अढी

Spread the word

सकाळच्या कामातून ब्रेक घेऊन सुमेधा नुकतीच आडवी झाली तशी दारावरची बेल ठणाणा वाजत सुटली. कुरकुरणारे गुडघे आणि ताठलेली कमर घेऊन सुमेधा उठली आणि जाऊन दार उघडलं. तणतणत रिया घरात शिरली आणि हातातील 5,6 शॉपिंगच्या पिशव्या सेंटर टेबलवर जवळजवळ फेकून सोफ्यात विसावली. मागून अविनाश हातात मावतील तेवढ्या पिशव्या घेऊन आत आले. बाकीच्या पिशव्या ड्रायव्हर येऊन ठेऊन गेला. सुमेधा आळीपाळीने बॅगा, रिया आणि अविनाशकडे बघत सोफ्यावर टेकणार इतक्यात रिया तनफनली”  किती गर्मी आहे बाहेर. बसू नकोस. मला चिल्ड ज्यूस आण आधी”  सुमेधा नाईलाजाने गुडघ्यावर हाथ टेकवत उठली आणि किचनमध्ये गेली . अविनाश सोफ्यावर घाम पुसत बसले. सुमेधाने सकाळीच केलेलं थंडगार पन्ह भरून दोन ग्लास आणले . रिया अजूनच करवंदली “”आई तुला माहीत नाही का मला आवडत नाही तुझं ते पन्ह-बिन. काल बाबाने माझ्यासाठी आणलेलं ज्यूस पॅकेट आन मला. तुच पी ते पन्ह.”  सुमेधा परत अविनाशकडे बघू लागली तर तेच बोलले तू जाऊन पड मी देतो”” हे नेहमीचे होते की सुमेधाला काहीतरी बोलायचं असायचं पण त्या आधी ती अविनाशकडे बघायची आणि न बोलता त्यांना ते कळून मग तेच उत्तर द्यायचे. रिया अती लाडवण्यातही अविनाशचाच वाटा होता कारण सुमेधाची घर आणि नोकरी या मध्येच लग्नांनंतरची 26-27 वर्षे संपली होती. रियाच लग्न झाले की ती नोकरी सोडणार हे तिने आधीच सांगितलं होतं. आणि त्या प्रमाणे तिने नोकरी सोडलीही. आता तरी आयुष्यात थोडं निवांत होऊ असा तिचा विचार होता. सुमेधाच्या घर -नोकरीच्या कसरतीती रियाची अबाळ होऊ नये म्हणून दोघांनी मिळून एक निर्णय घेतला की अविनाश घरी राहतील आणि घरातून त्यांचे काम करतील. यामुळे साहजिक अविनाशचा इन्कम, सुमेधा पेक्षा कमी येणार होता पण रियासाठी अविनाश आनंदाने तयार झाले. घर सुमेधा सांभाळत असली तरी राज्य रियाच होत आणि तिची मर्जी सांभाळायचे काम तिचा बाबा अविनाश खूप चांगल्या प्रकारे करायचा. त्यामुळे साहजिक सुमेधाची आडकाठी, शिस्त रियाला आवडायचे नाही आणि ती आई पासून थोडी कटाऊत राहायची. यामुळे एक न दिसणारी अढी सुमेधा आणि रियामध्ये बनून गेली. कदाचित त्यामुळेच रिया सासरी जाताना सुमेधा तितकी रडली नाही जितके अविनाश रडले. रिया सासरी गेल्या नन्तर अविनाशला कणखरपणे सावरलं सुमेधाने.
लग्नानंतर पहिल्यांदाच रिया माहेरपणाला आली होती. आल्यापासून तिचा घरात पाय नव्हता. रोज कुठले न कुठले गेट-टूगेदर , नाहीतर मित्र- मैत्रिणीशी मिट. पण सगळीकडे तिला बाबा सोबत हवा असायचा. अविनाश मुळातच बोलके त्यामुळे सहज मिसळून जायचे आणि रियाच्या फ्रेंड सर्कलशी त्यांची आधीपासून ओळख ही होती. सुमेधा घरी असूनही कधी रिया -अविनाशने तिला सोबत घेतले नाही की तिनेही स्वतः सोबत येण्याची इच्छा बोलून दाखवली नाही.
दोन दिवसांनी रिया तिच्या सासरी जाणार होती म्हणून तिला सासरच्या सगळ्यासाठी अगदी रवीच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या चुलत ,मावस,मामे नातलगासाठीही काही न काही घ्यायचे होते. तशी तिने लिस्टच केली होती आणि ती त्या प्रमाणे सकाळी अविनाशसोबत घराबाहेर पडली होती.

क्रमशः

प्रिस्का