब्दानेच खूप हळवा होतो तो… आता तर मी आई होणार आहे…
मग काय ..? चाललाय आराम… खाओ पियो मज्जा करो… होणाऱ्या बाळाच्या आईला जपणे … याशिवाय त्याला काहीच दिसत नाही… अनुसया बाई आहेच माझ्यावर लक्ष ठेवायला…
पण आई अजयचे बोलणे..”आपल्याला आई असती तर”… हे माझ्या काळजाला छेदून गेलं… आणि… माझ्या डोक्यात ही कल्पना आली… अजयला बोलून दाखवली.. त्यालाही ते पटलेले.. मग ही जाहीरात दिली.. विचार केला.. आलेच कोणी तर ठीक.. नाहीतर काय..? फार फार तर जाहिरातीचे पैसे वाया जातील…?
आणि आई तुम्ही पहिल्याच आल्या.. तसेही आजकाल आपण tv, पेपर मध्ये वाचतोच या बाबतीत..

क्रमशः…..

सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण